भारताला मिळणार ड्रोनविरोधी कवचाचे संरक्षण!

16 Nov 2025 13:14:16

नुकतीच क्षेपणास्त्र आणि ड्रोनविरोधी कवचाची पूर्तता करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानिमित्ताने ड्रोनयुद्धाची व्याप्ती, वाढलेले धोके यांचा मागोवा घेणारा हा लेख...

पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी, जामनगर (गुजरात) येथील जगातील सर्वांत मोठ्या रिफायनरी प्रकल्पावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने हल्ला करण्याची मागे धमकी दिली होती. यामुळे भारताच्या सामरिक (Strategic) आणि औद्योगिक (Industrial) केंद्रांना असलेला ड्रोनहल्ल्याचा धोका पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला. पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पंजाब सीमेवरून मोठ्या प्रमाणावर ड्रोनद्वारे अफीम, गांजा, चरस आणि शस्त्रे भारतात घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. केवळ 2024 या एका वर्षातच
भारतीय सीमेवर 500 हून अधिक ड्रोन पकडण्यात आले.

पाकिस्तान भारतासाठी कमी खर्चात मोठा धोका निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. रशियाने काही वर्षापूवच संपूर्ण युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोनद्वारे घुसखोरी करायला सुरुवात केली. आज ही घुसखोरी थांबवणे युरोपला जवळजवळ अशक्य झाले आहे. रशियाने युरोपच्या विरोधात चालवलेल्या या युद्धातून, भारताने धडा घेणे अत्यंत गरजेचे आहे.

युक्रेनच्या ड्रोनयुद्धातील धडे

‌‘नाटो‌’ राष्ट्रांच्या हवाई हद्दीत झालेल्या रशियन ड्रोनच्या घुसखोरीमुळे, जागतिक राजकारणात तणाव वाढला आहे. गेल्या आठवड्यात एका बेल्जियन लष्करी तळावरही ड्रोनद्वारे हेरगिरी होत असल्याचे आढळले होते. या ड्रोनच्या घुसखोरीमुळे स्पेन, डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, जर्मनी, एस्टोनिया आणि झेक प्रजासत्ताक येथे हवाई वाहतुकीतही व्यत्यय आला. हे ड्रोन लष्करी तळ आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांवरही निगराणी ठेवताना दिसून आले. याशिवाय, सप्टेंबरमध्ये पोलंडच्या हवाई क्षेत्रातही रशियन लांब पल्ल्याच्या ड्रोनने प्रवेश केला होता.

युरोपची घाबरट प्रतिक्रिया

बेल्जियमने त्यांच्या प्रदेशात घुसलेले ड्रोन जॅम करुन, पाडण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला. ब्रिटन आणि जर्मनीलाही हे लक्षात आले की, कायदेशीर अधिकारांच्या अभावामुळे लष्कर किंवा पोलिसांना ड्रोन पाडण्याची परवानगी त्यांच्याकडे नाही. पोलंडमध्ये, मित्रराष्ट्रांनी सुमारे दहा हजार किमतीच्या ड्रोनसाठी, एक दशलक्ष किंवा त्याहून अधिक किमतीची क्षेपणास्त्रे वापरली.

युक्रेनमध्ये ड्रोनयुद्धाचा वेग आश्चर्यकारकपणे वाढत आहे. डोनेट्स्क प्रदेशातील ड्रोन उत्पादक, ऑपरेटर आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पाश्चात्य देश या ड्रोनयुद्धात मागे पडले आहेत. ड्रोनमुळे युद्धभूमी पूर्णपणे पारदर्शक झाली आहे. युक्रेन आणि रशियाच्या सैनिकांवर आता युद्धभूमी ओलांडताना नेहमीच लक्ष ठेवणे सोप्पे झाले आहे. त्यामुळे या सैनिकांवर हल्ला होण्याचा धोकाही वाढला आहे. तसेच, शत्रूलाही अनपेक्षित हल्ला करणे आता कठीण झाले आहे. सैन्याला लढण्यासाठी आधारभूत असलेली पुरवठा साखळीही, यामुळे गुंतागुंतीची झाली आहे. ड्रोन तोफखाना आणि इंधन यांसारखा जड पुरवठा पोहोचवण्यात अद्यापतरी कमी पडत आहेत.

ड्रोनच्या वाढत्या धोक्यामुळे, जखमींना बाहेर काढण्यास (evacuate) विलंब होऊ शकतो. त्यामुळे लष्करातील वैद्यकीय पद्धतीत बदल करणे आवश्यक झाले असून; वैद्यकीय मदत घटनास्थळीच देणे गरजेचे झाले आहे.

