आज दि. १५ नोव्हेंबर, कार्तिक वद्य एकादशी. महाराष्ट्रामध्ये आषाढातल्या आणि कार्तिकातल्या दोन्ही एकादशींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माची, भागवत धर्माची ध्वजा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण आर्यावर्त हिंदुस्थानात अखंड फडकावत ठेवणार्या वारकरी संप्रदायाच्या आणि सर्व संतसज्जनांच्या दृष्टीने तर या दिवसांचे महत्त्व शब्दातीत आहे. ठीक चार वर्षांपूर्वीसुद्धा म्हणजेच दि. १४ आणि १५ नोव्हेंबर २०२१ रोजी कार्तिकातील वद्य एकादशी होती. परंतु, या दिवशी विठ्ठलाच्या पायींची वीट थरारली, वीणेच्या तारा एकाएकी स्तब्ध झाल्या आणि या महाराष्ट्राच्याच मातीतील नव्हे, केवळ भारतवर्षातीलच नव्हे, तर पृथ्वीच्या पाठीवर जिथे जिथे शिवचरित्र पोहोचले आहे, त्या सर्वच ठिकाणच्या शिवप्रेमींच्या, इतिहासप्रेमी, शिवभक्त राष्ट्रभक्तांच्या हृदयाचा बांध फुटला आणि शिवभक्तीची चंद्रभागा अक्षरशः लक्षावधी शिवभक्तांच्या नयनांतून वाहू लागली.
शिवचरित्राचे जगद्विख्यात व्याख्याते आणि लेखक पुरंदरे कुलोत्पन्न समस्त इतिहाससंशोधक कुलावतंस पुरंदरे कुलोत्पन्न मोरेश्वरसुत शिवशाहीर श्रीमंत बळवंतराव मोरेश्वरराव तथा बाबासाहेब पुरंदरे आपली इहलोकीची यात्रा संपवून खर्या अर्थाने ‘शिवलोकी’ गमन करते जाहले. याच पवित्र दिवशी बाबासाहेबांच्या जीवनाच्या पंचारतीच्या ज्योती शिवतेजामध्ये विलीन झाल्या. विठ्ठलाच्या नामसंकीर्तनामध्ये तल्लीन झालेला वारकरी ज्याप्रमाणे विठ्ठलाच्या ओढीने पंढरीकडे धाव घेतो, त्याप्रमाणेच हा अत्यंत कर्मनिष्ठ, शिवयोगी, इतिहासाचा आणि शिवचरित्राचा अत्यंत डोळस पुजारी, महर्षी वाल्मिकींच्या प्रतिभेचा, राजर्षी वसिष्ठ महामुनींच्या ज्ञानाचा, ब्रह्मर्षी विश्वामित्रांच्या आणि श्रीमत् वेदव्यासांच्या सिद्धहस्त प्रतिभेचा स्पर्श ज्याच्या लेखणीला झाला आहे, असा हा महान शिवशाहीर आपल्या विठ्ठलाला त्या जाणत्या राजाला भेटण्यासाठी वैकुंठगमन करता झाला.
मागे वळून पाहताना मला स्वतःला गुरुवर्य कैलासवासी बाबासाहेबांचा जो काही सोनचाफ्यासारखा दरवळणारा सहवास लाभला आणि त्यांच्या त्या शिवकार्यामध्ये खारीचा वाटा उचलता आला, तो सर्व प्रवास आठवतो. खरं तर बाबासाहेब आज आपल्यात नाहीत, ही वस्तुस्थिती पचवणे अत्यंत जाड जातं. परंतु, त्याच क्षणी मन सांगतं की, वेडा आहेस तू. बाबासाहेबांच्या त्या शारीरिक अस्तित्वाच्या शोधात अडकून पडला आहेस. परंतु, बाबासाहेब गेले आहेतच कुठे आपल्यातून? सह्याद्रीच्या उत्तुंग माथ्यावर वसलेल्या गिरिदुर्गांवरील शिवचरणांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या मातीच्या कणाकणात, त्या सिंधुसागराच्या उसळत्या लाटांमधून, शिवरायांचा पराक्रम दिशांतरी घेऊन जाणार्या मावळ वार्यातून, सह्यशिखरांना कवेत घेणार्या मेघमालांतून, बारा मावळांतून खळाळणार्या शिवगंगांच्या प्रवाहातून, सह्याद्रीच्या गिरिशिखरांवरून कोसळणार्या प्रपातांमधून प्रकट होणार्या शिवचरित्राच्या रूपाने बाबासाहेब आहेतच की!
