मुंबई : ( Bihar Assembly Election Result 2025 ) बिहार निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहे. एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले. आज (दि. १४) सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरु आहे. अंतिम फेरीतील मतमोजणी झाल्यानंतर अंतिम निकाल हाती येईल. ह्याच बिहार निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या विजयाबद्दल भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजा याची पत्नी आणि भाजप नेत्या रिवाबा जडेजा यांनी बिहार जनतेचे अभिनंदन केले आहे.
काय म्हणाल्या रिवाबा जडेजा?
पत्रकारांशी बोलताना रिवाबा जडेजा यांनी बिहारच्या निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना म्हटलं की, "जनतेने पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला आहे. येत्या काळात बिहारच्या विकासासाठी अनेक प्रोजेक्ट सुरू होतील. मी बिहारच्या जनतेला, आमच्या नेत्यांना मनापासून शुभेच्छा देते", असे रिवाबा जडेजा म्हणाल्या.
कोण आहे रिवाबा जडेजा?
रिवाबा जडेजा यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. महिला सक्षमीकरणासाठी त्या सक्रियपणे कार्यरत आहेत. गुजरातच्या प्राथमिक, माध्यमिक आणि प्रौढ शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. फक्त तीन वर्षांच्या कार्यकाळात आमदारपदापासून थेट मंत्रिपदापर्यंत पोहोचणं हे त्यांच्या राजकीय प्रवासाचं मोठं यश मानलं जातं. रिवाबा जडेजा यांचा अभियंता ते राजकारणी असा प्रवास उल्लेखनीय आहे.