बांते स्री : ख्मेर कलेचा परमोच्च बिंदू

16 Nov 2025 13:31:07
Banteay Srei
 
कंबोडियामधील भारतीय संस्कृतीच्या छटा या सर्वत्र प्रसिद्ध आहेत. कंबोडियाने भारतीय संस्कृती जपली, जोपासली आणि मिरवलीही. याच संस्कृती संवर्धनाच्या मालेतील एक पुष्प म्हणजे ‘बांते स्री’! हे मंदिर म्हणजे वास्तूशिल्पाचा अत्युच्च नमुना ठरते. या मंदिराचा इतिहास, त्याचे स्थापत्य सौंदर्य, विशेषत: अशा विविध अंगाने ‘बांते स्री’चा घेतलेला आढावा...
 
आपण या लेखमालिकेतील काही लेखांमध्ये भारताला भारताबरोबर जोडणार्‍या, वेगवेगळ्या ठिकाणच्या हिंदू मंदिरांबद्दल जाणून घेत आहोत. ही सर्व मंदिरे भारतासाठी सांस्कृतिक सेतू म्हणून काम करतात. कंबोडियामधल्या अंगकोर वट या जगातल्या सर्वांत मोठ्या मंदिराबद्दल आपण जाणून घेतले. या मंदिरासाठी जे दगड वापरले गेले, ते कबाल स्पियन नावाच्या डोंगरातून आणले होते. त्या पवित्र डोंगरावर वाहणार्‍या ओढ्यात, आपल्याला सहस्रलिंग कोरलेले आढळतात. या डोंगराजवळच्या परिसरात, जंगलाच्या कुशीत शांतपणे विसावलेले एक अद्भुत मंदिरही आपल्याला दिसते, बांते स्री! ज्याला ‘स्त्रियांचे गढी’ असेही म्हटले जाते. पण, वास्तवात हे मंदिर एवढे सूक्ष्म, नाजूक आणि सौंदर्यपूर्ण आहे की, याला ‘ख्मेर कलेचा परमोच्च बिंदू’ असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.
 
शिवाला अर्पण केलेल्या ‘बांते स्री’ची निर्मिती, इ.स. दहाव्या शतकात राजा राजेंद्रवर्मन आणि नंतर जयवर्मन पाचव्याच्या कारकिर्दीत झाली. पण, या मंदिराची निर्मिती राजाने केलेली नसून, राजाच्या प्रधानाने केलेली आहे. मंदिराचे नक्षीकाम इतके सूक्ष्म आहे की, सामान्यपणे हे महिला कारागिरांनी केले असल्याचा समज प्रचलित झाला. म्हणूनच या मंदिराला ‘स्त्रियांचा दुर्ग’ हे नावप्रचलित झाले.
 
‘बांते स्री’चे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे गुलाबी वाळूशिलेचे बांधकाम. कंबोडियातील बहुतांश मंदिरे निळसर-धुरकट दगडांनी बांधलेली असताना, ‘बांते स्री’मधील दगड सूर्यप्रकाशात हलकेसे गुलाबी रंगाने झळकतात. हा दगड अतिशय सूक्ष्म कोरीवकामासाठी योग्य असल्याने, कलाकारांनी त्यावर केलेली नक्षी आजही जिवंत दिसते. मंदिराचा प्रत्येक भाग कोरलेला आहे. कमानी, प्रवेशद्वारे, स्तंभ, छत, बोलके शिल्पपट हे सर्व मिळून, या मंदिराला एका कोरलेल्या कवितेत रूपांतरित करतात.
‘बांते स्री’चे आकारमान मोठे नाही; उलट ते अंकोरवाटच्या तुलनेत अगदीच लहान. पण त्या मर्यादित आकारात कलाकारांनी सर्वोच्च कलासंपदा घडवली आहे.
 
गर्भगृह-शिवलिंग प्रतिष्ठित, अंतराळ (अंतरा)-गर्भगृहाकडे जाणारा पवित्र मार्ग, मंडप-जिथे विधी होत, द्वारशाखा-अतिशय नाजूक कोरीवकामाने परिपूर्ण, प्राकार-मंदिराला वेढणार्‍या भिंती अशी या मंदिराची मूलभूत रचना आहे. द्वारशाखांवरील मकरतोरण, कमलमाला, प्रतिमा, नृत्यरत अप्सरा, नंदी यांची नक्षी इतकी सूक्ष्म आहे की दगड नव्हे, तर मेणावरील कोरीव काम वाटते. अंकोरच्या सर्व मंदिरांमध्ये अप्सरा नृत्यात गुंग झालेल्या दिसतात, पण ‘बांते स्री’तील अप्सरा विशेष. त्यांचे दागिने, वस्त्रे, हातांच्या मुद्रा आणि डोळ्यांतील भाव-सर्वच शिल्प अत्यंत नाजूक आणि स्त्रीसौंदर्याला गौरवणारे. ही शिल्पे दर्शवतात की ख्मेर कलाकारांनी स्त्रीचे सौंदर्य, तिची कोमलता, तिची ऊर्जा-एका अद्वितीय आदराने मांडली आहे. ‘बांते स्री’ हे एक शिल्पग्रंथ म्हटले, तरीही वावगे ठरणार नाही. इथे रामायण, महाभारत, पुराणांमध्ये आलेल्या अनेक कथा कोरलेल्या आहेत. त्यातल्या काहींचा परिचय आपण इथे करून घेऊया...
 
