जोशी-बेडेकर महाविद्यालयात ज्येष्ठ चित्रकार एम.वी.धुरंधर यांच्या चित्रांची प्रदर्शनी

    13-Nov-2025   
Total Views |

Exhibition
 
ठाणे : ( Exhibition ) ठाण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग आणि लहान मुलांचे डॉ. बेडेकर हॉस्पिटल आपले अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या निमित्त डॉ. बेडेकर हॉस्पिटल आणि प्राच्यविद्या अभ्यास संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटो रोथफेल्ड लिखित 'द वूमन ऑफ इंडिया' या १९२० साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातील ज्येष्ठ चित्रकार एम. वी. धुरंधर यांनी काढलेल्या तत्कालीन भारतातील विविध प्रांत, व्यवसाय आणि वर्गातील स्त्रियांच्या वेशभूषांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी डॉ.महेश बेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि.के. नायक व मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
हेही वाचा :  India House : लंडन मधील ऐतिहासिक "इंडिया हाऊस" महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार
 
या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. महेश बेडेकर यांनी धुरंधर यांच्या चित्रकलेबद्दल व एकूणच या चित्र प्रदर्शनाच्या आयोजना मागच्या भूमिकेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर चित्रप्रदर्शन १३, १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ६.०० या वेळेत जोशी बेडेकर कॉलेजच्या (ठाणा कॉलेज) प्रांगणात सुरू असेल. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता महाविद्यालयातील थोरले बाजीराव पेशवे सभागृहात, प्राचीन भारतातील स्त्रिया या विषयावर सह. प्राध्यापक अंकुर काणे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे.
१९२० साली प्रकाशित झालेल्या 'द वूमन ऑफ इंडिया' या अतिशय दुर्मिळ आणि महत्त्वाच्या ग्रंथाची मूळ प्रत देखील प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. सर्व रसिकांनी या ऐतिहासिक व दुर्मिळ चित्रप्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन बेडेकर कुटुंबियांनी केले आहे.
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक