महाराष्ट्रात प्रथमच 'युरेशियन ब्लॅक कॅप'ची दर्शन; भारतामधील दुसरी नोंद

17 Nov 2025 10:44:38
eurasian black cap
मुंबई (अक्षय मांडवकर) - भारतात प्रथमच वटवट्या कुळातील मादी 'युरेशियन ब्लॅक कॅप' या पक्ष्याची नोंद झाली आहे (eurasian black cap). या पक्ष्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच नोंद असून पुण्यातील ताम्हिणीमध्ये या पक्ष्याचे दर्शन सोमवार दि. १० नोव्हेंबर रोजी घडले (eurasian black cap). हा पक्षी प्रवासी स्थलांतरी पक्षी तो प्रामुख्याने युरोपातून आफ्रिकेत हिवाळी स्थलांतर करतो. त्यामुळे ही मादी याठिकाणी भरकटून आल्याची शक्यता आहे. (eurasian black cap)
 
मुंबईचे पक्षीनिरीक्षक विवेक आंबेरकर हे रविवारी ताम्हिणी घाटामधील 'ताम्हिणी नेचर नेस्ट' याठिकाणी पक्षीनिरीक्षणाकरिता गेले होते. त्याठिकाणी पक्षीनिरीक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या लपनगृहात ते बसले. साधारण ११ वाजण्याच्या सुमारास समोरच्या कुत्रीम पाणवठ्यावर त्यांना एक छोटा पक्षी दिसला. पाणी पिण्यासाठी आलेला हा पक्षी त्यांना नवीन वाटल्याने त्यांनी लागलीच त्याचे छायाचित्र टिपले. छायाचित्र टिपल्यानंर त्यांनी 'ताम्हिणी नेचर नेस्ट'चे रामदास येनपुरे यांना ते छायाचित्र दाखवले. त्यांच्यासाठी देखील हा नवा पक्षी होता. माहिती काढल्यानंतर हा पक्षी 'युरेशियन ब्लॅक कॅप' असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मंगळवारी देखील या पक्ष्याने पाणवठ्यावर दर्शन दिल्याची माहिती येनपुरे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.
 
वटवट्या कुळातील हा पक्षी मादी असून भारतात मादी 'युरेशियन ब्लॅक कॅप'ची ही प्रथमच नोंद आहे. यापूर्वी २०२१ साली केरळच्या मुन्नार येथून 'युरेशियन ब्लॅक कॅप'च्या नराची नोंद करण्यात आली होती. नर आणि मादी युरेशियन ब्लॅककॅपमधील मुख्य फरक म्हणजे त्यांच्या डोक्यावरील टोपीसदृश्य भागाचा रंग. नरांचा टोपीसारखा भाग काळा असतो तर मादीचा हलक्या तपकिरी रंगाचा. यातील निमवयस्कर नरांना देखील मादीसारखी तपकिरी रंगाची टोपी असते. नराच्या काळ्या टोपीमुळे या पक्ष्याला 'ब्लॅक कॅप' हे नाव मिळाले आहे. हे पक्षी प्रामुख्याने युरोपेमध्ये प्रजनन करतात आणि दक्षिण युरोप व आफ्रिकेत हिवाळी स्थलांतर करतात.
Powered By Sangraha 9.0