‌‘किल झोन‌’चा उदय

सीमा आता फक्त एक रेषा राहिली नाही. ड्रोनने त्याला सुमारे 25 मैलांचा एक ‌‘किल झोन‌’ बनवले आहे. त्यामुळे कोणतेही सैन्य मोठ्या गटात किंवा वाहनांमध्ये सुरक्षितपणे हालचाल करू शकत नसल्याने, सैनिकांना लहान संख्येत हालचाल करणेच फायद्याचे ठरत आहे. ड्रोनने लढलेले युद्ध अत्यंत विखुरलेले आहे. त्यातून हल्ला कुठेही होऊ शकतो. यामुळेच सर्वत्र ड्रोनविरोधी प्रणाली आवश्यक झाली असून, त्याकरिता प्रचंड पैसा खर्च करण्याची गरज आहे.

जर भविष्यात रशियाने बाल्टिक देशांवर आक्रमण केले, तर या हल्ल्यासाठी असुरक्षित असलेला टँकचा वापर होण्याची शक्यता कमी आहे. त्याऐवजी रशिया युक्रेनप्रमाणेच लहान लहान पायदळाच्या तुकड्या पाठवतील. युक्रेनने तयार केलेल्या ड्रोन-हेरगिरी कॉम्प्लेक्सशिवाय, लक्ष्यांची ओळख पटवणे देखील पाश्चात्य देशांसाठी एक मोठेच आव्हान ठरत आहे.

ड्रोन प्रशिक्षण एकदाच देऊन भागत नाही. ड्रोन तंत्रज्ञान आणि डावपेच महिन्यांत किंवा आठवड्यांत कालबाह्य होऊ शकतात, त्यामुळे तयारीसाठी त्याच्या सरवात सातत्य राखणे आवश्यक आहे. टँक आणि चिलखती वाहनांनादेखील,उत्कृष्ट ड्रोन संरक्षणाची गरज आहे. जो देश विश्वासार्ह असे ‌’काइनेटिक‌’ काऊंटर-ड्रोन संरक्षण शोधेल तोच या युद्धात विजय मिळवेल.

रशियाचे हल्ले : रशिया आता युक्रेनियन शहरांना लक्ष्य करण्यासाठी नियमितपणे शेकडो लांब पल्ल्याचे ड्रोन सोडत आहे. युक्रेनचे विविध स्तरीय संरक्षण: युक्रेनच्या हवाई संरक्षणात अंतर आणि उंचीनुसार स्तरित संरक्षण आहे. यामध्ये गतिशील आणि इलेक्ट्रॉनिक अशा विविध प्रकारच्या उपाययोजनांचा समावेश आहे. याचाच अर्थ असा की, जर एक संरक्षण यंत्रणा अयशस्वी झाली, तर दुसरी यशस्वी होऊ शकेल.

आंतरराष्ट्रीय सहभाग आणि धोका

ब्रिटिश गुप्तचर विभागच्या अहवालानुसार, उत्तर कोरियाचे सैनिक युक्रेनमधील रशियन हल्ल्यांना मदत करण्यासाठी, टेहळणी ड्रोन चालवत आहेत. अलीकडील रशियन आणि चिनच्या संयुक्त सरावांमध्ये, ड्रोन आणि काऊंटर-ड्रोन घटकांचाही समावेश होता. रशिया इराणी-शैलीतील लांब पल्ल्याचे ड्रोन अधिक प्राणघातक बनवत आहे.

डेटा विलेषण आणि ‌‘डेल्टा‌’ प्रणालीचे महत्त्व : युक्रेनचे युद्धामधील यश मोठ्या प्रमाणात त्यांच्या नेटवर्क-केंद्रीत युद्धक्षमतेवर अवलंबून आहे. याचा अर्थ सेन्सर्स (उदा. ड्रोन, उपग्रह), निर्णय घेणारे (कमांडर) आणि लक्ष्य भेदणारी शस्त्रास्त्रे यांना प्रभावीपणे एका डिजिटल नेटवर्कमध्ये जोडणे होय.

‌’डेल्टा‌’ प्रणाली (Delta System) : ‌’डेल्टा‌’ ही एक क्लाऊड-आधारित ‌’स्थितीजन्य जागरूकता‌’ (Situational Awareness) आणि युद्धभूमी व्यवस्थापन प्रणाली आहे. हे केवळ ‌’लष्करी गुगल मॅप्स‌’ नाही, तर एक रिअल-टाईम कमांड-ॲण्ड-कंट्रोल सेंटरही आहे. ‌’डेल्टा‌’ प्रणाली ड्रोन, उपग्रह प्रतिमा, मानवी गुप्त माहिती (HUMINT) आणि मित्र राष्ट्रांकडून मिळालेली माहिती एकत्रित करते. ही प्रणाली लॅपटॉप, टॅबलेट किंवा मोबाईल फोनवरही सहज वापरता येते.

