
मुंबई : हिंदी सिनेविश्वातला लोकप्रिय अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. आज मध्यरात्री गोविंदा अचानक त्याच्याच घरी बेशुद्ध पडल्याने तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागच्या काही दिवसांपासून गोविंदा निरनिराळ्या कारणांनी त्रस्त आहे. त्यातच आता पुन्हा एकदा त्याची तब्येत बिघडली आहे. गोविंदाला उपचारासाठी जुहू इथल्या क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मंगळवारी रात्री गोविंद अचानक बेशुद्ध पडला, त्यानंतर त्याला औषधंही देण्यात आली होती. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रात्री १ वाजता त्याला क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गोविंदाची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती त्याचे जवळचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी दिली आहे. डॉक्टरांनी गोविंदाच्या अनेक चाचण्या केल्या असून, त्याचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली गोविंदावर उपचार सुरू असल्याचं त्याच्या वकिल मित्राने सांगितलं आहे.
याविषयी बोलताना ललित बिंदल म्हणाले, सुरुवातीला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करण्यात आले. पण त्यानंतरही बरं वाटत नसल्याने रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. गोविंदाला स्वतः ललित बिंदल रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयातील डॉक्टर डॉ. नामजोशी यांनी सांगितलं की, “गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर आहे. तो आपल्या रूममध्ये विश्रांती घेत आहे. त्याच्या विविध चाचण्यांचे निकाल अद्याप आलेले नाहीत, मात्र काळजी करण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही.”
दरम्यान, जवळपास १ वर्षभरापूर्वी गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती. तो स्वतः त्याची बंदूक पाहत होता त्याचवेळी त्याच्याच हातातून मिसफायर झाल्याचं म्हटलं गेलं होतं. ही गोळी त्याच्या गुडघ्याला लागली होती. आणि त्यानंतर त्याला तातडीने क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शस्त्रक्रिया करून त्याच्या पायातली गोळी काढण्यात आली होती. त्यानंतर तो बरा झाला होता. यावर्षी त्याने सगळे सणदेखील साजरे केले होते.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच गोविंदा स्वतः कार चालवत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असलेल्या धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी गेला होता. त्याचे व्हिडीओस देखील सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. त्या भेटीनंतर त्यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाली अशी चर्चा सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत आहे. पत्नी सुनीता अहुजाने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केल्याचं म्हटलं जात होतं. मात्र चर्चांनंतर तिने माघार घेतल्याची माहिती तिच्या वकिलांनी दिली होती. विविध मुलाखतींमध्ये सुनीता तिच्या आणि गोविंदाच्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांबद्दल तसेच गोविंदाच्या करियरबद्दल बोलताना दिसते.