त्याला क्षयरोग झाला होता. त्याला एक विशिष्ट रक्त तपासणी करायला सांगितली होती. ती तपासणी रूग्णालयातूनच करायची होती. पण, त्याच्याआधी खूप रूग्ण त्या तपासणीसाठी प्रतिक्षेत होते. त्या चाचणीचा अहवालही उशिराच मिळणार होता. अहवाल मिळाल्यानंतर त्याच्यावर उपचार होणार होते. रूग्णालयात जागा नाही, सांगत त्या रूग्णाला घरी पाठवण्यात आले. क्षयामुळे शरीराची आणि मनाची चाळण झालेल्या रूग्णाला नातेवाईकांनी घरी आणले. त्याचे नातेवाईक तपासणीसाठी सांगितलेल्या दिवसाची प्रतीक्षा करत राहिले. पण, तो दिवस येण्याआधीच रूग्णाचा करूण अंत झाला. हा दोष कुणाचा? मृत्यू कधीही कुणालाही येऊ शकतो. पण, जर इस्पितळात त्याची तत्काळ संबंधित तपासणी झाली असती तर? सध्या केईएम रूग्णालयातील कारभाराबद्दल मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भूमिका घेतली आहे. त्याअनुषंगाने हे सगळे आठवले.
ही रूग्णालये गैरसोय आणि अनागोंदीची केंद्रे झाली की काय, असे दृश्य आहे. या रूग्णालयांमध्ये अत्यवस्थ रूग्णांना तातडीने उपचारांसाठी आणले, तर त्याला सर्वप्रथम कुठे न्यायचे? संबंधित कागदपत्र कुठे बनवायचे? याबाबत माहिती देणारी व्यवस्था असते का? ‘तुम्ही रूग्णालयात आलात, आता तुमचे तुम्ही बघा’ असेच सगळे असते का? सुरक्षारक्षकापासून ते सगळा कर्मचारीवर्ग ते वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स सगळ्यांचेच वर्तन रूग्णांप्रती संवेदनशील असते का? कुणी मरो, कुणी तडफडो, आम्हाला काय त्याचे, असेच वातावरण असते का? (अपवाद, क्षमस्व काही वेळा चांगलेही अनुभव असतात) कधी कधी तर एका बेडवर तीन-तीन रूग्णांना ठेवलेले असते. काही वर्षांपूव घुशी, उंदीर, ढेकूण यांचा सर्रास वावरही पाहिला होता.
मान्य आहे की, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची, डॉक्टर्स आणि नर्सेसची संख्या कमी आहे, उपलब्ध आरोग्य सेवेची साधनेही कमी आहेत. पण, रूग्णांना किंवा रूग्णांच्या नातेवाईकांना हिडीसपीडिस करणे, हे कधीही स्वीकाराहार्य नाही. सरकार आरोग्य सेवा पुरवते, आरोग्य सेवा देणाऱ्या सगळ्याच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेचे वेतनही दिले जाते. आजही लोकांसाठी डॉक्टर म्हणजे देवच असतात. मग रूग्णांच्या चांगल्या उपचाराचे घोडे कुठे अडते? या सगळ्या रूग्णालयांचे मानवीपणाचे ऑडिटही एकदाचे करायला हवे.
कुठे आहे रे तो ड्रोन?
गुमनाम हैं कोई, बदनाम हैं कोई, किसको ख़बर कौन हैं वो अनजान हैं कोई...’ बाबा, तुमच्या लहानपणी हे गाणं होतं ना? मला तर भीती वाटते की, आपल्या घराजवळ ‘तो’ आत वाकून बघत होता. जसं त्याला पाहिलं ‘तो’ निघून गेला बाबा. ‘तो’ कोण होता? काय म्हणता ड्रोन होता! हं म्हणजे, आमच्यावर नजर ठेवली जाते का? आम्ही आहोतच इतके महत्त्वाचे. त्याशिवाय का बाबा ‘ब्येस्ट सीएम‘ होते. त्यामुळेच आम्ही काय करतो, हे तपासण्यासाठी त्या लोकांनी ड्रोन वापरले, असे म्हणूया बाबा! आमचे सरदार, तसेच हुजरे वगैरेंचे याबाबत काय म्हणणे आहे? काय म्हणता, आपली किंमत आपणच वाढवायची! त्यामुळे आपल्यावर नजर ठेवली जाते, असे आपणच म्हणायचे?
सध्या उपचार घेत असलेल्या काकांची आठवण येते. ते कसे म्हणायचे की, ‘माझी रेकी केली जाते. माझ्या घरावर पाळत ठेवली जाते.’ आता आपणही त्यांच्यासाारखेच म्हणूया. पण, ते ड्रोन काहीतरी कामानिमित्त आपल्या परिसरात उडत होते, असे लगेच संबंधित यंत्रणेने म्हंटले. ते काहीही असू दे, माझ्या डोळ्यासमोर आला ना तो ड्रोन? तो कुणाची परवानगी घेऊन आमच्या घराबाहेर पिरत होता? इथे आम्ही राहतो, याचा मुलाहिजा त्याने ठेवला नाही. आमची तौहीन झाली. वा वा... उर्दू शब्द पटापट यायला लागलेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. हे असे अधूनमधून उर्दू बोलता आले पाहिजे, तरच मतदार खूश होतील ना. तर विषय असा की, ते ड्रोन कुणाला विचारून आले होते? काय म्हणता? आमच्या परिसरात त्या चार-पाच मजली मोठ्या झोपड्या, कुणाला विचारून बांधल्या ते शोधू? हे बघा, मी तर वरळीचा आमदार आहे. काय म्हणता? वरळीमध्ये वर्षोनुवर्षे बीडीडी चाळीत राहणाऱ्या मराठी माणसाला हक्काचं घर भाजपच्या ‘हेडमास्टर’ने देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिले. काय म्हणता, त्या वरळीचा आमदार मी असताना भाजपवाले बीडीडी चाळीसाठी काम करतात, मग आम्ही काय करतो हे शोधू? काय म्हणता, मुंबईत अनेक वर्षे आमची सत्ता असताना अख्ख्या मुंबईतले मराठी भाषिक मुंबईबाहेर का गेले ते शोधू? हे बघा, हे मी शोधणार नाही. कारण, आता चर्चेत राहायची वेळ आली आहे. आपल महत्त्व आपणच वाढवायचं असतं. त्यामुळे ड्रोन आमच्यावर नजर ठेवतं होता, हे बोलायलाचं हवं. कुठे आहे रे तो ड्रोन?