भारत : प्राचीन भारताच्या समृद्ध इतिहासाचा गौरवग्रंथ

15 Nov 2025 11:10:35

Harshad Mane
 
भारताचा प्राचीन इतिहास, म्हणजे आपल्या सगळ्यांचा समृद्ध वारसा. हा वारसा जतन करायचे म्हणजे, त्याचे आकलन होणे ही त्याची पूर्वअट. हाच विचार मनात ठेवून उद्योजक, लेखक हर्षद माने यांच्या लेखणीतून साकारलेला ग्रंथ म्हणजे ‘भारत.’ आज, दि. १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिर येथे सकाळी १० वाजता या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ‘कालनिर्णय’चे संपादक, ज्येष्ठ लेखक जयराज साळगावकर या मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन पार पडणार आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने लेखकाशी साधलेला विशेष संवाद...
 
सर्वप्रथम ‘भारत’ या पुस्तकाविषयी जाणून घ्यायला आवडेल. हे पुस्तक नेमके कशाविषयी आहे?
 
प्राचीन भारताचा गौरवशाली इतिहास सांगणारे पुस्तक म्हणजे ‘भारत.’ भारताच्या इतिहासावर तीन पुस्तकांची मालिका मी लिहित आहे. त्यातील हे पहिले पुस्तक. ब्रह्मांडाच्या उत्पत्तीपासून पुस्तक सुरू होते, ते मानवाची उत्क्रांती, भारतातील माणसाच्या पाऊलखुणा, संस्कृती असे करत इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकापर्यंत हे पुस्तक येऊन थांबते. दुसरे पुस्तक इसवी सन १००० ते १९४७ आणि तिसरे पुस्तक समकालीन इतिहासाचे असेल.
 
भारताच्या प्राचीन इतिहासाची जी पुस्तके आहेत, त्यांत एकाच साचेबद्ध पद्धतीने इतिहास सांगितला आहे. त्याच्यामध्ये खूप बिंदू जोडले गेलेले नाहीत. पाश्चिमात्य इतिहासकारांनी जसा इतिहास लिहिला, त्याचीच री पुढे ओढली गेली. मात्र, त्यात बर्‍याच गोष्टी सुटल्या. दुर्दैवाने, त्यांचा एकत्रित विचार झालेला नाही. दुसरे म्हणजे, ऋग्वेद, पुराणे यांत इतिहास म्हणून जे उल्लेख आहेत, त्यांचा इतिहासाच्या मुख्य प्रवाहात समावेश झालेला नाही. ऋग्वेदातील दाशराज युद्ध, महाभारताचे युद्ध ज्यामुळे भारताचा भूराजकीय इतिहास बदलला, त्याचा समावेश आपण इतिहासात करत नाही. त्यामुळे, इतिहासाचा पुन्हा एकवार सांगोपांग विचार करण्याची गरज मला वाटली आणि त्यातूनच हे पुस्तक तयार झाले आहे.
 
अजून एका गोष्टीचा मी आवर्जून पुस्तकात समावेश केला आहे. ते म्हणजे, भारतीय समाजाचा इतिहास आणि भारतीय कलांचा इतिहास. या दोन्हीशिवाय भारतीय इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. आपण एक सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध संस्कृती आहोत. त्यामुळे आपण कसे घडलो, आपल्या कला कुठून आल्या, आपल्या कलाकारांचे योगदान कसे होते, या गोष्टी मी नमूद केल्या आहेत.
 
‘भारत’ आणि ‘भारतीयत्व’ या दोन संज्ञांकडे आपण आजच्या (२१व्या शतकामध्ये) दृष्टिकोनातून कसं बघता?
 
‘राष्ट्र’ ही जितकी भौगोलिक संकल्पना आहे, तितकीच किंवा त्यापेक्षा अधिक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. ‘भारत’ ही संकल्पना फार प्राचीन आहे. विष्णुपुराणात भारताचे वर्णन ‘हिमालय आणि समुद्र यांच्यामधील भूमी’ असे येते. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या आपला देश काय आहे, याचे आपल्याला भान प्राचीन काळापासून आहे.
 