साधना, साधक आणि साध्य ही त्रिपुटी जिथे शिल्लकच राहात नाही, तिथे उरते ते केवळ आणि केवळ विमल ब्रह्म! बाबासाहेबांना शोधायचंच असेल तुला, तर उगाच नसती खटपट करण्यापेक्षा ‘राजा शिवछत्रपती’ची पानं उलटून पाहा, ऐतिहासिक कागदपत्रं चाळून पाहा. त्यात बाबासाहेब नाहीत काय? साधना फलद्रूप झाली की, देव आणि भक्त वेगळेपणाने उरतातच कुठे? त्याप्रमाणेच बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ज्याप्रमाणे समर्थांनी आपला पंचभौतिक देह त्यागताना सांगितलं होतं की,
नका करू खटपट| पहा माझा ग्रंथ नीट|
तेणे सायुज्याची वाट| गवसेल की|
त्याप्रमाणेच बाबासाहेब शिवचरित्रात सामावलेले आहेत, तद्रूप होऊन गेले आहेत.
शुक्रवार, दि. १३ ऑगस्ट २०२१ श्रावण शुद्ध पंचमीला, म्हणजेच नागपंचमीला १००व्या वर्षात बाबासाहेबांनी पदार्पण केलं. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, केवळ भारतवर्षातीलच नव्हे, तर अखिल भूमंडळाच्या ठायी असलेल्या शिवभक्त मराठी माणसासाठी हा अमृताचा क्षण होता. ‘सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला’ हीच भावना सर्वांच्या मनात होती. परमआदरणीय बाबासाहेबांची शताब्दी साजरी करायला मिळणे, हे आपले परमभाग्य आहे, असंच तेव्हा बाबासाहेबांचा शिवसहवास लाभलेल्या अगणित लोकांना वाटलं होतं. मीसुद्धा त्यातलाच एक!
बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे अनेकजण करत आहेत. परंतु, बाबासाहेब हे आजवर न उलगडलेले कोडेच होते. बाबासाहेबांच्या बहुविध पैलूंनी नटलेल्या व्यक्तिमत्त्वाचा वेध आणि शोध घ्यायला जावे, तो ग्रंथराज ‘श्रीमद् दासबोधा’च्या अंती श्रीसमर्थांनी म्हटल्याप्रमाणे ‘आपली अवस्था विवरता विशेषाविशेष कळों लागे’ अशीच होते आणि त्या जगन्नियंत्या विधात्याने पृथ्वीतलावर पाठवलेल्या या शिवदूताला पाहून आपण नकळतच नतमस्तक झाल्याशिवाय राहात नाही. पर्वतीकर पुरंदरे कुळामध्ये प्रतिमा, प्रतिभा, ज्ञान, दीर्घसूचना आणि साक्षेप ही पाच हत्यारे घेऊन बाबासाहेब जन्माला आले आणि आपल्या आयुष्याचे ध्येय त्यांना विद्यार्थीदशेतच गवसले. बालपणीच बाबासाहेबांनी त्या दिव्य शिवलीलामृताचे प्राशन केले आणि ‘अंतरी गेलिया अमृत| बाह्यकाया लखलखीत|’ असे त्यांचे जीवन झाले आणि ही अनुभूती जनसामान्यांना देण्यासाठी ऐन तारुण्यातच बाबासाहेब सर्वार्थाने सज्ज झाले.
बाबासाहेबांचे तीर्थरूप उत्तम चित्रकार आणि मातोश्री उत्तम कथाकथनकार, मात्यापित्यांनी दिलेल्या अग्निसम पवित्र अशा संस्कारांच्या शिदोरीवर, आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरणादायी सहवासात बाबासाहेबांचा राष्ट्रभक्तीचा पिंड पोसला गेला आणि ती डोळस राष्ट्रभक्ती करण्यासाठी लागणारे साधनही त्यांना लाभले, ते म्हणजे शिवचरित्र! याच शिवचरित्राने बाबासाहेबांना पुरते झपाटून टाकले, जीवनाचे लक्ष्य दिले. आणि याच शिवचरित्राचा प्रसाराचे शिवधनुष्य बाबासाहेबांनी गेली ८० वर्षे यशस्वीपणे पेलले आहे. तीर्थरूप बाबासाहेबांचा हा ९९ वर्षांचा स्फूर्तिदायक प्रवास म्हणजे श्रवण, मनन, अखंडित निजध्यास आणि अंतरी धरलेला अभ्यास ही चतुःसूत्रीच होती.
बाबासाहेबांचा हा ९९ वर्षांचा जीवनप्रवास वरवर कितीही वलयांकित वाटत असला, तरी तो अत्यंत आव्हानात्मक होता, हे त्यांचे तपःपूत जीवन ज्यांनी जवळून पाहिलेलं होतं, नव्हे नव्हे अनुभवले होतं, त्यांनाच माहीत आहे. इतिहासाच्या, विशेषतः शिवचरित्राच्या डोळस आणि शास्त्रशुद्ध संशोधनासाठी बाबासाहेबांनी ‘सकल सुखांचा करोनि त्याग, आधी तो साधिजे योग शिवसाधनेची लगबग कैसी केली,’ असेच म्हणावे लागेल. इतिहासाचार्य राजवाडे, गुरुवर्य ग. ह. तथा तात्या खरे, आवळसकर, शं. ना. जोशी, कृष्णाजी वासुदेव पुरंदरे यांसारख्या जुन्याजाणत्यांनी वाटा शोधून ठेवल्या होत्या, त्या खडतर वाटांवरून बाबासाहेब अक्षरशः तहान-भूक विसरून उर फुटेस्तोवर धावले, विस्मरणात गेलेल्या, अज्ञान आणि अनास्था यांमध्ये अडकलेल्या इतिहासाचे त्यांनी अत्यंत चिकित्सक प्रवृत्तीने संशोधन केले; परंतु त्याची मांडणी करताना त्यातून राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग कसे प्रज्ज्वलित होईल; समाजमनात वीर रस निर्माण होईल, अशा पद्धतीनेच तो मांडला.
इतिहास म्हणजे केवळ लढाया, युद्धांचा, रक्तामांसाच्या चिखलाने माखलेला, निराशांनी वेढलेला लिष्ट भाषेत अडकलेला आणि केवळ सन-सनावळी यांमध्ये गुरफटलेला एक रुक्ष विषय, या गैरसमजातून सामान्य माणसाला बाहेर काढून, इतिहास किती प्रेरणादायी, स्फूर्तिदायी आणि सुंदर मनोरम असू शकतो, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. त्यासाठी त्यांनी केवळ ऐतिहासिक कागदपत्रांचा आणि दस्तऐवजांचाच नव्हे, तर लोप पावत चाललेल्या असंख्य लोककला, चित्रकला, वस्त्रप्रावरणे, शस्त्रास्त्र, मंदिरे आणि लेण्यांमध्ये अवतरलेली अप्रतिम शिल्पं, गायन, नृत्यकला, पोवाडे, कीर्तनं, भारुडं, संतांच्या गाथा यांचा सुयोग्य आधार घेतला.
सामान्यातील सामान्य वाचकालाही मोहिनी घालेल, अशा ललित शैलीमध्ये परंतु ऐतिहासिक सत्याला कोठेही जरादेखील धक्का लागणार नाही, याची जीवापाड काळजी घेत, परंतु निर्भीडपणे इतिहास जिवंत केला. जिथे जिथे काही ऐतिहासिक दस्तऐवज आहे, हे ध्यानी आले, तिथे तिथे ऊन, वारा, पाऊस या कशाचीही पर्वा न करता, मिळेल त्या वाहनाने प्रवास करत, सायकलीच्या पायट्या मारत, हाल-अपेष्टा सहन करत, वेळप्रसंगी मानापमान याची पर्वा न करता, ती बहुमोल ऐतिहासिक साधने प्रकाशात आणली. अभ्यास हा तर त्यांच्या कार्याचा प्राणच.
