स्वदेशी ‘भीम’ अ‍ॅप आता नव्या स्वरुपात...

14 Nov 2025 10:58:09
BHIM app 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच क्षेत्रांत स्वदेशी वस्तू आणि सेवांच्या वापराचे आवाहन देशवासीयांना केले आहे. असेच एक स्वदेशी यूपीआय अ‍ॅप म्हणजे ‘भीम’ अ‍ॅप. आकर्षक फीचर्ससह नव्या स्वरुपात हे अ‍ॅप भारतीयांच्या सेवेत दाखल झाले आहे. त्याविषयी...
 
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एनपीसीआय)ने २०१६ मध्ये युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) दाखल केल्यानंतर भारतात डिजिटल व्यवहारांना चालना मिळाली. ‘यूपीआय’ भारतात दाखल झाले अगदी त्याचवेळी ‘यूपीआय’चा मोबाईलमधील ‘फ्रंटएंड’ म्हणून ‘भीम’ (भारत इंटरफेस फॉर मनी) नाव असलेले अ‍ॅप ‘एनपीसीआय’ने उपलब्ध करून दिले होते. परंतु, ‘यूपीआय’च्या मागून येऊन इतर अ‍ॅप्सनीच बाजार बळकावला आणि ‘एनपीसीआय’चे अ‍ॅप मागे पडले. स्वदेशी अ‍ॅपच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक नवी उपकंपनी ‘एनपीसीआय भीम सर्व्हिसेस लिमिटेड’ या नावाने सुरू करण्यात आली. परिणामी, हे अ‍ॅप आता अधिक आकर्षक आणि ‘यूजर फ्रेंडली’ स्वरुपात वापरकर्त्यांपुढे सादर करण्यात आले.
 
‘यूपीआय’ही प्रणाली चलनी नोटांच्या तुलनेत खूप सोयीस्कर आणि विश्वासार्ह आहे. आता ‘यूपीआय’ दैनिक आर्थिक व्यवहारांचे एक प्रमुख साधन झाले आहे. ‘यूपीआय’बाबत सुरुवातीलाच सर्वत्र तांत्रिक बाबी पूर्णपणे चांगल्या रितीने सादर केल्या गेल्या. ‘यूपीआय’ हे भारतात बनलेले जागतिक दर्जाचे फिनटेक उत्पादन आहे. प्रत्येक देशाचे स्वतःचे प्राधान्यक्रम आणि डिजिटल पेमेंटचा अवलंब करण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. काही देशांत ‘वॉलेट’ मोठ्या प्रमाणात वापरले जाते. काही देशांत ‘क्रेडिट कार्ड’चा वापर जास्त होतो. ‘यूपीआय’ इतर देशांत लोकप्रिय व्हावे, यासाठी एक उपकंपनी स्थापन करण्यात आली आहे.
 
‘भीम अ‍ॅप’चे संपूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे आणि ते अधिकाधिक लोकांनी वापरावे, यासाठी प्रयत्नदेखील केले जात आहेत. परंतु, अ‍ॅपच्या सध्याच्या बाजारपेठेतील दोन प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणजे ‘फोन पे’ आणि ‘गुगल पे.’ यांनीच बाजारपेठेचा ८० टक्के हिस्सा व्यापलेला आहे. त्यामुळे नवे ‘भीम अ‍ॅप’ ‘यूपीआय’ वापरकर्त्यांचे प्राथमिक अ‍ॅप व्हावे, यासाठी त्याची पुनर्रचना करण्यासाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. ‘भीम अ‍ॅप’मध्ये प्रादेशिक भाषांच्या सुविधांचाही वापरकर्त्यांना फायदा मिळतो. एक ‘अ‍ॅप प्रोव्हायडर’ म्हणून कोणत्याच अ‍ॅपला व्यवहारांचा डेटा स्टोअर करण्याची परवानगी ‘एनपीसीआय’कडून मिळालेली नाही.
 
