विरार, वेळास, मालवणमार्गे अमूर ससाणा सोमालियासाठी रवाना; ७६ तास न थांबता ३,१०० किमीचे उड्डाण

    17-Nov-2025
Total Views |
amur falcon migration



मुंबई (अक्षय मांडवकर) -
'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) मणिपूर वन विभागाच्या मदतीने 'सॅटेलाईट ट्रान्समीटर' लावलेल्या तीन अमूर ससाणा पक्ष्यांनी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरुन अरबी समुद्रावर झेप घेऊन आफ्रिकेतील सोमालियाच्या दिशेने आपला प्रवास सुरू ठेवला (amur falcon migration). यामधील 'अपापांग' नामक नर अमूर ससाणा पक्ष्याने मणिपूर ते वेळास हे अंतर ७६ तास न थांबता उडून पूर्ण केले आणि वेळासच्या परिसरातून शुक्रवार दि. १४ नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात प्रवेश केला (amur falcon migration). तर इतर दोन पक्ष्यांनी शनिवार आणि रविवारी विरार आणि मालवण येथून अरबी समुद्रात प्रवेश केला. (amur falcon migration)



दरवर्षी अमूर ससाणा हे पक्षी उत्तर चीन ते आफ्रिका, असे दूरवरचे स्थलांतर करतात. उत्तर चीनमध्ये प्रजनन करुन हे पक्षी हिवाळ्यासाठी आफ्रिकेत जातात. यादरम्यान ते भारतातील नागालॅंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये आरामासाठी थांबतात. यावेळी 'डब्लूआयआय'च्या शास्त्रज्ञांकडून या पक्ष्यांना 'सॅटलाईट टॅग' लावण्यात येतात. लांब पल्ल्याचे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे उड्डाण मार्ग आणि या मार्गावरील पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करण्यासाठी २०१६ सालापासून 'डब्लूआयआय'चे शास्त्रज्ञ 'केंद्रीय पर्यावरण मंत्रालया'च्या परवानगीने ससाणा पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करत आहेत. या अभ्यासाच्या 'मणिपूर अमूर फाल्कन ट्रॅकिंग प्रोजेक्ट' या प्रकल्पाच्या दुसऱ्या सत्राअंतर्गत 'डब्लूआयआय'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. आर. सुरेश कुमार यांनी मंगळवार दि. ११ नोव्हेंबर रोजी मणिपूर येथे तीन पक्ष्यांवर 'सॅटलाईट ट्रान्समीटर' बसवले. पकडलेल्या १० अमूर ससाणा पक्ष्यांपैकी 'सॅटलाईट ट्रान्समीटर' लावण्यासाठी तीन अमूर ससाणा पक्ष्यांची निवड करण्यात आली.


तामेंगलाँग जिल्ह्यात या तीन अमूर ससाणा पक्ष्यांना पकडून त्यांच्यावर ३.७ ग्रॅम वजनाचे 'सॅटलाईट ट्रान्समीटर 'लावून सायंकाळी चार वाजता त्यांना सोडण्यात आले. ट्रान्समीटर लावलेल्या पक्ष्यांची नावे अनुक्रमे अपापांग (प्रौढ नर), अलंग (मादी) आणि अहू (मादी) असे ठेवण्यात आले. मणिपूरहून प्रवास करुन महाराष्ट्रात आलेल्या अपापांगने वेळास येथून, अहू या मादीने विरार येथून आणि अलंग या मादीने मालवण येथून अरबी समुद्रात प्रवेश करुन सोमालियापर्यंतचा प्रवास सुरू ठेवल्याची माहिती 'डब्लूआयआय'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. आर. सुरेश कुमार यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. सध्या हे पक्षी अरबी समुद्रावरुन उडत असून साधारण ३ हजार किलोमीटरचे अंतर पार करत ते सोमालिया गाठतील, असेही त्यांनी सांगितले.