मुंबई : (PM Narendra Modi on Bihar Election Result 2025) बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. प्रचंड बहुमत मिळवत पुन्हा एकदा सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएने बिहारमध्ये दणदणीत यश मिळवले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून जनतेला संबोधित केले. भाषणाच्या सुरुवातीलाच बिहारच्या निवडणुकीतील यशाचं हिंदीत वर्णन करताना मोदी म्हणाले, "आज बिहार के जनता ने बिल्कुल गर्दा उडा दिया.."
आता कट्टा सरकार बिहारमध्ये परत येणार नाही
आम्ही जनतेचे मन चोरले आहे. त्यामुळे आता बिहारच्या जनतेने दाखवून दिले आहे की, फिर एक बार, एनडीए सरकार. मी जेव्हा बिहारच्या निवडणुकीत जंगलराज, कट्टा सरकार असे बोलायचो, तेव्हा राजदच्या लोकांना कधी वाईट वाटायचं नाही, पण काँग्रेसच्या लोकांना फार वाईट वाटत होतं. पण आज मी पुन्हा सांगतो, आता कट्टा सरकार परत येणार नाही.
आजच्या निकालाने नवा MY फॉर्म्युला दिला
राजद आणि काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "लोहा लोहे को काटता है, अशी एक जुनी म्हण आहे. बिहारमध्ये याचा प्रत्यय आला. इथे काही पक्षांनी तुष्टीकरणाचा MY (मुस्लीम, यादव) फॉर्म्युला बनवला होता. मात्र आजच्या निकालाने नवा सकारात्मक MY फॉर्म्युला दिला आहे. याचा अर्थ आहे महिला आणि युवा. बिहारच्या जनतेने महाआघाडीच्या माय फॉर्म्युलाला उद्धवस्त केले आहे"
बिहारच्या जनतेनं सगळे रेकॉर्ड तोडले
मी बिहारच्या जनतेला विक्रमी मतदानाचा आग्रह केला होता. बिहारच्या जनतेनं सगळे विक्रम तोडले आहेत. मी बिहारच्या लोकांकडे एनडीएला मोठा विजय मिळवून देण्याचा आग्रह केला होता. बिहारच्या जनतेने माझा हा आग्रहही ऐकला.
बिहारमध्ये जंगलराज होतं तेव्हा...
बिहारमध्ये जेव्हा जंगलराज होते, तेव्हा काय काय व्हायचे, हेही तुम्हाला माहिती आहे. उघडपणे मतदान केंद्रांवर हिंसा व्हायची. मतपेट्या लुटल्या जायच्या . आज त्याच बिहारमध्ये विक्रमी मतदान झाले. शांततापूर्ण मतदान होत आहे. प्रत्येकाचं मतदान नोंद झाले. प्रत्येकानं आपल्या पसंतीचं मत दिले. आधी बिहारमध्ये कोणतीही निवडणूक अशी होत नव्हती, जिथे पुनर्मतदान होत नव्हते. १९९५ साली १५०० हून जास्त मतदान केंद्रांवर पुनर्मतदान झाले होते. २००० सालीही हेच चित्र होते. पण जसं जंगलराज गेले, तसतशी परिस्थिती सुधारत गेली. यावेळी दोन टप्प्यांतल्या निवडणुकीत कुठेही पुनर्मतदान झालं नाही. यावेळी शांततापूर्ण मतदान झाले.
काही लोक निर्लज्जपणे म्हणायचे...
आजचा निकाल त्या विकासविरोधी लोकांना उत्तर आहे जे निर्लज्जपणे म्हणायचे की बिहारला एक्स्प्रेसवे, रस्ते, उद्योग, रेल्वे नको आहेत. बिहारमध्ये रेल्वे, विमानतळांची काय गरज आहे असं विचारायचे. आजच्या निकालातून वंशवादाच्या राजकारणाला विकासवादानं दिलेलं उत्तर आहे. बिहारच्या निकालांनी दाखवून दिलंय की जामिनावर बाहेर असलेल्या लोकांना जनता साथ देणार नाही.
काँग्रेस मुस्लीम लीगी माओवादी काँग्रेस अर्थात MMC बनलीय
आज बिहारमध्ये भाजपानं जितक्या जागा जिंकल्या, तितक्या जागा काँग्रेस गेल्या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळून जिंकू शकलेली नाही. काँग्रेसच्या राजकारणाचा आधार आता फक्त नकारात्मक राजकारण झाला आहे. कधी चौकीदार चोर है चा नारा, संसदेचा वेळ वाया घालवणं, प्रत्येक संस्थेवर हल्ला करणं, कधी इव्हीएमवर प्रश्न, कधी निवडणूक आयोगाला शिवीगाळ, कधी वोटचोरीचा आरोप, देशाच्या शत्रूचा अजेंडा पुढे आणणं काँग्रेसकडे देशासाठी कोणताही सकारात्मक दृष्टीकोन नाहीये. आज काँग्रेस मुस्लीम लीगी माओवादी काँग्रेस अर्थात MMC बनली आहे. काँग्रेसचा संपूर्ण अजेंडा याच गोष्टींवर चालतो. त्यामुळेच काँग्रेसमध्येदेखील एक वेगळा प्रवाह तयार होतोय, जो या नकारात्मक धोरणाच्या विरोधी आहे. कदाचित येत्या काळात काँग्रेसचं मोठं विभाजन होऊ शकेल.
पश्चिम बंगालमधूनदेखील जंगलराज संपवणार
गंगा बिहारमधून वाहातच पश्चिम बंगालपर्यंत पोहोचते. बिहारने बंगालमधील भाजपच्या विजयाचा मार्गही तयार केला आहे. मी बंगालच्या बांधवांनाही आश्वस्त करतो, की भाजप तुमच्या साथीने पश्चिम बंगालमधूनदेखील जंगलराज संपवून टाकेल.