मुंबई : ( Delhi blast ) दिल्ली स्फोटानंतर देशभरात जारी करण्यात आलेल्या ‘अलर्ट’नंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान एका शिक्षकाला ताब्यात घेऊन त्याच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर संगणकीय उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र ‘एटीएस’ने यापूर्वी ‘अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट’ या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून जुबेर इलियास हंगरगेकर या व्यक्तीला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून मुंब्रा येथील एका शिक्षकाचे नाव समोर आले. त्यानुसार, ‘एटीएस’ने त्या शिक्षकाच्या निवासस्थानी छापेमारी करून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
सदर शिक्षकाचे नाव इब्राहिम आबिदी असे असून तो मुंब्रा कौसा भागात भाड्याने राहतो. आबिदी दर रविवारी कुर्ल्यातील एका मशिदीत उर्दू शिकवण्यासाठी जात असल्याचे समजते. संबंधित मशिदीतच त्याची दुसरी पत्नी राहते. ‘एटीएस’ने कुर्ल्यातील त्या घरावरही छापेमारी करून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. अटक केलेला झुबेर हंगरगेकर आणि इब्राहिम आबिदी यांची मुंब्रा येथील घरात गुप्त बैठक झाल्याचे उघड झाले आहे. हंगरगेकरच्या जुन्या मोबाईलमधून ओसामा बिन लादेनच्या भाषणांचे उर्दू भाषांतर, ‘अल-कायदा’ संघटनेशी संबंधित गोपनीय कागदपत्रे आणि ‘इन्स्पायर’ नावाचे मासिक जप्त करण्यात आले आहे. ‘एटीएस’ने इब्राहिम आबिदीच्या मुंब्रा आणि कुर्ला येथील दोन्ही ठिकाणी झडती घेऊन संशयास्पद कागदपत्रे आणि संगणकीय साहित्य जप्त केले आहे.