गोंधळ Review : लोकपरंपरेचा अद्भुत गौरव

16 Nov 2025 13:19:03

Gondhal Movie
 
गोंधळ... महाराष्ट्राच्या लोककला परंपरेतील एक समृद्ध परंपरा. हीच लोककला आपल्याला आता रुपेरी पडद्यावर वेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहे. ‘गोंधळ’ हा चित्रपट महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील पारंपरिक, धार्मिक ‘गोंधळ’ परंपरेवर आधारित आहे. दि. १४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा विविध अंगाने घेतलेला आढवा...
 
साधारण ७० ते ८०च्या दशकातला काळ आपल्याला ‘गोंधळ’ या चित्रपटात पाहायला मिळतो. काळाकुट्ट अंधार आणि या अंधारात तयारी सुरू असते, ती गोंधळाची. घरात नवीन जोडप्याचं लग्न झालेलं आहे आणि त्यांच्या सुखी संसारासाठी कुटुंबीयांनी परंपरेनुसार गोंधळाचं नियोजन केलेलं असतं. ठरल्याप्रमाणे गोंधळीसुद्धा हजर असतात. गावातील विशिष्ट सामाजाचे लोक ही परंपरा चालवतात. त्यासाठी लागणारी दिवटी, खंजिरी हे साहित्य त्यांचेच असते. सुमन आणि आनंद या नव्या जोडप्याच्या लग्नानंतरचा हा गोंधळ असतो. चित्रपटातील आनंद ही व्यक्तिरेखा गावच्या पाटील कुटुंबातील दाखवली असली, तरी तो गावचा पाटील नाही. त्यामुळे गावची पाटीलकी आणि त्यासाठी सुरू असलेली चढाओढ आणि क्रूरता, हे सगळं पुढे चित्रपटात पाहायला मिळतं. पण, या गोंधळाच्या रात्री नेमकं काय घडतं? नवी नवरी सुमन पहिल्याच दिवशी सासरी असं काय करते, ज्याने संपूर्ण गावाचं राजकारण आणि पाटीलकीसुद्धा बदलून जाते. हा सगळा सस्पेन्स तुम्हाला चित्रपटातच पाहावा लागेल.
 
चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केले आहे. तसेच कथा, पटकथा आणि संवाददेखील त्यांनीच लिहिलेले आहेत. नावाप्रमाणेच संपूर्ण चित्रपटात आपल्याला ‘गोंधळ’ पाहायला मिळतो. या ‘गोंधळ’भोवतीच सुरू असलेली ही कथा दिग्दर्शकाने अगदी चोखपणे मांडली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चित्रपट ज्या पद्धतीने चित्रित करण्यात आलेला आहे, तो पाहताना ७० ते ८०च्या दशकातला काळ अक्षरशः डोळ्यांसमोर उभा राहतो. संपूर्ण अंधारात चित्रीत केलेला हा चित्रपट, एका उत्तम सिनेमॅटोग्राफीचं उदाहरणच आहे. त्याकाळातील विजेचे दिवे म्हणून वापरले जाणारे कंदील, पोषाख, गोंधळ्यांची वेशभूषा, त्यांची बोलण्याची पद्धत सगळं काही अगदी बारकाईने टिपण्यात आणि दाखवण्यात आलं आहे. कुठेही ग्राफिसचा वापर न करता माणसांची गर्दी आणि चित्रीकरणातील स्थळांमुळे चित्रपटाला आणखीच सुंदर रुप आले आहे. तसेच संपूर्ण चित्रपटात एका रात्रीची कथा असल्याने, संपूर्ण चित्रीकरण हे रात्रीचंच पाहायला मिळते.
 
चित्रपटातल्या पहिल्या वायापासूनच सस्पेन्सला सुरुवात होत असली, तरीही बर्‍याच ठिकाणी चित्रपटात रेंगाळलेला दिसतो. सुरुवातीला निर्माण झालेली उत्सुकता बर्‍याच ठिकाणी ताणली जाते. चित्रपटाने भाषा आणि ग्रामीण बाज अगदी सुंदररित्या जपली आहे, पण आणखी चांगले संवाद नक्कीच होऊ शकले असते. चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके असे बरेच कलाकार आहेत. या कलाकारांनी त्यांची जबाबदारी अगदी उत्तमरित्या पार पाडली आहे. अभिनेते किशोर कदम, सुरेश विश्वकर्मा यांच्या भूमिकांचा विशेष उल्लेख इथे करावा लागेल. याशिवाय, अभिनेता निषाद भोईर यानेही साहाय्यक भूमिकेत विशेष रंगत आणली आहे.
 
दिग्दर्शक संतोष डावखर यांनी चित्रपटाची बांधणी उत्तम केली, असंच म्हणावं लागेल. याशिवाय पारंपरिक गाणीही चित्रपटामध्ये ऐकायला मिळत असल्याने, चित्रपट अधिक मनोरंजक होतोे. तसेच आणखी काही असलेली गाणीही सर्वसाधारण असली, तरी चित्रपटात मनोरंजकता निर्माण करण्यात सहकार्य करतात. महाराष्ट्रातली संस्कृती दाखवणारा आणि त्यावर अशारितीने भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येणं, यासाठीदेखील निर्मात्यांचं आणि दिग्दर्शकांचं कौतुक हे व्हायलाच हवं.
 
दिग्दर्शन : संतोष डावखर
 
कथा, पटकथा आणि संवाद : संतोष डावखर
 
निर्मिती : डावखर फिल्म्स
 
कलाकार : किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे
 
रेटिंग : 3.5
 
- अपर्णा कड
 
 
Powered By Sangraha 9.0