‌’डेल्टा‌’मुळे युक्रेनियन सैन्याला विकेंद्रित आदेश (Decentralized Command) देणे शक्य झाले आहे. यामुळे जास्त संसाधने असलेल्या देशावरही हल्ला करताना, वेगाने आणि प्रभावीपणे समन्वय साधता येतो.

चिलखती वाहनांचे संरक्षण आणि काऊंटर-ड्रोन उपाय: टँक आणि चिलखती वाहनांना ड्रोन हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी, ‌’काइनेटिक हार्ड-किल‌’ काऊंटर-ड्रोन संरक्षण अत्यावश्यक आहे. ‌’काइनेटिक‌’ म्हणजे ड्रोनला शारीरिकरित्या (उदा. गोळीबार, जाळी किंवा दुसरे ड्रोन वापरून) नष्ट करणे/निकामी करणे.

सध्याचे उपाय : युक्रेन आणि रशिया दोन्ही बाजू वाहनांवर धातूचे पिंजरे किंवा रस्त्यांवर जाळी वापरत आहेत, जे हल्ल्यापासून अपूर्ण/सीमित संरक्षण देतात. त्यामुळे, केवळ एका उपायावर अवलंबून न राहता ‌’काइनेटिक‌’ आणि ‌’नॉन-कायनेटिक‌’ उपायांचे मिश्रण आवश्यक आहे.

युद्धाचे बदललेले स्वरूप आणि तंत्रज्ञानाची भूमिका

‌’पॉइंटिलिस्ट युद्धभूमी‌’: ड्रोनमुळे युद्धाचे स्वरूप ‌’पॉइंटिलिस्ट‌’ झाले आहे. याचा अर्थ सीमा स्पष्ट नसून, रशियन आणि युक्रेनियन ठिकाणे एका ’किल झोन‌’मध्ये लहान गटांमध्ये मिसळलेली आहेत. मोठ्या गटात सैन्याची हालचाल करणे धोकादायक झाले आहे. रशियाकडे प्रगत ड्रोन तंत्रज्ञान आणि काऊंटर-ड्रोन प्रणाली असूनही, युक्रेनियन ड्रोनमुळे त्यांना मोठा फटका बसला आहे. यातून हा धडा मिळतो की, केवळ प्रगत तंत्रज्ञान असून चालत नाही, तर सैन्याने धोक्याची जाणीव ठेवून नियम पाळणे आणि धोरणांचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे. तुर्की बनावटीच्या बायराक्तार टीबी-2 सारख्या ड्रोनने युक्रेनसाठी केवळ लष्करी यशच मिळवले नाही, तर प्रोपगंडा आणि जनतेचे मनोबल वाढवण्यातही मोठीच मदत केली.

किल-पॉईंट्स स्पर्धा

युक्रेनने सैन्याच्या ड्रोन युनिट्समध्ये ‌‘आम ऑफ ड्रोन बोनस सिस्टम‌’ नावाची क्रीडा शैलीतील स्पर्धा सुरू केली आहे. यात यशस्वी हल्ल्यांसाठी पॉईंट्स मिळतात, ज्यांचा वापर सैनिक अधिक शस्त्रे किंवा ड्रोन खरेदी करण्यासाठी करू शकतात. यामुळे लक्ष्यभेद अधिक अचूक आणि जलद झाला असून, ही प्रणाली युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यास मदत करते.

निष्कर्ष

भविष्यातील युद्धात पारंपरिक आणि अपारंपरिक युद्धपद्धतींचे मिश्रण असण्याची शक्यता आहे. ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’मध्ये ड्रोन युद्धकौशल्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून, विविध डावपेच वापरण्यात आले. त्याचप्रमाणे, सध्या सुरू असलेल्या अनेक मोठ्या युद्धांमध्ये, विशेषतः रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास युद्धात ड्रोन्सचा वापर विविध मार्गांनी केला जात आहे. या युद्धांमधून ड्रोन्सच्या वापराचा सखोल अभ्यास करून, आपण आपल्या ड्रोन युद्धकौशल्याची पद्धत आणखी प्रभावी आणि आधुनिक करु शकतो.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी ‌‘ड्रोन व क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण कवच‌’ उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली. पुढील दहा वर्षांत भारतातील सर्व महत्त्वाची सामरिक केंद्रे आधुनिक लढाऊ विमानविरोधी आणि ड्रोनविरोधी प्रणालीखाली आणली जातील.

- हेमंत महाजन

Powered By Sangraha 9.0