KEM Hospital : केईएममध्ये रुग्णांच्या नोंदीसाठी दहा नवीन केंद्र; औषधांचा तुटवडा भरून काढणार

12 Nov 2025 19:54:58
 
KEM Hospital
 
मुंबई : (KEM Hospital) केईएम रुग्णालयात (KEM Hospital) नोंदीसाठी दहा नवी केंद्र उभारणार असून औषधांचा तुटवडा भरून काढणार असल्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. के.ई.एम.  (KEM Hospital) रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय, अपुऱ्या सुविधा, नागरिकांच्या सूचना आणि उपाययोजनांबाबत मुंबईचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमीत साटम यांनी पालिका मुख्यालयात संयुक्त आढावा बैठक घेतली. या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येत्या १५ दिवसात रुग्ण सेवा सुधारण्याचे आश्वासन दिले.
 
या बैठकीत अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा, उपायुक्त शरद उघडे, वैद्यकीय संचालक डॉ. नीलम अंद्राडे, केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, भाजप दक्षिण मुंबई अध्यक्षा शलाका साळवी आणि पदाधिकारी सतीश तिवारी उपस्थित होते. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केईएम रुग्णालयाचा  (KEM Hospital) पाहणी दौरा करून तिथल्या प्रशासनाला गैरसोयीबाबत धारेवर धरल्यानंतर आता तेथील व्यवस्थेत बदल करण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. येत्या १५ दिवसात रुग्णालयात रुग्णांच्या नोंदीसाठी दहा नवी केंद्र उभारली जाणार आहेत. तसेच खाजगी एमआरआय ही पालिका दरानुसार करण्यासाठी निविदा काढली जाणार असून त्यामुळे रुग्णांचा पैसा आणि वेळही वाचणार आहे.
 
हेही वाचा :  ५६व्या IFFI मोहत्सवात ‘या’ मराठी चित्रपटांची बाजी
 
पालिकेच्या दरानुसार खाजगी एमआरआय चाचणीची आकारणी
 
या बैठकीत औषधांच्या टंचाई बाबत चर्चा करण्यात आली. यावर मंत्री लोढा आणि अमीत साटम यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या चर्चेदरम्यान पुढील दोन वर्षे आवश्यक औषधांचा साठा करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच नागरिकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून के.ई.एम  (KEM Hospital) एमआरआय मशीन नादुरुस्त असल्याची तक्रार केली होती. तब्बल सहा सहा महिने एमआरआयसाठी तारीख मिळत नसल्याचेही रुग्णांनी सांगितले होते. यावर मार्ग काढण्यासाठी जोंपर्यंत केईएम मधील एमआरआय मशीन दुरुस्त होऊन व्यवस्था सुरळीत होत नाही, तोपर्यंत खाजगी केंद्रात पाठवण्यात येणाऱ्या रुग्णांकडून महापालिकेच्या दरानुसारच एमआरआय चाचणीची आकारणी करावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली. त्यानुसार पुढच्या सात दिवसात खाजगी एमआरआय केंद्रासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती साटम यांनी दिली.
 
रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी दक्षता समिती
 
रुग्णांच्या अडचणी सोडवून त्यांना सुविधा देण्याकरिता केईएममध्ये (KEM Hospital) मंत्री लोढा यांच्या नेतृत्वात दक्षता समिती स्थापन करण्यात येणार असून यात नागरिकांचाही समावेश करण्यात येणार आहे. यासोबतच लवकरच रिक्त पदे भरली जाणार असून तिथे पूर्ण वेळ अधिष्ठाता नेमण्यात येणार आहे, असे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांनी स्पष्ट केले.
 
हे वाचलंत काय ? : WARN Asia Conference : वॉर्न आशिया परिषद नुकतीच संपन्न
 
कुचकामी व्यवस्था मोडित काढणार
 
"वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांचा बारकाईने पाठपुरावा करण्यात येणार असून त्यांना आवश्यक शासकीय साहाय्य देण्यात येईल. तसेच यापुढे तक्रारी येत असलेल्या पालिकेच्या अन्य रुग्णालयातही पाहणी दौरा आयोजित केला जाईल. गेल्या २५ वर्षात महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्यांनी जी दलाली आणि कुचकामी व्यवस्था उभारली, ती व्यवस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लवकरच मोडीत काढली जाईल," असेही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0