समाजातील गरजूंना केलेल्या मदतीचे समाजमाध्यमांवर फोटो टाकून किंवा प्रसिद्धी माध्यमात बातमी देऊन ते काम समाजातील सर्वच स्तरापर्यंत पोहोचविले जाते. पण, म्हणतात ना, दिलेले दान हे गुप्त असावे. त्याचीच प्रचिती डोंबिवलीतील ‘साईराज मित्रमंडळा’च्या कामातून येते. या मंडळाने आजवर केलेल्या कामाला कधीही प्रसिद्धी दिली नाही. एवढेच काय तर ते काम करताना कधी फोटोदेखील काढले नाही. यामुळे हे मंडळ त्यांच्या कामाने इतरांपेक्षा वेगळे ठरले आहे. त्यांच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाशझोत...
साईराज मित्रमंडळा’ची स्थापना 2004 साली झाली. ‘आपण समाजाचे देणे लागतो’ या भावनेतून ‘साईराज मित्रमंडळ’ पाड्यावरील वनवासींना नेहमीच मदतीचा हात देते. वनवासींचे जीवनमान उंचवावे, याकरिता त्यांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप केले जाते. महिलांसाठी साड्यांचे वाटप केले जाते. हे काम गेल्या 20 वर्षांपासून संस्थेकडून सातत्याने सुरु आहे. या कामाचा ‘इव्हेंट’ केला जात नाही. तसेच कोणतीही मदत करताना त्यांचा फोटो काढला, तर त्यातून त्या व्यक्तीचा आत्मसन्मान दुखावला जातो. त्यामुळे मंडळाकडून मदतकार्याचे फोटो काढणेदेखील टाळले जाते. त्यामुळे मंडळाकडून एकीकडे मदतीचा ठेवा आणि दुसरीकडे वनवासींचा आत्मसन्मानही जपण्याचे काम केले जाते. वनवासींना देखील मंडळाविषयी विशेष कौतुक आणि आपुलकी वाटते. ‘कोविड’ काळात देखील सर्व जग एका जागी थबकले होते. उद्योगधंदे ठप्प झाले होता. ‘कोविड’ची लागण होऊ नये म्हणून सामाजिक अंतर पाळले जात होते. या परिस्थितीतही वनवासींच्या घरात चूल पेटावी, याकरिता जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप मंडळातर्फे करण्यात आले. ‘कोविड’च्या महामारीत ‘साईराज मित्रमंडळा’ची लाभलेल्या साथीमुळे वनवासींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
‘साईराज मित्रमंडळ’ केवळ वनवासी भागांतच नव्हे, तर स्थानिक पातळीवर डोंबिवलीत देखील कार्यरत आहे. मंडळाकडून डोंबिवलीतील आजदेपाडा विभागात शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. महिलांनी स्वावलंबी व्हावे, याकरिता त्यांना संगणकीय प्रशिक्षण दिले जाते. सध्याच्या काळात इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाला अस्खलित इंग्रजी बोलता आले पाहिजे. कोणाच्याही करिअरमध्ये इंग्रजी भाषा हा अडथळा ठरू नये, याकरिता ते इंग्लिश स्पिकिंग कोर्सही घेतले जातात. या सर्व प्रशिक्षणाचा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने लाभ घेतात. या प्रशिक्षण शिबिरांतून महिला स्वावलंबनाचे धडे गिरवित आहेत. महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले आहे. त्यामध्ये अंदाजे 75 महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले आहे. याव्यतिरिक्त पॅनकार्ड शिबीर भरविण्यात येते. आतापर्यंत अंदाजे 495 जणांना पॅनकार्डचे मोफत वाटप केले आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे मानले जाते. त्यामुळे कोणालाही रक्ताची गरज भासल्यास ते सहज उपलब्ध व्हावे, याकरिता रक्तदान शिबीरही मंडळातर्फे घेतली जातात.
‘साईराज मित्रमंडळा’कडून विविध उपक्रम राबविले जातात. त्या उपक्रमांच्या निमित्ताने परिसरातील सर्वजण एकत्र येतात. त्यांच्यात एकोपा वाढतो. विचारांची देवाणघेवाण होते. लोक कुरबुरी विसरून एकत्र येतात. लोकांमध्ये दरी निर्माण होत नाही आणि मंडळाच्या कार्यक्रमातून आजदेपाड्यात एकोपा टिकून राहत आहे, असे ‘साईराज मित्रमंडळा’च्या नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष जर्नादन काळण यांनी सांगितले.
