White Collar Jihad : 'व्हाईट कॉलर जिहाद' शिक्षित अतिरेकी गटाच्या दहशतवादाची नवी व्याख्या

12 Nov 2025 20:49:14
 
White Collar Jihad
 
मुंबई : (White Collar Jihad) दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातून आधुनिक दहशतवादाचा एक नवा, भयावह पैलू उघडकीस आला, तो म्हणजे व्हाईट-कॉलर जिहाद (White Collar Jihad). फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठातील संबंधित आरोपी डॉक्टरांच्या अटकेनंतर जवळपास २,९०० किलो स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले. हा प्रकार दहशतवादाच्या स्वरूपात झालेला एक धोकादायक बदल दर्शवतो की, शिक्षित आणि व्यावसायिक पार्श्वभूमी असलेले इस्लामी अतिरेकी विचारसरणीने प्रभावित होत असून, ते केवळ सहभागीच नाहीत तर नियोजन, आर्थिक व्यवस्थापन आणि अंमलबजावणीमध्येही प्रमुख भूमिका बजावत आहेत.
 
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत ७ डॉक्टरांची नावे समोर आली. स्फोटाचा मुख्य आरोपी डॉ. उमर उन नबी हा स्फोटाच्या दिवशी स्फोटकांनी भरलेले वाहन चालवत होता. दरम्यान, ६ डॉक्टरांना (डॉ. उमर उन नबी, डॉ. मुजम्मिल शकील, डॉ. शाहीन शाहिद, डॉ. आदिल अहमद, डॉ. परवेज अंसारी, डॉ. निसार उल हसन) अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी अजूनही फरार आहे.
 
व्हाईट-कॉलर जिहाद (White Collar Jihad) ही प्रवृत्ती अचानक निर्माण झालेली नाही. गेल्या काही वर्षांपासून शिक्षित वर्गातील कट्टरतेची बीजे शांतपणे रुजत होती. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या स्फोटाच्या एक दिवस आधी फरीदाबादमध्ये हे जिहादी मॉड्यूल (White Collar Jihad) उघड झाले. तपासात समोर आले की दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचे संबंध पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद संघटनेशी आहेत. पूर्वीच्या दहशतवादात धार्मिक शिक्षणावर भर असे, पण आता दहशतवादी संघटना अभियंता, आयटी तज्ज्ञ, कम्युनिकेशन आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांवर अवलंबून आहेत.
 
हेही वाचा : KEM Hospital : केईएममध्ये रुग्णांच्या नोंदीसाठी दहा नवीन केंद्र; औषधांचा तुटवडा भरून काढणार
 
व्हाईट-कॉलर जिहाद (White Collar Jihad) हा काही नव्याने आलेला जिहाद नाही. यापूर्वीसुद्धा अनेक घटना या व्हाईट-कॉलर जिहादच्या (White Collar Jihad) अंतर्गत घडल्या आहेत. १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण पाहता सायन मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएस डॉक्टर, १९८८ मध्ये हुजी कार्यकर्ता अब्दुल करीम टुंडा याच्या संपर्कात आले आणि दहशतवादात सामील झाले. त्याने १९९० च्या दशकात झालेल्या ५० हून अधिक बॉम्बस्फोटांमध्ये भूमिका बजावली. त्याच्या वैद्यकीय ज्ञानामुळे अत्याधुनिक आयईडी तयार करण्यात तो तज्ज्ञ होता.
 
२०१८ दरम्यान काश्मीर विद्यापीठातून समाजशास्त्रात पीएचडी केलेले प्राध्यापक, ज्यांनी अध्यापन सोडून हिजबुल मुजाहिदीन मध्ये प्रवेश केला. दोनच दिवसांनी ते चकमकीत ठार झाले. या घटनेने शैक्षणिक वर्गातील कट्टरतेचा धोकादायक पायंडा दाखवला. ऑक्टोबर २०२३ ची घटना, तीन शिक्षित व्यक्ती — एक एनआयटी मधील माइनिंग इंजिनिअर, एक एएमयू पदवीधर (जमिया मिलिया इस्लामियात पीएचडी साठी निवडलेला), आणि गाझियाबादचा कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअर — यांना आयएसआयएस मॉड्यूल चालवण्याच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्यांनी एकॅडेमिक माहिती आणि तांत्रिक ज्ञान वापरून स्फोटक तयार केल्याचे निदर्शनास आले होते. शहनवाजने माइनिंग दस्तावेजांचा वापर करून बॉम्बनिर्मिती तंत्र शिकले होते.
 
