अर्ध्या आघाडीची लढाई!

12 Nov 2025 12:14:41

देशात बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांची बाजू घेण्यात काँग्रेसचे नेते नेहमीच आघाडीवर राहिले. दहशतवाद्यांना फाशीपासून रोखण्यासाठी या पक्षाचेच वकील मध्यरात्रीही न्यायालयात गेले. इतकेच नव्हे, तर पाकिस्तानी दहशतवाद्यांऐवजी हिंदूंनीच 26/11 सारखे हल्ले घडविल्याचा धांदात प्रचारही काँग्रेसनेच केला. देशात ‌‘जिहाद‌’ करणारे हे गरिबीमुळे व अशिक्षिततेमुळे तसे करतात, हा काँग्रेसचा दावाही ताज्या घटनेने खोटा पाडला आहे. मात्र, देशविरोधी कारवाया करणाऱ्यांमध्ये आता काही राजकीय पक्षांचाही समावेश होणे, ही देशासाठी सर्वस्वी दुर्दैवाचीच गोष्ट!

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच देशात, अगदी राजधानी दिल्लीत परवा एक बॉम्बस्फोट झाला. मोदी यांचे सरकार सत्तेवर येण्यापूवच्या दहा वर्षांत भारतीयांना देशाच्या कोणत्याही शहरात केव्हाही बॉम्बस्फोट होण्याची सवय होऊन गेली होती. हे स्फोट कोण घडविते, हे ठावूक असूनही त्यांच्याविरोधात तत्कालीन काँग्रेस सरकारकडून कोणतीच ठोस कारवाई केली जात नव्हती. मात्र, मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात बॉम्बस्फोट घडविण्याची हिंमत या देशविरोधी शक्तींना होत नव्हती. म्हणूनच सोमवारी संध्याकाळच्या घाईगदच्या वेळेत राजधानी दिल्लीत, अगदी लाल किल्ल्याच्या समोरच झालेल्या भीषण स्फोटाने दिल्लीच नव्हे, तर सारा देश हादरला. हे कसे घडले, हाच प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत होता. पण, या अघटिताची चाहूल आणि संकेत काही दिवसांपासूनच मिळत होते.

काही दिवसांपूव श्रीनगरमधील नौगाव येथे ‌‘जैश-ए-मोहम्मद‌’ या दहशतवादी संघटनेकडून भारताविरोधात काही पोस्टर लावण्यात आली. त्या घटनेचा तपास सुरू झाल्यावर त्यामागे सहारनपूरमधील एक डॉ. मुझम्मील शकील असल्याचे दिसून आले. त्याला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत देशात भीषण घातपाती कारवाया करण्याचा मोठा कट उघड झाला आणि सुरक्षा तसेच तपास यंत्रणांनी वेगाने पावले उचलून, त्यामागील सूत्रधारांना अटक केली आणि त्यांनी जमविलेली स्फोटक सामग्री जप्त केली. त्यामुळे देशातील संभाव्य मोठा घातपात टळला असला, तरी त्यातील काही आरोपींचे धैर्य खचल्यामुळे दिल्लीत सोमवारी स्फोट झाला. हा स्फोट पूर्वनियोजित नसावा आणि तो चुकून झाला असावा, याचे बरेच संकेत आणि धागेदोरे मिळत असले, तरी पूर्ण चौकशीअंतीच खरे चित्र स्पष्ट होईल.

या बॉम्बस्फोट प्रकरणाशी आणि सापडलेल्या स्फोटक पदार्थांशी संबंधित सर्व आरोपी हे पेशाने डॉक्टर आहेत. त्यातील प्रमुख आरोपी डॉ. मुझम्मील शकील हा तर चीनमधून डॉक्टरकीची पदवी घेऊन आला आहे, असे सांगितले जाते. यावरून देशातील दहशतवाद हा अशिक्षित आणि गरीब मुस्लिमांकडून घडविला जातो, या विरोधकांच्या दाव्यातील पोकळपणाही सिद्ध झाला आहे. तसाच विचार केला, तर ‌‘अल कायदा‌’चा प्रमुख ओसामा बिन लादेन हा गर्भश्रीमंत घराण्यातील होता आणि तो स्वत: एक अभियंता होता. त्याचा उजवा हात आयमान जवाहिरी हाही डॉक्टर होता. तसेच 9/11 हल्ल्यांतील बहुसंख्य आरोपी हे उच्चविद्याविभूषित होते. त्यामुळे दहशतवादाचा शिक्षणाशी किंवा आर्थिक परिस्थितीशी काहीएक संबंध नसतो, हेही दिसून येते. या स्फोटाशी संबंधित आरोपींनी आपल्या उच्च शिक्षणाचा वापर अधिक घातक आणि व्यापक प्रमाणावर जीवितहानी घडविणाऱ्या घातपाती कारवाया करण्यासाठी केला, ही गोष्ट दुर्दैवी म्हणावी लागेल. डॉक्टरकडे सामान्य माणूस ‌‘पृथ्वीवरील देव‌’ म्हणून पाहतो. कारण, डॉक्टर हा रुग्णाचा जीव वाचवितो. पण या आरोपींनी, तसेच या प्रकरणातील आरोपींचे काश्मीरशी असलेले संबंध हेही काश्मीरमधील परिस्थितीची सद्यस्थिती दर्शविते. या राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी किती अवाजवी आणि अस्थानी आहे, तेच यातून दिसून येते. काश्मीरमधील उच्चशिक्षित वर्गही देशविरोधी घातपाती कारवायांमध्ये सक्रिय आहे, ही गोष्ट यातून दिसून आली आहे.

