मुंबई : भारताचा आंतरराष्ट्रीट चित्रपट महोत्सव २०२५ (इफ्फी गोवा, IFFI GOA 2025) लवकरच गोव्यात सुरु होणार आहे. २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान हा सोहळा पार पडणार आहे. दरम्यान या ५६व्या मोहत्सवात इंडियन पॅनोरमा सेक्शनमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. ‘गोंधळ’, ‘आता थांबायचं नाय’, ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’, ‘दृश्य अदृश्य’ हे चार चित्रपट यावेळी दाखवण्यात येणार आहेत. याशिवाय जगभरातील २०० हून अधिक चित्रपट या महोत्सवात दाखवले आणि प्रदर्शित होणार आहेत.
मोठी स्टारकास्ट असलेला बहुचर्चित ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ हा चित्रपट आता या मोठ्या सोहळ्यात दाखवला जाणार आहे. दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा हा चित्रपट त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. फिचर फिल्म या सेक्शनमध्ये ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ची निवड झाली आहे.
तसेच, पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा मिलाफ असलेला बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘गोंधळ’ आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे. गोवा येथे होणाऱ्या भारतीय सरकारच्या ५६ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाच्या ‘इंडियन पॅनोरमा गोल्डन पिकॅाक सेक्शन’ मध्ये ‘गोंधळ’ची अधिकृत निवड झाली आहे. त्यामुळे गोंधळ चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये अधिकच वाढली आहे
या फेस्टिव्हलमध्ये ‘आता थांबायचं नाय!’ आणि ‘गोंधळ’ या चित्रपटाची अधिकृत निवड झाली असून या दोन्ही चित्रपटांच्या दिग्दर्शकांचे हे दिग्दर्शकीय पदार्पण आहे. मात्र ‘गोंधळ’ने एक पाऊल टाकत ‘इंडियन पॅमोरमा गोल्डन पिकॅाक अवॅार्ड’ विभागात स्थान पटकावले आहे. ‘सेलिब्रेट द जॉय ऑफ सिनेमा’ या घोषवाक्याने साजरा होणाऱ्या या प्रतिष्ठित महोत्सवात ‘गोंधळ’ची निवड होणे हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, “आमच्या टीमसाठी ही अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. ‘गोंधळ’ हा आपल्या मातीतला, श्रद्धा आणि परंपरांशी जोडलेला सिनेमा आहे आणि त्याची निवड भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने आयोजिलेल्या इफ्फी सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणे म्हणजे आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचा सन्मान आहे. आमच्या कलेला जागतिक पातळीवर ओळख मिळत आहे, यापेक्षा मोठं बक्षीस काही असूच शकत नाही.”