आपल्या गर्वाच्या धुंदीत अखंड कैलास पर्वत लंकेला घेऊन जाण्याच्या उद्देशाने रावणाने उचलला, सगळीकडे पळापळ झाली. पण, शिव मात्र शांत होते. त्यांनी फक्त पायाच्या अंगठ्याने तो पर्वत खाली दाबला आणि त्याचा भार रावणावर आला. हे असह्य होऊन त्याला आपल्याला चुकीची जाणीव झाली आणि त्याने शिवाकडे यातून मुक्त करा, अशी याचना केली, ही ती कथा आहे. इथे शिल्पामध्ये सर्वांत खाली अनेक हातांचा आणि अनेक चेहर्‍यांचा रावण दाखवला आहे. सिंह, हत्ती, हरणे हे प्राणी लांब पळताना दाखवले असून गणपती, वानर, साधू हात जोडून बसलेले दिसतात. सर्वांत वरच्या भागात शिव-पार्वती कोरलेले आहेत. पार्वती ही शिवाच्या मांडीवर बसलेली असून, शिव अतिशय शांत मुद्रेमध्ये दाखवले आहेत. या शिल्पातील आजूबाजूचे केलेले नक्षीकामदेखील बघण्यासारखे आहे.
 
महाभारतातला खांडव वन जाळण्याचा प्रसंगदेखील इथे कोरलेला आहे. शिल्पपटात खाली दोन्ही बाजूला दोन पुरुष आकृती आहेत. एका बाजूला अर्जुन असून, दुसर्‍या बाजूला चार हातांचा कृष्ण कोरलेला आहे. मध्ये जंगल, पशुपक्षी दाखवलेले आहेत. जंगलाला आग लागल्यावर नागराज इंद्राला ‘आम्हाला वाचव’ अशी विनवणी करतो. इंद्र आकाशातून पाऊस पडायला सुरुवात करतो. अर्जुन आपल्या बाणांनी तो पाऊस अडवतो, हा सर्व प्रसंग इथे शिल्पात कोरलेला आहे.
 
या शिल्पांबरोबरच जरासंध वध, तारा विलाप, शिव आणि मदन कथा, नटराज, अभिषेक लक्षी अशा अनेक गोष्टी इथे कोरलेल्या आपल्याला दिसतात. काळाच्या ओघात ‘बांते स्री’ हरवत गेले. जंगलाने ते झाकले, हवामानाने त्याची झीज केली. १८९९ मध्ये फ्रेंच संशोधकांनी हे मंदिर पुन्हा शोधले. नंतर संरक्षण आणि पुनर्बांधणीची कामे सुरू झाली. आज हे मंदिर कंबोडियातील संवर्धनाचे सर्वांत यशस्वी उदाहरण आहे.
 
पहाटेच्या किंवा संध्याकाळच्या प्रकाशात ‘बांते स्री’चा दगड जसा झळकतो, तसा संपूर्ण कंबोडियात कुठेच नाही. गुलाबी दगडाच्या सूक्ष्म कोरीवकामात सूर्यकिरण शिरतात आणि मंदिर जणू सुवर्णछटा धारण करते. ‘बांते स्री’ इतर मंदिरांपेक्षा लहान असले, तरी आत्म्याला भिडणारे आहे. इथे कोरलेल्या प्रत्येक कथा भारतीय आहे, परंतु त्यातील कलात्मकता ख्मेर कलेने घडवलेली आहे. शिव, विष्णू, रामायण-महाभारत-हे सर्व दगडात जिवंत आहेत. हे मंदिर केवळ स्थापत्यकृती नाही, तर भारत आणि कंबोडियाच्या नात्याचा शाश्वत पुरावा म्हणून उभे आहे. कंबोडियाला यासाठी सर्वांनी एकदातरी नक्की जाऊन या!
 
- इंद्रनील बंकापुरे 
 
 
 
Powered By Sangraha 9.0