मात्र, आपली मुख्यतः ओळख आहे, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यापार, कला-संस्कृती अशा सर्व क्षेत्रांतील समृद्ध देश म्हणून. त्यामुळेच अरब व्यापार्‍यांपासून पुढे वसाहतवादी राष्ट्रांपर्यंत सर्वांना भारताची भुरळ पडली. आजच्या ‘भारतीय’ शब्दाचा अर्थ शोधताना आपल्याला या चारित्र्याचा मागोवा घेणे आवश्यक आहे. आपल्यावर झालेले संस्कार, आपले पूर्वज त्यांनी आपल्यासाठी दिलेले संचित याचा आपल्यावर गहिरा परिणाम झालेला आहे. यातून आपले भारतीयत्व घडले आहे.
 
आताच्या घडीला भारतासमोर अनेक आव्हाने आहेत. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटामुळे पुन्हा एकदा याची प्रचिती आली. त्याविषयी काय सांगाल?
 
मला असे वाटते, भारतापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे, स्वतःचे सर्वार्थाने संरक्षण करण्याचे. यामध्ये सामरिक संरक्षण आहेच, शिवाय आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संरक्षणसुद्धा आहे. आपल्या सीमा सुरक्षित ठेवून, बाहेरील आक्रमणे थोपवणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज युद्ध समोरासमोर फार कमी घडते. विद्ध्वंसक हत्यारे भारतात आणून दहशतवादी कृत्ये होत आहेत. माझ्या पुस्तकात मी म्हटले आहे, प्राचीन भारत समृद्ध होता, कारण आपले राजे स्वतंत्र होते.
 
त्यांनी आपले सार्वभौमत्व राखले होते. आपल्या स्वातंत्र्याला आणि सार्वभौमत्वाला आज ७५ वर्षे झाली आहेत. त्याच्यावर येणारा कुठलाही हल्ला होण्याआधीच थोपवणे आवश्यक आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल, तर जग तुमच्याकडे आदराने पाहते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या तुम्ही अधिकाधिक बलशाली होत जावेत, याचा सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
 
आपला लेखनप्रवास कधी व कसा सुरू झाला? लिखाणामागची प्रेरणा नेमकी काय होती?
 
या पुस्तकासाठी मी २०१९ पासून संशोधनाचे काम सुरू केले. त्यामुळे मला पुस्तक लिहायला सहा वर्षे लागली. ‘कोरोना’ काळात लिखाणासाठी थोडा अधिक वेळ मिळाला. ‘कोरोना’आधी मी ‘यूपीएससी’साठी इतिहास शिकवत होतो. त्यावेळेस मला या विषयावर मराठीमध्ये संदर्भपुस्तक हवे असे वाटले. त्यातून मी हे पुस्तक लिहायला सुरुवात केली होती. मात्र, नंतर मला असे वाटले की, आपल्या देशाचा इतिहास ललित ओघवत्या भाषेत लिहिला, तर सामान्य वाचकांनासुद्धा वाचायला आवडेल. त्यामुळे पुस्तकाची पुनर्रचना केली.
 
उद्योजगतामध्ये आपण मागील बराच काळ कार्यरत होतात. भारतीय उद्योजगताकडे आपण कसं बघता?
 
भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने सांगायचे तर, समृद्ध निर्यात हा भारताच्या प्राचीन इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. एका आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार, भारताचा प्राचीन काळातील जगाच्या व्यापारातील हिस्सा २५ टक्के होता आणि भारत आणि चीन जगाच्या व्यापार्‍याचा निम्मा व्यापार करत होते. निर्यात समृद्ध होती म्हणून आपल्याकडे आर्थिक समृद्धी नांदली. त्यातूनच कला-साहित्य आणि विद्वज्जनांना राजाश्रय मिळाला. अशा रितीने आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा अर्थकारणातून घडला.
तेच सूत्र आजही लागू पडते. दुदैवाने आज भारतीय निर्यातीचा जगाच्या निर्यातीतील हिस्सा अगदीच नगण्य आहे.
 
