संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार

13 Nov 2025 14:02:47

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial

मुंबई : ( Ashish Shelar ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. या अनुषंगाने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण आज सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे करण्यात आले.
 
प्रस्तावित स्मारक ५ एकर क्षेत्रात उभारले जाणार असून, पार्किंग आणि अन्य सुविधांसाठी अतिरिक्त २ एकर जागा शासनाने घेतली आहे. माजी आमदार प्रमोद जठार यांनी हे स्मारक वेगवेगळ्या टप्प्यात करून ते अधिक भव्यदिव्य व्हावे अशी मागणी केली होती. त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर स्मारक उभारावे, अशी सूचना केली होती. याबाबत त्यांची संकल्पना समजून घेण्यासाठी मंत्री ॲड.शेलार यांनी दालनात बुधवार दि १२ नोव्हेंबर रोजी बैठक घेण्यात आली.
 
या बैठकीत मंत्री ॲड.शेलार यांनी पहिल्या टप्प्यात संकल्पचित्रानुसार मुख्य स्मारकाचे काम करण्याचे निर्देश दिले. तसेच आमदार श्री.जठार यांनी मांडलेल्या आजूबाजूच्या परिसरात पर्यटकांसाठी सेवा, सुविधा व विकासाच्या कल्पनांचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचनाही दिल्या. या बैठकीला आमदार प्रमोद जठार यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व विभाग, रत्नागिरी जिल्हाधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0