Delhi Blast : ६ डिसेंबर, ६ ठिकाणं... असा रचला होता कट, दिल्ली कार स्फोटामागं 'बाबरी' कनेक्शन! नेमकी काय माहिती समोर आली?

13 Nov 2025 17:50:24

Delhi Blast
 
मुंबई : (Delhi Blast) दिल्लीत सोमवारी झालेल्या कारच्या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी तपासात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून आता या प्रकरणातील नवी माहिती समोर येत आहे. या दहशतवाद्यांना ६ डिसेंबरला देशात ६ स्फोट घडवायचे होते, अशी माहिती समोर आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षांपूर्वी ६ डिसेंबरला १९९२ अयोध्येत बाबरी ढाँचा पाडण्यात आली होती, याच घटनेचा बदला म्हणून या दहशतवाद्यांना ६ डिसेंबरला सहा स्फोट घडवून आणायचे होते. या पार्श्वभूमीवर, बाबरी ढाँचा पाडल्याचा बदला घेण्यासाठी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने तथाकथित 'व्हाईट कॉलर मॉड्यूल' तयार केल्याची माहिती समोर आली आहे.
 
भयंकर हल्ल्याचा कट असा झाला अयशस्वी!
 
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आणि दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी असलेला उमर नबी हा ६ डिसेंबर म्हणजेच बाबरी ढाँचा पाडण्यात आली त्या दिवशी एक मोठा हल्ला घडवून आणण्याचं प्लॅनिंग करत होता. यादरम्यान, फरिदाबाद पोलिसांनी २९०० किलो स्फोटके जप्त केल्याचे आणि एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केल्याचे जाहीर केले. यामुळे उमर घाबरला होता. अटकेच्या भीतीपोटी तो काही तास शहरातील एका मशीदीमध्ये लपून बसला होता. तीन तास तिथे थांबल्यावर तो कार घेऊन तिथून निघाला आणि लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ येताच त्याने स्फोट घडवून आणला.
 
तपासात असे समोर आले आहे की, की व्हिएकल बॉर्न इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (Vehicle-Borne Improvised Explosive Device) पूर्णतः तयार झाले नव्हते. त्या सर्किटमध्ये गोळ्या नीट असेंबल केलेल्या नव्हत्या, नाहीतर या स्फोटामुळं खूप मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली असती. आता या कार स्फोटाच्या घटनेचे आणखी कोणकोणते धागेदोरे समोर येतात, ते पाहणंही महत्वाचं असणार आहे.
Powered By Sangraha 9.0