रेल्वेमार्गांवर सौरक्रांती

15 Nov 2025 10:33:26
Solar panels
 
जागतिक स्तरावर शाश्वत ऊर्जेची गरज झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमध्ये सुरू होणारा रेल्वेमार्गावरील ‘रिमूव्हेबल सोलर पॅनेल’ प्रकल्प स्वच्छ ऊर्जानिर्मितीत मोठी क्रांती ठरू शकतो. भारतातही नुकतेच बनारस लोकोमोटिव्ह वर्स, वाराणसी येथे भारतातील पहिले ७० मीटर ‘रिमूव्हेबल सोलर पॅनेल’ सिस्टम बसवून भारतीय रेल्वेने या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे. या दोन्ही उपक्रमांमुळे जगभरातील रेल्वे पायाभूत संरचनेतून अक्षय ऊर्जेचा मोठा स्रोत निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
स्वित्झर्लंडमधील स्टार्टअप ‘सन वेझ ईपीएफएल’ या प्रतिष्ठित तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने एक अनोखा पायलट प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नेयुशातेलजवळील बट्स स्टेशन परिसरात १०० मीटर रेल्वेमार्गावर ४८ सौर पॅनेल्स बसवले जाणार असून हा तीन वर्षांचा पायलट प्रकल्प ६.०४ कोटी इतया निधीतून उभारला जात आहे. ही व्यवस्था दरवर्षी १६ हजार केव्हीएच वीजनिर्मिती करेल. जो त्याभागातील निवासी विजेची गरज भागविण्यात सक्षम असेल. या तंत्रज्ञानाचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे त्याची काढता येण्याजोगी ( removable ) रचना आहे. देखभाल, दुरुस्ती किंवा पायाभूत कामांसाठी हे पॅनेल्स काही मिनिटांत उचलता येतात, ज्यामुळे रेल्वे वाहतूक अबाधित राहते. हीच वैशिष्ट्ये भारतासह जगभरातील रेल्वे नेटवर्कसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात.
स्वित्झर्लंडमधील ‘फेडरल ऑफिस ऑफ ट्रान्सपोर्ट ( FOT )’ यांच्या परवानगीने ‘सन-वेझ’ या स्टार्टअपने रेल्वेमार्गावर सौर पॅनेल्सची स्थापना केली.
 
‘सन-वेझ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जोसेफ स्कुडेरी म्हणाले, "आम्ही हे पॅनेल्स अगदी घराच्या छतावर लावतो. तसेच लावले आहे,” असे ते स्विस इन्फोला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले. त्यांनी पुढे नमूद केले की, "या प्रकल्पाची वाटचाल अत्यंत खडतर होती. २०२३ मध्ये ‘एफओटी’ने हा प्रस्ताव नाकारला होता. कारण पॅनेल्समुळे रेल्वेची सुरक्षितता, दुरुस्ती आणि देखभाल प्रक्रियेला धोका निर्माण होऊ शकतो,” अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. परंतु, ‘सन-वेझ’ने स्वतंत्र तज्ज्ञांचे साहाय्य घेऊन विस्तृत अभ्यास करून घेतला. या अभ्यासातून सिद्ध झाले की, रेल्वेमार्गांसाठी खास डिझाईन केलेले हे पॅनेल्स सुरक्षित आहेत आणि सक्रिय रेल्वे ऑपरेशन्समध्ये कोणताही अडथळा आणत नाहीत. साधारणतः सौर पॅनेल्स कायमस्वरूपी बसवले जातात; परंतु ‘सन-वेझ’ने असे विशेष तंत्रज्ञान विकसित केले की, हे पॅनेल्स आवश्यकतेनुसार कधीही काढता येऊ शकतात. स्विस ट्रॅक मेंटेनन्स कंपनी डलहर्शीलहूशी काही तासांत जवळपास एक हजार चौ. मीटर सौर पॅनेल्स बसवू किंवा काढू शकते. त्यानंतर प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.
 
२०२५ मध्ये बीएलडब्ल्यू, वाराणसी येथे भारतीय रेल्वेने बसवलेली ७० मीटर ‘रिमूव्हेबल सोलर’ प्रणाली ही देशातील पहिली ठरली होती आणि आशियातील अगदी बोटावर मोजण्याइतकी यांसारख्या प्रकल्पांची उदाहरणे आहेत. या प्रणालीचा जर मोठ्या प्रमाणावर विस्तार केला, तर प्रतिकिमी दरवर्षी ३.२१ लाख केव्हीएच इतकी ऊर्जानिर्मितीची क्षमता या प्रणालीत आहे. भारतासारख्या देशात जिथे अतिरिक्त जमीन मिळवणे अवघड आणि खर्चिक असते, तिथे रेल्वेमार्गावरील वापरात नसलेली जागा सौरऊर्जेसाठी वापरणे हे अत्यंत दूरदृष्टीचे पाऊल ठरते.
 
स्वित्झर्लंडमध्ये ही प्रणाली विकसित करणार्‍या ‘सन-वेझ’ या कंपनीच्या अंदाजानुसार, जगभरात असलेल्या एक लाख किमीपेक्षा जास्त रेल्वेमार्गापैकी ५० टक्के मार्गांवर हे तंत्रज्ञान लागू केले जाऊ शकते. त्यातून स्वित्झर्लंडमध्येच जवळपास एक टीडब्ल्यूएच वार्षिक वीजनिर्मिती म्हणजे देशाच्या दोन टक्के ऊर्जेची गरज पूर्ण होऊ शकते. भारतातील विशाल ६८ हजार किमी रेल्वे नेटवर्क वापरून याच पद्धतीने अक्षय ऊर्जेत मोठी भर घालता येऊ शकते. रेल्वेमार्गावरील सौरऊर्जा प्रकल्प ही जागतिक ऊर्जाव्यवस्थेतील नवी क्रांती ठरू शकते. स्वित्झर्लंडचा पायलट प्रकल्प आणि भारताचा वाराणसीतील यशस्वी प्रयोग हे दाखवून देतात की, विद्यमान पायाभूत संरचनेचा उपयोग करून अतिरिक्त जमीन न घेता, स्वच्छ ऊर्जानिर्मिती शय आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा स्वावलंबन वाढवणे आणि दीर्घकालीन खर्चात बचत करणे या सर्व बाबतीत हे मॉडेल जगभरात गेमचेंजर ठरू शकते.
 
 
Powered By Sangraha 9.0