Bihar Assembly Election Result 2025 : "काँग्रेसची हालत एमआयएमपेक्षाही...", बिहार निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

14 Nov 2025 18:43:33

मुंबई : (CM Devendra Fadnavis on Bihar Assembly Election Result 2025) बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने दोनशेचा आकडा पार केला आहे. एनडीए आणि महागठबंधन यांच्यामध्ये बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले. आज (दि. १४) सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरु आहे. अंतिम फेरीतील मतमोजणी झाल्यानंतर अंतिम निकाल हाती येईल. मात्र, निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

कदाचित २०१० सालचा रेकॉर्ड तुटू शकतो

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेऊन, नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेऊन बिहारच्या जनतेने एनडीएला प्रचंड मोठं बहुमत दिले आहे. त्यासाठी सर्वांचे अभिनंदन करतो. आताचे कल पाहता कदाचित २०१० सालचा विक्रम तुटू शकतो अशा प्रकारचा विजय प्राप्त होताना दिसत आहे", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहार निवडणूक निकालावर पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत.

काँग्रेसची हालत आरजेडीपेक्षाही खराब आहे.

दुसरं म्हणजे या विजयानंतर काँग्रेस व राहुल गांधी यांनी देशात चालवलेला विषारी प्रचाराला जनतेनं हे प्रत्युत्तर दिलं आहे. सातत्याने संवैधानिक संस्थांचा अपमान करणं, संवैधानिक मार्गाने काम करत असताना त्याला विरोध करणं, जनतेने निवडून दिलेल्या सरकारचा अपमान करणं, जनतेलाही कळलेलं आहे की, हे आरोप म्हणजे आमच्या मतांचा अपमान आहे. त्यामुळे जोपर्यंत राहुल गांधी संवैधानिक संस्थांचा अपमान करतील, तोपर्यंत काँग्रेसची स्थिती हीच राहील. एकीकडे आरजेडीची हालत खराब झालीच आहे. पण काँग्रेसची हालत आरजेडीपेक्षाही खराब आहे. काँग्रेस एमआयएम, कम्युनिस्ट पक्षांपेक्षाही खाली घसरली आहे. काँग्रेसचा बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी स्कोर आलेला आहे. वोटचोरीचा आरोप राहुल गांधींनी केला होता. पण त्यांच्याबरोबरचे पक्ष जोपर्यंत आत्मपरीक्षण करत नाहीत, तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाहीत. असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.



Powered By Sangraha 9.0