अभ्यासे प्रकट व्हावे|
नाहीतर झाकोनि असावे|
प्रकटोनि नासावें|
हे बरे नव्हे|
हे समर्थवचन म्हणजे तर बाबासाहेबांच्या कार्याचा आत्माच होता! बाबासाहेब ज्यांना अत्यंत मानत असत, ज्यांचा उल्लेख बाबासाहेब नेहमीच ‘इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातील हिरा’ म्हणून मोठ्या सन्मानानं करत असत, असे प्रख्यात इतिहास संशोधक, अत्यंत कर्मनिष्ठ, ऐतिहासिक सत्य कथन करताना जे परिणामांची कोणतीही तमा बाळगत नसत, अशा इतिहासरत्न विद्वच्चुडामणी गजाननराव भास्करराव मेहेंदळे यांचं नुकतंच देहावसान झालं. "मी शिवचरित्र बाबासाहेबांच्या खांद्यावर बसून बघितलं,” असं आदरणीय गजाननराव सांगत असत. इतकंच नाही, तर इतिहासकाराकडे एकच शस्त्र आहे, ते म्हणजे परिणामांची तमा न बाळगता सत्य सांगत राहणे.
गजाभाऊंच्या या वायाची मूर्तिमंत आणि रोकडी प्रचिती म्हणजे तीर्थरूप गुरुवर्य बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेलं इतिहास संशोधनाचे आणि कथनाचे कार्य. हे सर्व शिवकार्य करताना बाबासाहेबांनी त्या कार्याचे किंवा त्याच्या यशाचे कर्तेपण कधीही, कोठेही आपल्याकडे घेतले नाही, तर ही सर्व श्रीजगदंबेची कृपा आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे, या कार्याचे श्रेय या शिवकार्यात सहभागी झालेल्या माझ्या सहकार्यांचे आहे, हीच भावना त्यांच्या वर्तनातून सतत प्रकट होत असे.
मी कर्ता ऐसे म्हणसी|
तेणे तू कष्टी होसी|
राम कर्ता म्हणता पावसी|
येश कीर्ती प्रताप|
या ओवीचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे. ९९ वर्षांच्या आपल्या जीवनयात्रेत बाबासाहेबांनी अक्षरशः हजारो माणसे जोडली, अफाट लोकसंग्रह केला, कितीतरी माणसे घडवली, कित्येकांसाठी ते आश्रयस्थान झाले, मावळातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांतून आलेल्या अनेक गरजू, होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आपल्या पुरंदरे वाड्याची कवाडे खुली केली. या सर्व उपक्रमांतून अनेक उत्तमोत्तम कलाकार, शास्त्रज्ञ, गायक, शिल्पकार, इतिहास अभ्यासक, दुर्गअभ्यासक, शिक्षक, सेनाधिकारी निर्माण झाले.
बाबासाहेबांच्या पुरंदरे वाड्यातील त्यांची सदर म्हणजे तर या अनेक गुणिजनांचा दरबारच! इतिहासात रमणार्या बाबासाहेबांना इतिहासाचे नेमके ज्ञान होते, वर्तमानाचे भान होते आणि भविष्याचीदेखील जाण होतीच होती! अवघ्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील जिंजी या दुर्गाची अशी एकूण १२ शिवदुर्गांची वर्णी जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये लागली. बाबासाहेबांचा या सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेल्या आणि सिंधुसागराच्या बेटांवर त्याच्या उसळत्या लाटांचा शतकानुशतके सामना करत उभ्या असलेल्या शिवदुर्गांवर अनन्य अनुराग म्हणजे भक्तियुक्त प्रेम होते.
दिवसेंदिवस ढासळणार्या आणि अज्ञान अनास्थेमुळे दुर्लक्षाच्या गर्तेत सापडलेल्या या इतिहासाच्या साक्षीदारांची आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या वास्तुपुरुषांची दुरवस्था आणि समाजानं केलेली अक्षम्य हेळसांड पाहून बाबासाहेबांचं अंतःकरण अक्षरशः अंतर्बाह्य हेलावून जात असे. यातील निदान २५ शिवदुर्ग तरी शासनाच्या पुढाकाराने आणि डोळस लोकसहभागाने मॉडेल स्वरूपात पुनश्च एकवार उभे करावेत, तिथे ध्वनिप्रकाशयोजना निर्माण करून इतिहास जिवंत करावा, डोळस दुर्गपर्यटनाला चालना द्यावी आणि शिवरायांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन राष्ट्रगुरू समर्थांच्या स्वप्नातील आनंदवनभुवन आणि त्या शिवकल्याणराजाच्या संकल्पातील समृद्ध, संपन्न आणि सामर्थ्यशाली श्रींचं राज्य निर्माण करावं, ही त्यांच्या अंतरीची तळमळ होती.
‘युनेस्को’ जागतिक वारसास्थळांच्या सूचीमध्ये या १२ शिवदुर्गांच्या समावेशामुळे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे हे स्वप्न आता सत्यात उतरण्याच्या दिशेने आता एक पाऊल पुढे पडले आहे, असे आपण म्हणू शकतो.
हे सर्व कार्य करीत असताना बाबासाहेबांवर अनेक संकटे, उपेक्षेचे आणि अपमानाचे प्रसंग आले, किंबहुना काही नतद्रष्ट आणि विघ्नसंतोषी मंडळींनी असे प्रसंग हेतुपुरस्सर निर्माण केले. परंतु याही परिस्थितीत आदरणीय बाबासाहेब सह्याद्रीच्या शिखरासारखे अडिग आणि शांत राहिले.
उदंड धिक्कारूनी बोलती|
परी चळो नेदावी शांती|
दुर्जनांसी मिळोन जाती|
धन्य ते साधू|
या ओवीचा प्रत्यय बाबासाहेबांनी आपल्या आचरणातून आणून दिला. ३५० वर्षांपूर्वी राष्ट्रगुरू समर्थ रामदासस्वामींनी माझ्या रामाचे चरित्र, सर्वांमाजी अतिपवित्र असा जयघोष करत आसेतु हिमाचल पसरलेल्या आर्यावर्त हिंदुस्थानमधला हिंदू श्रीरामकथेच्या माध्यमातून जागृत केला, मृतप्राय झालेल्या या हिंदुराष्ट्राला नवसंजीवनी दिली आणि रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड नेण्याचा निर्धार केला, यातून प्रेरणा घेऊन या आधुनिक काळात शिवकथा ब्रह्मांड भेदून पैलाड नेण्याचा वज्रनिश्चय बाबासाहेबांनी केला आणि देश-विदेशांमध्ये मिळून त्यांनी आजवर सुमारे १५ हजार व्याख्याने दिली, ‘जाणता राजा’ सातासुमुद्रापार नेला, यातून मिळवलेल्या अपार धनातील हविर्भाग त्यांनी ’राष्ट्राय स्वाहा इदं न मम’ या उदात्त भावनेने समाजपुरुषाला आणि राष्ट्राला अर्पण केला, येणार्या कित्येक पिढ्यांना जाज्ज्वल्य राष्ट्रभक्ती आणि प्रखर धर्माभिमानाची प्रेरणा देणार्या आंबेगाव, पुणे येथील शिवसृष्टीसारख्या प्रकल्पाची निर्मिती केली.
‘श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम| अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्|’ या नवविधाभक्तीची परंपरा शिवाजी महाराजांची डोळस भक्ती करण्यासाठी त्यांनी आचरली. त्यांनी बालपणापासून ध्यास घेतला तो शिवचरित्राचाच, कथा श्रवण केल्या त्या शिवकल्याण राजाच्याच, व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी शिवप्रभूंचेच कीर्तन केले, अखंडित स्मरण केले ते महाराजांच्या रूपाने मानवी स्वरूपात प्रकट झालेल्या सगुण साकार शिवब्रम्हाचे, संपूर्ण भारतमातेला शिवस्वरूप मानून तिची पादसेवनभक्ती केली, ‘शिव भावे जीव सेवा, दरिद्री नारायणाची पूजा’ हे सूत्र मानून अनेक गोरगरिबांची सेवा केली, महाराजांच्या समाधीपुढे रात्री अपरात्री, ऊन वार्यात, कोसळत्या पावसात नतमस्तक होत वंदनभक्ती साधली, दास्य केले तेही शिवाजी महाराजांचेच आणि हे सर्व करत असताना या सर्व सेवेला मीपणाचा वारा यत्किंचितदेखील लागणार नाही, याची काळजी घेत आत्मनिवेदनभक्ती साधण्याचा त्यांचा अखंडित प्रयत्न होता.
बाबासाहेबांच्या या निस्वार्थ सेवेची दखल घेऊन त्यांना केंद्र शासनाने ‘पद्मविभूषण’ या देशाच्या द्वितीय क्रमांकाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले. परंतु, हे सर्व होत असताना नियतीच्या, त्या जगन्नियंत्याच्या मनात मात्र काही वेगळेच असावे.