मंडळातर्फे दरवष मोठ्या धूमधडाक्यात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात देवीसाठी केलेली फुलांची विशेष सजावट सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते. नवरात्रोत्सवातील सजावटीचे काम बबन पालखे करतात. मागील 15 ते 16 वर्षांपासून अनिल शेगवण आणि मनोज शेगवण देवीच्या सजावटीचे काम पाहतात. कुंदन काळण हे ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर महाभंडारा आयोजित करतात. नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून जर्नादन काळण काम पाहतात. नवरात्रीत परिसरातील नागरिकांसाठी गरब्याचे आयोजन केले जाते. परिसरातील महिलांना अन्य ठिकाणी गरब्या खेळण्यासाठी जावे लागत नाही. तसेच अतिशय सुरक्षित वातावरण येथे असल्याने महिला मनसोक्तपणे गरब्याच्या तालावर थिरकतात. नवरात्रीत नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये पहिल्या दिवशी वाजतगाजत देवीचा आगमन सोहळा पार पडतो. त्यामध्ये मंडळाव्यतिरिक्त परिसरातील नागरिकही मोठ्या उत्साहात सहभागी होतात. त्यानंतर दुर्गादेवीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. महिलांसाठी हळदीकुंकू व ‘होम मिनिस्टर’, बच्चे कंपनीसाठी चित्रकला स्पर्धा व नवचंडी होम, वेशभूषा स्पर्धा असे विविध कार्यक्रम पार पडतात. या स्पर्धेतून आपल्या गुणांची चुणूक दाखविणाऱ्यांना पारितोषिके दिली जातात. मंडळातर्फे 26 जानेवारीला सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन केले जात होते. पण, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष काळण यांचे निधन झाले. त्यानंतर सत्यनारायाणाच्या पूजेत खंड पडला तो कायमचाच!
आजदेपाडा येथील प्रवेशद्वारावरच अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले असे. नागरिकांना त्या परिसरातून जाताना नाक मुठीत घेऊन जावे लागायचे. पण, 2003 साली जर्नादन काळण यांनी हा परिसर स्वच्छ करून घेतला. त्याठिकाणी उद्यान उभारायचा काळण यांचा विचार होता. परंतु, विनोद काळण यांनी त्याठिकाणी जिम तयार करूया, असा प्रस्ताव मांडला. त्याला जर्नादन काळण यांनीदेखील दुजोरा दिला. त्यामुळे अस्वच्छ जागेवर आता जिम तयार करण्यात आली आहे. त्यांचा परिसरातील नागरिक लाभ घेत आहेत. या मंडळात अजय काळण, आनंद सरमळकर, भरत सरमळकर, विष्णु राईन, उदय वगळ, सुनील वगळ, उदय वगळ, भास्कर कदम, गोपाळ वामने, अलका काळण, लक्ष्मी काळण, आशिष अदाते, ममता सरमळकर, संगीता काळे, गीता पावसकर, सुलोचना माटे, कांचन सुरेंद्र काळण, वैशाली राईन, शुभांगी कदम, हौसा काळण, जनाबाई काळण, आशिष अदाते, नामदेव काळण, वैभव पेडणेकर आदींचे योगदान राहिले आहे. तर आता युवांमधून सचिन काळण, ऋषिकेश जनार्दन काळण, देवेन जनार्दन काळण, केतन दळवी, हर्षल सरमळकर, ईश्वर हावळे, अरविंद काळण, वैभव पेडणेकर हे मंडळाच्या कामाची धुरा सांभाळत आहेत.एखाद्या मंडळाने काही छोटेसे काम केले तरी त्याचा गाजावाजा केला जातो. मात्र, कोणतीही प्रसिद्धी न करता, आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटविणारे ‘साईराज मित्रमंडळ’ हे इतरांसाठी आदराचे स्थान ठरले आहे.
(अधिक माहितीसाठी संपर्क : 8104807768)