चोरीचा मामला

17 Nov 2025 10:36:54

पॅरिसमधल्या सुप्रसिद्ध ल्यूवर म्युझियममधील चोरीचा तपास पूर्ण होत असतानाच, आणखी एका वस्तू संग्रहालयातील चोरी जगासमोर उघडकीस आली आहे. काही दिवसांपूव फ्रान्समधल्या सुप्रसिद्ध ल्यूवर म्युझियममधील कोट्यवधींचा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा ऐवज, काही चोरांनी अगदी काही मिनिटांमध्ये लंपास केला. सुरक्षाव्यवस्थेला चकवा देत, अत्यंत चपळाईने त्यांनी ही चोरी केली. अशातच, आता सीरियातील दमास्कस इथल्या नॅशनल म्युझियममध्येही दि. 10 नोव्हेंबरच्या दरम्यान चोरी झाली आहे. अत्यंत मौल्यवान अशा रोमनकालीन संगमरवरी मूर्तीची चोरी झाली असून, ही चोरी म्युझियममधील कर्मचाऱ्याच्या मदतीनेच घडवल्याचे, पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये उघडकीस आले आहे. बशार-अल-अस्साद यांची सत्ता उलथावून लावल्यानंतर, पहिल्यांदाच जानेवारी 2025 मध्ये हे म्युझियम सर्वांसाठी खुले झाले होते. यानंतर झालेल्या या चोरीमुळे, सीरियाच्या सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी एकाच व्यक्तीने किंवा एखाद्या लहान टोळीने केल्याची शक्यता आहे. या चोरीमुळे म्युझियममधल्या संग्रहालयाच्या सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इथल्या कर्मचारीवृंदाचीसुद्धा चौकशी करण्यात आली. यासंदर्भात तिथल्या प्रशासनाने चोरीला झालेल्या रेखाचित्रांची माहिती जारी केली असून, नागरिकांना माहिती मिळताच त्वरित संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे. ही घटना सीरियाच्या वारशाला मिळालेला धक्का तर आहेच, परंतु राष्ट्र म्हणून सीरियाचे सुरू असलेले सांस्कृतिक अधःपतनहे यामुळे निदर्शनास आले आहे.

मागच्या वष सीरियामध्ये ज्या पद्धतीने सत्तांतर घडून आले, त्यामुळे सीरियाचा धगधगता इतिहास आणि रक्तरंजित वर्तमान याची अनेकांना प्रचिती आली. मध्यपूर्वेतील हे राष्ट्र मागची अनेक दशकं गृहयुद्धाच्या कलहामध्ये पोळून निघाले आहे. देश म्हणून ही अस्थिरता 2011 नंतर मोठ्या प्रमाणात दिसली. केवळ काही वस्तूंची चोरी किंवा काही ठिकाणांवर झालेले हल्ले, इथपर्यंतच ही समस्या मर्यादित नव्हती. गृहयुद्ध, हिंसाचार, रक्तपात आदी गोष्टींमध्ये इथल्या सांस्कृतिक वारशाचाही बळी गेला. पालमायरासारखी प्राचीन शहरांची झालेली नासधूस, यामुळे दहशतवादाचा युद्धाचा एक वेगळाच चेहरा समोर आला.

‌‘आयएसआयएस‌’सारख्या दहशतवादी संघटनने, अशाच लुटीच्या माध्यमातून आपल्या दहशतवादी कारवायांसाठी पैसा उभा केला. सीरियासारख्या देशामध्ये अशा पुरातन वस्तूंच्या विक्रीसाठी, ग्राहकांचं आणि विक्रेत्यांचं एक भलंमोठं जाळ प्रस्थापित आहे. ‌’ब्लॅक मार्केट‌’च्या माध्यमातून इथे वस्तूंची देवाण-घेवाण होते आणि इतिहासाचा अमूल्य वारसा, किंमत नसलेल्या अपप्रवृत्तीच्या हाती लागतो. युद्धखोरीमध्ये ज्यावेळेस एखादा देश सापडतो, त्यावेळेला त्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय नुकसान तर भोगावे लागतेच, परंतु त्याचबरोबर युद्धाची आणखी एक भीषण बाजू म्हणजे, त्या त्या राष्ट्राचा समृद्ध वारसा, तिथली संस्कृतीही टप्प्याटप्प्याने उद्ध्वस्त होते. एखाद्या राष्ट्रासाठी स्थिरता आणि शांती का महत्त्वाची ? हे समजण्यासाठी एवढे उदाहरण पुरे.

मात्र, एका बाजूला सीरियासारख्या देशामध्ये जशी ही चोरी होते, अगदी त्याचप्रकारे फ्रान्समध्येसुद्धाही वस्तूंची चोरी होतेच. अमेरिकेतल्या वस्तू संग्रहालयातसुद्धा चोरी केली जाते. इथल्या राष्ट्रांची भौतिक परिस्थिती जरी वेगळी असली, तरी काही घटक आपल्याला येथे समान असल्याचे दिसते. आपल्या देशातील सांस्कृतिक वारशाचा विचार जितक्या संवेदनशीलपणे आपण करत असतो, तितका विचार हे समाजकंटक करीत नाहीत. त्यांच्यासाठी हा निव्वळ खरेदी-विक्रीचा व्यापार असतो. त्यातून मिळणारा आर्थिक लाभ, हा एकच विचार समोर ठेवून या घटना घडतात. एका बाजूला आपल्या सांस्कृतिक वारशाचे महत्त्व लक्षात न घेता चोरी करणारे लोक आहेत, तर दुसऱ्या बाजूला युक्रेनसारख्या देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असतानासुद्धा, तिथल्या वस्तू संग्रहालयाचे रक्षण करणारी काही मंडळी युद्धाला तोंड देत उभी आहे. सस्कृंतीसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता, सचोटीने उभे राहिलेले लोक बघायला मिळणं तसं दुमळच. आशा-निराशेच्या संगमातून मानव जात अशीच पुढे जात राहणार आहे, हेच यातून अधोरेखित होते.

Powered By Sangraha 9.0