ऑक्टोबर २०२५ ची पुण्यातली घटना पाहिली तर एक सॉफ्टवेअर इंजिनिअर, अल-कायदा संलग्न गटाशी संबंध असल्याने महाराष्ट्र एटीएसने अटक केली. तो तरुणांना ऑनलाइन कट्टर बनवत होता आणि ओसामा बिन लादेनचे भाषण प्रसारित करत होता. आयटी कौशल्य वापरून त्याने गुप्त डिजिटल नेटवर्क उभे केले. अशी कित्येक उदाहरणे आहेत जी व्हाईट-कॉलर जिहादावर (White Collar Jihad) प्रकाश टाकतात. व्हाईट-कॉलर जिहाद (White Collar Jihad) ही केवळ सुरक्षा यंत्रणांची नाही, तर समाज, शिक्षण आणि विचारविश्वाची लढाई आहे. या नव्या प्रकारच्या दहशतवादावर विजय मिळवण्यासाठी तितकीच बौद्धिक, तांत्रिक आणि नैतिक सज्जता आवश्यक आहे.
 
हे वाचलंत का ? : Ashish Shelar : लंडनमधील ऐतिहासिक 'इंडिया हाऊस' राज्य शासन ताब्यात घेणार; मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती
 
दीर्घकालीन आराखडा तयार करण्याची गरज
 
संपूर्ण प्रकरण निंदनीय आणि निषेधार्ह आहे, आपल्या समाजहित आणि देशहिताच्या आड येणारी ही मानसिकता आहे. अशा मानसिकतेचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने दीर्घकालीन आराखडा तयार केला पाहिजे. वाढत चाललेला कट्टरतावाद या चिंता वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. जैश-ए-मोहम्मदची महिला विंग 'जमात-उल-मुमिनात' सक्रिय झाली असून, हा त्याचा भाग आहे का याचादेखील तपास होणे आवश्यक आहे.
 
- डॉ. शमसुद्दीन तांबोळी, अध्यक्ष, मुस्लीम सत्यशोधक मंडळ
 
धार्मिक कट्टरतेचे प्रशिक्षण मौलवींच्या माध्यमातूनच
 
पूर्वीचा दहशतवादासंदर्भात लोकांचा जो समज होता, 'व्हाईट-कॉलर जिहाद' (White Collar Jihad) ने एका क्षणात बदलून टाकला आहे. अमेरिकेतील ९/११ ची घटना पाहता, ती याचेच उदाहरण आहे. त्यानंतर मधल्या काळात देशात ज्या दहशतवादी कायवाई झाल्या, त्यातील बहुतांश अतिरेकी देखील सुशिक्षितच होते. आज जरी त्यांना लिबरल एज्यूकेशन मिळाले असले तरी धार्मिक कट्टरतेचे प्रशिक्षण त्यांना मौलवींच्या माध्यमातून मिळत आले आहे. शैक्षणिक संस्थामध्ये सिक्यूरिटी ऑफिसर म्हणून कोणालाही नेमून चालणार नाही. ज्यांनी गुप्त वार्ता संस्थांमध्ये काम केले आहे, अशांना त्याठिकाणी नेमण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून विद्यापीठांमध्ये होणाऱ्या अशा हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवता येईल.
 
- प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य
 
जिहादी इस्लाममध्ये शिक्षणामुळे कट्टरतावाद कमी होत नाही
 
जिहादी इस्लाममध्ये शिक्षणामुळे कट्टरतावाद कमी होत नाही, हे मुळात लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. केवळ अशिक्षितच अतिरेकी प्रवृत्तीचे बनतात असे नाही. सरकारनेही या दृष्टीने विचार करणे महत्त्वाचे आहे, कारण काही शैक्षणिक संस्था अशा आहेत ज्याठिकाणी कट्टरतावादी मानसिकता तयार केली जातेय. मुस्लिम समुदायाने आणि समुदायाच्या नेतृत्वाने देखील याबाबत गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे, की त्यांची तरुण पिढी कुठल्या मार्गावर चालली आहे.
 
- मिलिंद परांडे, केंद्रीय संघटन महामंत्री, विश्व हिंदू महामंत्री
 
उच्च शिक्षण घेऊन सुद्धा अशा लोकांच्या वैचारिक क्षमतेत बदल होत नाही. कुठेना कुठेतरी कट्टरतावादी मानसिकतेच्या गटाशी ते संपर्कात असतात. त्याच ठिकाणी त्यांचे ब्रेन वॉशिंग केले जाते. दिवसरात्र याच कामात ते गुंतलेले असतात. शिक्षणाला दोष देऊन चालणार नाही. त्यांची जिहादी मानसिकता कट्टरतावाद्यांच्या संपर्कात आल्यानेच तयार झालेली असते.
 
- रिदा राशीद, सरचिटणीस, अल्पसंख्याक मोर्चा, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0