बाबासाहेबांच्या मुखातून त्या शिववेदाच्या ऋचा श्रवण करताना शिवचरित्राच्या आणि मराठी भाषेच्या नवरसांत सचैल नाहून निघणार्या शिवप्रेमींचा, कैलासावरील शिवगंगाधराच्या जटेतून अवतारणार्या पुण्यसलीला गंगेमध्ये आपण डुंबत आहोत की काय, अशी सात्त्विक आनंदाची अनुभूतीच येणार्या शिवभक्तांच्या या भाग्याचा हेवाच साक्षात भगवंताला वाटला असावा. आणि म्हणूनच की काय, कार्तिक वद्य एकादशी दि. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी त्याने देवलोकी श्रीकैलासावर शिवचरित्राचा वाग्यज्ञ संपन्न करण्यासाठी आणि शिवचरित्राचे आनंददायी, प्रेरणादायी श्रवण करण्यासाठी या शिववैदिकाला, या शिवभागवताला आज्ञा केली.
बाबासाहेबांच्या या वैकुंठगमनाच्या आधी नेमके एक वर्ष आधी याच दिवशी म्हणजे, कार्तिक वद्य एकादशीला बाबासाहेबांचे मानसपुत्र आणि बाबासाहेबांना अक्षरशः तळहातावरील फोडाप्रमाणे जपणार्या, बाबासाहेबांची जणू सावलीच असलेल्या प्रतापराव टिपरे यांना देवाज्ञा झाली. हा केवळ योगायोगच का? की काही ईश्वरी योजना? बाबासाहेब जिथे जिथे जातील तिथे तिथे स्वतः आधी प्रतापराव स्वतः जाऊन सर्व काही योजना अत्यंत बारकाईने करत असत, मग तो ‘जाणता राजा’चा प्रयोग असो वा बाबासाहेबांची व्याख्यानमाला. प्रतापरावांच्याशिवाय बाबासाहेबांचे पान हलत नसे. परमेश्वराला, साक्षात त्या कैलासनाथालादेखील याची कल्पना असावी, म्हणूनच त्या देवलोकात या शिवयोगी, शिवमहर्षी, शिवशाहिराची शिवकथा, हे शिवभागवत श्रवण करण्यापूर्वी तेथील सर्व व्यवस्था अगदी बाबासाहेबांना नेहमीच हवी असे, हे पाहण्यासाठीच प्रतापरावांना तातडीने बोलावून घेतले. प्रतापराव टिपरे म्हणजे बाबासाहेबांचा साक्षात दक्षिण बाहू, साक्षात बहिश्चर प्राणच. तो कैलासवासी झाल्यावर, त्याने वैकुंठगमन केल्यावर त्याच दिवशी पुढच्याच वर्षी बाबासाहेबांनी त्याच तिथीला म्हणजे कार्तिक वद्य एकादशीला आपली इहलोकीची शिववारी सुफळ संपूर्ण करून आपल्या आयुष्याची पंढरी करून, साक्षात शिवरायांना आणि देवसभेला शिवचरित्राच्या त्या पावन शिवगंगेत नाहू घालण्यासाठी आपल्या पंचभौतिक देहाचा त्याग करून या जगाचा निरोप घेतला.
आता असं वाटतं की, वैकुंठामध्ये, कैलासावर, देवसभेमध्ये हा शिवशाहीर शिवचरित्राचे ते अत्यंत रसाळ कीर्तन आपल्या अमोघ, ओजस्वी वाणीतून हातातल्या डफावर थाप देऊन रंगवत असेल! शिवचरित्राच्या त्या नवरसांनी ओथंबून वाहणार्या शिवगंगेमध्ये अवघी देवसभा देहभान हरपून त्या शिवगंगेमध्ये सचैल डुंबत असेल, त्या शिवकल्याण राजाचे ते गुणानुवाद श्रवण करण्यासाठी अवघ्या अवघ्या देवदेवता दाटी करून उभ्या असतील, उमामहेश्वर ते पवित्र शिवचरित्र ऐकण्यात रंगून गेले असतील, त्या सभेत श्रीराम देखील आपल्या लाडया हनुमंतासह उपस्थित असतील, योगेश्वर भगवान श्रीकृष्ण त्याचीच कृष्णनीती सांगणार्या शिवगीतेचे रसपान करण्यासाठी अर्जुनादी पांडवांसाठी त्या सभेत नक्कीच असतील, आपल्या या शिष्योत्तमाचे चरित्र श्रवण करण्यासाठी समर्थ रामदासस्वामी कल्याणस्वामींसह उपस्थित असतील, आर्य संस्कृतीचं मूर्तिमंत उदाहरण शिवचरित्राच्या रूपात पाहण्यासाठी श्रीधरस्वामी असतील, माझ्या मराठीचिया बोलू कौतुके ख परी अमृतातेही पैजा जिंके अशी पैज साक्षात वाग्देवीशी लावणारे कैवल्यचक्रवर्ती ज्ञानेश्वरमहाराज सुद्धा आपल्या तीनही भावंडांनीशी, नामदेव, तुकाराम, चोखोबा, गोरोबा, यांच्यासह तिथे असतील!
