Bangladesh : बांगलादेशात हाय अलर्ट, शेख हसीना प्रकरणावर आज निर्णय; भारतानेही बॉर्डरवरील सुरक्षा वाढवली!

17 Nov 2025 13:43:55

Bangladesh
 
मुंबई : बांगलादेशमध्ये (Bangladesh) तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण देश हाय अलर्टवर आहे. भारतानेही भारत-बांगलादेश सीमेवरील सुरक्षा अधिक कडक केली आहे. भारतात आश्रय घेतलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्यावरील आरोपांवर आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण आज (दि. १७ नोव्हेंबर) निकाल देणार आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
 
निकालाच्या पार्श्वभूमीवर अवामी लीगने (Awami League) देशव्यापी बंदची घोषणा केली असून संभाव्य हिंसाचार टाळण्यासाठी सरकारने कडक सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. ढाका पोलिस आयुक्तांनी कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध ‘शूट अॅट साईट’चे आदेश दिले आहेत.
 
२०२४ मधील सत्तापालटानंतर बांगलादेशमध्ये (Bangladesh) तणावाची परिस्थिती होती. मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरले होते आणि शेख हसीना देश सोडून भारतात गेल्या. त्यानंतर त्या गेल्या एका वर्षापासून भारतातच राहतात. २०२६ च्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुकांपूर्वी या प्रकरणाचा निकाल बांगलादेशच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवू शकतो. निकालाआधीच तणाव वाढत असून बांगलादेशात आणि सीमेवर (India-Bangladesh Border) अत्यंत कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0