mega demolition drive संतापजनक! 'मेगा डिमोलिशन ड्राइव्ह' दरम्यान पोलिसांवर दगडफेक

12 Nov 2025 18:53:48
 
mega demolition drive
 
मुंबई : (mega demolition drive) गुजरातच्या गिर सोमनाथ जिल्ह्यातील प्रभास पाटण येथे प्रशासनाने हाती घेतलेल्या 'मेगा डिमोलिशन ड्राइव्ह' दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. सरकारी जमिनीवर उभारलेली बेकायदेशीर बांधकामे हटविण्याचे काम सुरू होते. त्याच दरम्यान, परिसरातील बेकायदेशीर दरगाह हटवण्याच्या प्रक्रियेदरम्यान विशिष्ट धर्मातील लोक जमले ज्यामध्ये अनेक महिला आणि मुले होती; त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. आता या घटनेप्रकरणी सुमारे शेकडो जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ परिसरात काही काळापासून प्रशासन बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध ही मोठी कारवाई करत आहे. या मोहिमेत अनेक निवासी आणि व्यावसायिक बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात आली आहेत. त्याच मोहिमेचा भाग म्हणून, दि. १० नोव्हेंबर रोजी प्रभास पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंख सर्कलजवळ, सोमनाथ मंदिराजवळील दुकाने, घरे आणि धार्मिक स्थळांसह ११ अवैध मालमत्तांचे पाडकाम करण्याची तयारी करण्यात आली होती.
 
हेही वाचा :  Devendra Fadnavis : समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
बहुतेक अतिक्रमण हटवल्यानंतर, संध्याकाळच्या सुमारास पोलिसांसह पथक हजरत रंगीलाशाह दरगाह हटवण्यासाठी पोहोचले. त्यावेळी बुरखा घातलेल्या महिलांचा आणि मुलांचा एक गट तिथे आला आणि पोलिसांशी वाद घालू लागला. पोलिसांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु जमावातील लोकांनी आरडाओरडा करत थेट पोलिसांवर हल्ला केला आणि दगडफेक सुरू केली.
 
या दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला, त्याचदरम्यान त्यांनी अश्रूधूराच्या नळकांड्याही फोडल्याचे निदर्शनास येत आहेत. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या दगडफेकीत प्रभास पाटण पोलीस ठाण्याचे पीआय एम. व्ही. पटेल आणि सर्व्हिलन्स पथकाचे हेड कॉन्स्टेबल कुलदीपसिंह परमार जखमी झाले. पोलिसांच्या मते, सुमारे ८० ते १०० लोकांच्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली होती.
 
स्थिती नियंत्रणात आल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले. पोलिसांनी सांगितले की सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून आणि हल्लेखोरांविरुद्ध तसेच जमावातील महिलांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 189(2), 189(3), 189(5), 190, 191(2), 195(1), 125, 121(1) आणि गुजरात पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सरकारी जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामे हटविण्याचे काम सुरू राहील, तसेच कायदा हातात घेणारे आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
 
 
 
Powered By Sangraha 9.0