भारताची आयात-निर्यातीपेक्षा अधिक आहे; त्यामुळे भारत व्यापार्‍याच्या बाबतीत तोट्यात आहे. १९९०च्या आर्थिक सुधारणांमुळे भारताचा व्यापार वाढला. देशांतर्गत कंपन्या सक्षम झाल्या आणि भारताची परकीय गंगाजळी वाढली. भारताचा अंतर्गत व्यापार वाढला. भारताची निर्यातही वर्षानुवर्षे वाढत आहे, मात्र अजूनही खूप काम करणे बाकी आहे. सध्याच्या ‘मेक इन इंडिया’, स्टार्टअप या योजना सरकार हिरिरीने राबवत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा करू. मात्र, चीनने १९८०च्या दशकापासून केले, तसे मोठ्या प्रमाणात प्रयत्न, ज्याला अर्थशास्त्रात ‘बिग पुश’ म्हणजे जोरदार धक्का म्हणतात, असे प्रयत्न आवश्यक आहेत.
 
उद्योजकता आणि लेखनप्रवास या गोष्टीची सांगड आपण कशी घातली?
 
वास्तविक दोन्ही गोष्टी भिन्न असल्या, तरी अर्थशास्त्र आणि उद्योजकतेच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा भारत पुस्तकात खूप उपयोग झाला. अर्थशास्त्र, प्राचीन उद्योग, प्राचीन शेती अशा वेगवेगळ्या प्रकरणांचा त्यामुळेच सहभाग मी पुस्तकात केला. रेशीम महामार्ग या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे, हे जग व्यापार्‍यांनीच घडवले आहे. कारण, त्यांनी फक्त वस्तू इथून तिथे नेल्या नाहीत, तर संस्कृतीसुद्धा नेली. त्यामुळे भारताच्या लेखनात उद्योजकीय अनुभव आणि उद्योजकतेचा अभ्यास याचा फायदाच झाला.
 
उद्योजकतेमधील मराठीविश्वाकडे आपण कसे बघता? मराठी माणसाचं पाऊल ‘पुढे’ पडलं आहे का?
 
मागच्या दशकभरात काही एक जाग मराठीविश्वाला येत आहे. पण, अजूनही आपण फार मागे आहोत. केवळ भावनिक आवाहने करून, माणसे जमवून, मेळावे करून उद्योजकता वाढणार नाही. उत्पादकता, विक्री, भांडवल अशा व्यवहारिक गोष्टींवर काम करून मराठी उद्योजकता वाढेल. मराठी माणसाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे, चिकाटी आणि झुंजण्याची वृत्ती. आपण हार मानत नाही. प्राचीन भारतात आलेल्या प्रवाशांनीसुद्धा याचे वर्णन केले आहे. ही चिकाटी, झुंजार वृत्ती उद्योजकतेच्या प्रांगणातही येणे आवश्यक आहे. अपयश हा उद्योजकतेचा पहिला धडा आहे.
 
माझ्या भारतदर्शनात मला प्रकर्षाने हे जाणवत होते की, मराठी माणसाला भारतभर प्रचंड संधी खुल्या आहेत. त्याने फक्त, आपले घर सोडून बाहेर पडणे आवश्यक आहे. देशभरात मुक्त संचार करण्याची मनीषा असेल, तर मराठी उद्योजकाला आणि एकूणच मराठी माणसाला, विद्यार्थ्यांना देशभरात मुबलक संधी खुल्या आहेत. त्यामुळे मराठी उद्योजकांनी झुंजणे आवश्यक आहे. यासाठी उद्योजकांच्या घरच्यांनीसुद्धा साथ देणे आवश्यक आहे. अनेक उद्योजकांची पहिली पिढी असल्याने, त्यांच्याकडून चुकाही घडतील. यासाठी एकत्र येणे, अनुभव वाटणे आणि त्यातून शिकून पुढे जाणे आवश्यक ठरते. मराठी हा एक सुसंस्कृत समाज आहे. तो सुसंस्कृत आणि उद्योजकीय समाज म्हणूनसुद्धा गणला गेला पाहिजे. पण, हे नक्की की, मागच्या दशकभरापेक्षा मराठी माणसाचे एक पाऊल निश्चित पुढे पडले आहे आणि मी मराठी माणसाच्या उद्योजकीय विकासाच्या बाबतीत प्रचंड आशावादी आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0