आपल्या लाडया, प्राणप्रिय राजाचं हे कौतुक ऐकण्यासाठी बाजी, येसाजी, मुरारबाजी, तान्हाजी, मोरोपंत असंख्य मावळ्यांनिशी तिथेच असतील, आपल्या या सुपुत्राची ही पुण्यगाथा हृदयात साठवण्यासाठी महाराज शाहजीराजे आणि राजमाता जिजाऊसाहेबांसह तिथेच असतील, आज्ञापत्रकार रामचंद्रपंत अमात्य असतील, ज्यांची काव्यप्रतिभा पाहून साक्षात महाकवी कालिदासांनीदेखील चकित व्हावं असे कवीराज भूषण असतील, कवींद्र परमानंद नेवासकर, राजगडाच्या सदरेवर जिजाऊसाहेबांच्या आज्ञेवरून महाराजांचा पोवाडा रचणारा आणि गाणारा आमचा मराठमोळा शाहीर अज्ञानदास असेल, अहद तंजावर तहद पेशावर श्रीचं राज्य ! हिंदवी स्वराज्य! अशा स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यात करणारे शाहमत पनाह श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असतील, श्रीशिवाजी रायड स्मारक मंडळाचे जनक लोकमान्य टिळक असतीलअहद तंजावर तहद पेशावर श्रीचं राज्य! हिंदवी स्वराज्य!
अशा स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यात करणारे शाहमत पनाह श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असतील, त्या हिंदुनृसिंह शिवरायांची डोळस शिवभक्ती आयुष्यभर आचरणात आणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, ‘होय मी म्हणतो, हे हिंदुराष्ट्रच आहे’ अशी गर्जना निडरपणे करणारे आद्यसरसंघचालक डॉटर हेडगेवारही असतील, बाबासाहेबांवर सख्ख्या भावाप्रमाणे प्रेम करणारे, आणि त्यांच्या बरोबर रात्री अपरात्री दुर्गभ्रमंती करणारे दुर्गमहर्षी गोनीदा ताठ अप्पासाहेब दांडेकर तर असतीलच असतील, या देशासाठी प्राणार्पण केलेले परमवीरचक्र विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल, कॅप्टन मनोज पांडे, कॅप्टन अनुज नय्यर, कॅप्टन विक्रम बत्रा, महावीरचक्र विजेते मेजर चक्रपाणी आणि असंख्य ज्ञात अज्ञात वीर त्या जाणत्या राजाचे अतिपवित्र, अत्यंत प्रेरणादायी, निष्कलंक चरित्र आणि चारित्र्य अनुभवण्यासाठी त्याच सभेत असतील! अगदी हृदयाच्या करणसंपुटात ते शिवचरित्रामृत साठवून पुनःश्च एकवार या भरतभूमीला संपूर्ण विश्वात सर्वात सामर्थ्यशाली बनवण्यासाठी याच भरतभूमीच्या कुशीत शिवचरित्राचा हा शिवगायत्रीमंत्र श्रावण करून पुन्हा एकदा जन्म घेण्यासाठी!
आणि हा पुरंदरे कुलोत्पन्न मोरेश्वरसूत सरस्वतीपुत्र शिवशाहीर त्या अभंग शिवचरित्राच्या शिवकीर्तनात तल्लीन होऊन गात असेल - काळ देहासी आला|आम्ही आनंदे नाचू गाऊ॥
- विद्याधर रायरीकर