काँग्रेस, आम आदमी पाट, राजद यांसारख्या पक्षांनी या बॉम्बस्फोटातही आपली राजकीय सोय पाहावी, ही गोष्ट हे पक्ष किती नीच स्तरावर घसरले आहेत, ते दर्शविते. दिल्लीतील स्फोट हे तपास यंत्रणांचे अपयश आहे, हे म्हणणे एकवेळ समजून घेतले, तरी बिहारमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानात आपल्याला मतदान व्हावे, यासाठी भाजपने हा स्फोट घडवून आणला, असा या विरोधकांचा आरोप केवळ निषेधार्ह आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानात सत्तारूढ आघाडीच्या बाजूने दिसलेल्या मतदारांच्या प्रचंड उत्साहाने विरोधी पक्षांची झोप उडाली आहे. विधानसभेच्या या निवडणुकीत होणारी आपली संभाव्य हार विरोधकांच्या लक्षात आल्यामुळेच, त्यांनी या बॉम्बस्फोटाचा संबंध निवडणुकीशी लावला.

काँग्रेसची सत्ता असताना 2004 ते 2012 या काळात देशात 11 दहशतवादी हल्ले झाले. या विविध हल्ल्यांमध्ये एकंदर 939 निरपराध लोकांचा बळी गेला होता. गृहमंत्री अमित शाहा यांनी सांगितले की, 2004 ते 2014 या काळात देशात 7 हजार 217 दहशतवादी घटना घडल्या. पण, मोदी सरकार सत्तेत आल्यावर 2014 ते 2024 या काळात या घटना 2 हजार 422 इतक्या घसरल्या. याच काळात अशा घटनांमध्ये नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण 81 टक्क्यांनी घसरले. आता देशातील नक्षलवादी हिंसाचार जवळपास संपुष्टात आला असून, पुढील वषच्या 31 मार्चपर्यंत तो पूर्णपणे संपुष्टात येईल, अशी चिन्हे आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, मोदी सरकारने केवळ बाह्य शत्रूंपासूनच नव्हे, तर देशांतर्गत देशविरोधी शक्तींपासूनही भारतीयांचे रक्षण केले आहे. ज्या मोदी यांनी ही कामगिरी केली, ते केवळ काही मते मिळावीत म्हणून असा बॉम्बस्फोट घडवून आणतील, यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. विरोधकांच्या या आरोपाचा झालाच, तर उलटाच परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारतीय सैन्याला अडीच आघाड्यांवर लढावे लागते, असे दिवंगत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी म्हटले होते. चीन व पाकिस्तान या दोन आघाड्या आहेत, हे उघड आहे. पण, देशात राहून देशविरोधी कारवाया करणाऱ्या भारतीय संघटना ही अध आघाडी आहे, असे जन. रावत यांना म्हणायचे होते. त्यात काश्मीरमध्ये लष्करावर दगडफेक करणारे, रेल्वेमार्गांवर दगड ठेवणारे, नक्षलवादी आणि या देशविघातक शक्तींना पाठिशी घालणाऱ्यांचा समावेश होतो. पाकिस्तानविरोधात ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’ करून सहज जिंकता येते. पण, देशातील या अर्ध्या आघाडीविरोधातील लढाई किती गुंतागुंतीची आणि अवघड आहे, हेच दिल्लीतील स्फोटाने दाखवून दिले आहे. कारण, या अर्ध्या आघाडीत देशाचेच काही नागरिक आणि काही विरोधी पक्षही सहभागी असल्याचे दिसून येते, ही दुर्दैवाची आणि अस्वस्थ करणारी गोष्ट!


Powered By Sangraha 9.0