जैन समुदाय हा मुंबईतील शांतताप्रिय, सुशिक्षित आणि सुसंस्कृत असा अल्पसंख्याक समाज आहे, जो सदैव शहराच्या विकासात महत्त्वाचा भागीदार राहिला आहे. परंतु अल्पसंख्याक असल्यामुळे समुदायातील युवक आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काही मूलभूत सुविधांची कमतरता आजही जाणवते.
समुदायाची मुख्य गरज म्हणजे एक आधुनिक क्रीडा संकुल (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) आणि एक जैन विद्यापीठाची स्थापना, ज्यामुळे आपल्या युवकांना खेळ, शिक्षण, संशोधन आणि व्यावसायिक क्षेत्रात अधिक प्रगत होण्याची संधी मिळेल. अशा सुविधा उपलब्ध झाल्यास समुदायातील मुलांना इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही आणि ते स्वतःच्या समाजासाठी तसेच देशासाठी उत्कृष्ट योगदान देऊ शकतील.
क्रीडा संकुलामुळे युवकांच्या तंदुरुस्ती, शिस्त आणि क्रीडा कौशल्यात वाढ होईल, तर जैन विद्यापीठामुळे धर्म, तत्त्वज्ञान, आधुनिक शिक्षण, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रोत्साहन मिळेल. यामुळे केवळ जैन समुदायाचाच नव्हे, तर संपूर्ण शहराच्या शैक्षणिक व सांस्कृतिक विकासालाही नवी दिशा मिळेल.
जैन धर्माशी संबंधित ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांचे संरक्षण, दुरुस्ती किंवा संवर्धन करण्यासाठी महापालिका कोणती मदत देऊ शकते?
मंदिरांच्या आजूबाजूला योग्य स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाइटिंग तसेच अवैध पार्किंग/गर्दीमुळे मंदिर परिसरात होणारी गैरसोय रोखणे आवश्यक आहे. जखमी प्राण्यांसाठी रुग्णवाहिका, त्यांचा देखभाल खर्च आणि स्वच्छता व्यवस्थापनासाठी पालिकेचे सहकार्य आवश्यक आहे. तसेच धार्मिक क्षेत्रांच्या आसपास कत्तलखाने किंवा मांस विक्रीच्या खुले व्यवसायांवर मर्यादित क्षेत्र (बफर झोन) ठेवण्याची आवश्यकता आहे.
- भवरलाल कोठारी, अध्यक्ष, श्री मंडार जैन सेवा संघ