व्यवहारांचा सर्व डेटा हा फक्त बँकेकडे उपलब्ध असतो. अ‍ॅपमधून व्यवहारांची माहिती देताना, ती बॅकएंडला बँकेच्या डेटामधून उपलब्ध करुन देतात. ‘भीम’ हे फ्रंटएंड उपलब्ध करून देणारे एकमेव अ‍ॅप नाही. बाजारात इतर अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत आणि प्रत्येक अ‍ॅपमधील ‘नॅरेशन’ वेगवेगळे असेल, तर बँकेच्या स्टेटमेन्टमध्ये ‘यूपीआय’कडून बँकेला जाणारा डेटा वेगवेगळ्या स्वरुपातील असेल आणि ते गैरसोयीचे होईल. ‘एनपीसीआय’ने दिलेल्या व्यापक मार्गदर्शक तत्त्वांनुसार अ‍ॅपचे फॉरमॅट सर्वच अ‍ॅप्ससाठी एक निश्चित प्रकाराने दाखविलेले असते. दोन स्क्रीन असतात. त्यामध्ये क्लिक करा, कन्फर्म करा आणि व्यवहार पूर्ण करा. परदेशी वापरकर्त्यांसाठी ‘यूपीआय वन वर्ल्ड’ नाव असलेले एक अ‍ॅप आहे. जे साधारण गेले एक वर्ष उपलब्ध आहे.
 
‘भीम’ अ‍ॅपमध्ये उपलब्ध करून दिलेल्या खर्च विश्लेषण या फिचरमध्ये वापरकर्त्याने केलेल्या वेगवेगळ्या खर्चांचे वर्गीकरण करून एक ‘समरी स्टेटमेंट’ दिले जाईल. हे वर्गीकरण मिळावे, यासाठी वापरकर्त्याला काही मास्टर डेटा अ‍ॅपमध्ये आधीच फीड करून ठेवावा लागणार नाही. हे अ‍ॅपद्वारे स्वतंत्रपणे केले जाईल. अ‍ॅपमध्ये एक मशीन लर्निंग अल्गोरिदम उपलब्ध करून दिलेले आहे, ज्याद्वारे वापरकर्त्यांनी केलेल्या खर्चाचे वर्गीकरण केले जाते. ‘भीम’ अ‍ॅपमध्ये पेंडिंग बिलांबाबत वापरकर्त्यांना ‘अलर्ट’ दिले जातील, असे फिचर दिलेले आहे. अ‍ॅपमधील मशीन लर्निंग अल्गोरिदम तुम्ही केलेल्या खर्चाच्या पॅटर्ननुसार साधारणपणे कोणते नियमित खर्च, कोणत्या तारखेला तुम्ही करता याचे विश्लेषण करून पुढील महिन्यात संबंधित तारखेला विशिष्ट खर्च करण्याबद्दल एक रिमाईंडर येईल की ज्यामुळे असा खर्च करायचा आहे, हे तुम्हाला समजेल.
 
‘भीम’ अ‍ॅपमध्ये ‘फॅमिली मोड’ हे फिचर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात सर्व कुटुंब अ‍ॅपचा वापर करून व्यवहार करू शकते. यासाठी अ‍ॅडमिन असणार आणि तो प्रत्येक कुटुंब सदस्यासाठी व्यवहार मर्यादासुद्धा निश्चित करू शकणार. ‘फॅमिली मोड’ हे फिचर फक्त ‘भीम’ अ‍ॅपमध्येच उपलब्ध आहे आणि हा एक प्रमुख ‘यूएसपी’ आहे. ‘फॅमिली मोड’मध्ये ‘टास्क’ आणि ‘रिमाईंडर’ नावाचे नवे फिचर जोडण्याबद्दल तयारी सुरू आहे. हे सुरू झाल्यावर वापरकर्त्याला अ‍ॅपमधून पेमेंट करण्यासाठी त्या त्या दिवशी आठवण करून दिली जाईल. ‘यूपीआय’ सर्कल हे फिचर सर्व अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. ‘यूपीआय’ सर्कल फिचरमध्ये प्राथमिक वापरकर्ता त्याच्या दुय्यम वापरकर्त्याचे एक सर्कल करू शकतो. दुय्यम वापरकर्ता प्राथमिक वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय कोणतेही पेमेंट करू शकणार नाही. या फिचरमध्ये प्राथमिक वापरकर्त्याच्या दृष्टीने संपूर्ण सुरक्षितता अंतर्भूत केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0