मातीतील खेळाचा खेळाडू

12 Nov 2025 13:01:42

खो-खो या मातीमधील पारंपरिक खेळामध्ये उल्लेखनीय कामगिरी करतानाच, देशाच्या क्रीडा क्षेत्राचे भविष्य घडवणाऱ्या ऋषिकेश मुरचवडे याच्याविषयी...

भारतीय क्रीडाजगत आता नव्या उंचीवर झेपावत आहे. पूव ज्या खेळांकडे दुर्लक्ष होत असे, जसे की, खो-खो, कबड्डी, मल्लखांब, धनुर्विद्या, अशा पारंपरिक भारतीय खेळांचे आता नव्या जोमाने पुनरुज्जीवन होताना दिसते. या खेळांमध्ये देशाच्या शहरी आणि ग्रामीण भागातून उभ्या राहिलेल्या नव्या दमाच्या खेळाडूंच्या प्रतिभेमुळे, हे खेळ आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटवत आहेत. हे दिवस भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी सुवर्णयुगाची चाहूल देणारे ठरत आहेत. अशाच खो-खो या देशाच्या मातीमधील पारंपरिक खेळामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा एक खेळाडू म्हणजेच ऋषिकेश मुरचवडे होय!

ऋषिकेशचा जन्म मुंबईमध्ये 1998 साली झाला. वांद्य्रात लहानाचा मोठा झालेल्या ऋषिकेशच्या घरची परिस्थिती मात्र सामान्य मध्यमवगय कुटुंबाला साजेशीच. त्याच्या जन्माच्यावेळी त्याच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते, तर आई गृहिणी होती. शालेय जीवनाच्या प्रारंभीपासूनच ऋषिकेशचे लक्ष खेळाकडे आकर्षित होत होते. शालेय जीवनात अंगात असलेल्या कमालीच्या ऊर्जेच्या जोरावर ऋषिकेशने मैदानात छाप पाडण्यास सुरुवात केली. पहिली आणि दुसरीपर्यंत ऋषिकेश लंगडी खेळायचा. मात्र, तिसरी इयत्तेत असताना, ऋषिकेशचे सध्याही प्रशिक्षक असलेल्या डॉ. नरेंद्र कुंदर सरांनी त्याच्यातील प्रतिभा हेरली. ऋषिकेशच्या क्रीडागुणांना हेरलेल्या कुंदर सरांनी, ऋषिकेशला भेटून ‌‘खो-खो खेळणार का?‌’ अशी विचारणा केली. अर्थातच, काही नवीन खेळायला मिळणार म्हणूनच ऋषिकेशने कुंदर सरांना होकार कळवला आणि खो-खोच्या मैदानात पहिले पाऊल टाकले. त्यानंतरच्या काळात या खेळातील बारकावे, आवश्यक कौशल्ये अंगीकृत करण्यासाठी ऋषिकेशने प्रामाणिकपणे मेहनत घेतली. या मेहनतीमुळे अल्पावधीतच ऋषिकेश खो-खोमध्ये पारंगत झाले. त्यामुळे इयत्ता चौथीमध्येच ऋषिकेशचा खो-खोचा पहिला सामना खेळलेदेखील. नंतरच्या काळात शालेय जीवनातच, अनेक नवनवीन स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण वाढले. इयत्ता सहावीमध्ये असतानाच, ऋषिकेश यांची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली होती. यानंतरच्या शालेय जीवनातच अनेकदा जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये ऋषिकेश सहभागी झाले होते.

पुढे ऋषिकेशचे दहावीचे वर्ष आले. पण, त्याच्या पालकांनी थोडा वेगळा विचार करताना, ऋषिकेशला अभ्यासाबरोबरच खेळण्यासही परवानगी दिली. त्यामुळे ऋषिकेशच्या खेळामध्ये कुठेही खंड पडला नाही. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुंबईच्या प्रसिद्ध रुईया महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळाला. त्यानंतर खेळ आणि अभ्यास सांभाळत, ऋषिकेशने बारावी आणि त्यानंतर इतिहासामधून कला शाखेची पदवीही संपादन केली. मात्र, हे सगळे करताना ऋषिकेशने खेळातच करिअर करण्याचे मनाशी निश्चित केले होते. एका सामान्य मराठी मध्यमवगय कुटुंबात जन्मलेल्या ऋषिकेशने आपल्या मनीचा हा विचार पालकांना सांगितला. ऋषिकेशच्या पालकांचे विशेष म्हणजे, त्यांनी त्याच्या भावना समजून घेतल्या. मात्र, या क्षेत्राविषयी फार माहिती नसल्याने आणि आपला मुलगा काही वेगळे करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आल्यावर, ऋषिकेशच्या पालकांनी प्रशिक्षकांची भेट घेत या मनाची खात्री करुन घेतली.

ऋषिकेशचा खेळातील प्रवास अव्याहतपणे सुरुच असला, तरी संघर्षच नाही, असा एकही खेळाडू नाही. असा संघर्ष ऋषिकेशच्याही वाटेला आला. जगभर पसरलेल्या ‌‘कोविड‌’ महामारीचा फटका, क्रीडा क्षेत्रालाही बसला. त्यामुळे ऋषिकेशच्या आयुष्यातही अनिश्चितता आली होती. झाले असे की, आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठीचे ऋषिकेशचे प्रशिक्षण शिबीर पूर्ण झाले आणि देशभरात ‌‘लॉकडाऊन‌’ची घोषणा झाली. पुढे दोन वर्ष क्रीडा क्षेत्रावरही ‌‘लॉकडाऊन‌’ची छाया राहिली. याकाळात क्रीडा क्षेत्राचे काही निश्चित दिसत नसल्याने, करिअरचे मार्ग बदलण्याचा विचार ऋषिकेशच्या मनात येऊन गेला. तसेच, घरातील एकुलता एक मुलगा असल्याने खाद्यांवरची जबाबदारीही ऋषिकेशला स्वस्थ बसू देत नव्हती. मात्र, तेवढ्यातच ‌‘लॉकडाऊन‌’ शिथील झाले आणि देशातील मैदाने पुन्हा गजबजली. यामुळे क्रीडा क्षेत्राबरोबरच ऋषिकेशच्या मनाने देखील उभारी घेतली. आजही खो-खो या खेळाशी ऋषिकेश जोडलेला असून, ‌‘अल्टिमेट खो-खो‌’सारख्या अनेक लीगच्या सामन्यांमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची कामगिरी प्रशंसनीय आहे.

ऋषिकेशची खो-खो खेळातील चमक सुरुवातीपासूनच उत्तम राहिली आहे. त्यामुळे 18 वर्षाखालील सर्वोत्तम खेळाडूंना मिळणारा ‌‘वीर अभिमन्यू पुरस्कार‌’, राज्यस्तरीय ‌‘राजे संभाजी पुरस्कार‌’ आणि महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असलेला ‌‘छत्रपती पुरस्कार‌’ अशा अनेक पुरस्कारांनी ऋषिकेशला सन्मानित करण्यात आले आहे. आज एका संस्थेमार्फत पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांमधून देशाचे क्रीडा क्षेत्रातील भविष्य घडवण्याचे कार्यही ऋषिकेश करत आहे. आजवर खो-खोसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या ऋषिकेशला एकदा तरी भारताची जस परिधान करुन, खो-खोमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची इच्छा आहे. ऋषिकेशची ही इच्छा लवकरच पूर्ण होवो, याच दै. ‌’मुंबई तरुण भारत‌’च्या शुभेच्छा!

- कौस्तुभ वीरकर

Powered By Sangraha 9.0