योग आणि खेळ लहान मुलांसाठी!

    11-Nov-2025
Total Views |

हल्ली लहान मुलांना मोबाईलचे व्यसन लागू न देणे आणि लागलेच तर त्यापासून मुक्तीसाठी अनेक पालक नानाप्रकारे प्रयत्नशील असतात. कुणी त्याासठी पुस्तकांचा आधार घेते, तर कुणी मुलांमधील अन्य कोणत्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करतात. याकामी योग आणि खेळही तितकेच महत्त्वाचे. कारण, योग आणि खेळांमुळेही मुलांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यास मदत होते. तेव्हा, मुलांच्या तंदुरुस्तीसाठी नेमके कोणते योगप्रकार, खेळ फायदेशीर ठरु शकतात, यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...

लहान मुले ही गडबड करणारी, धडपडणारी, सातत्याने धावपळ करणारी. त्यांना एका जागी बसवून ठेवणे, शांत राहा सांगणे हे अगदी कौशल्याचे काम. म्हणजे बघा, आपण त्यांना जेव्हा शाळेत घालतो, तेव्हा खरे तर ते आपल्या सोयीसाठी त्यांना शाळेत दाखल करतो. म्हणजे आईवडील दोघेही नोकरी करतात म्हणून किंवा मुले घरात अगदीच एकटी पडू नयेत, त्यांच्या वयाच्या मुलांमध्ये मिसळावीत, एकमेकांशी गप्पा कराव्यात, थोडी ‌‘सोशल‌’ व्हावीत म्हणून!

त्यातच हल्लीच्या मुलांना शाळेमध्ये योगासनाचे तास असतात. तसेच त्यांना ‌‘पीटी‌’ म्हणजे ‌‘फिझिकल ट्रेनिंग‌’चे तास असतात. तसेच प्रत्येक शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी जर मैदान उपलब्ध असेल, तर त्यांच्यासाठी विविध खेळ शिकवले जातात. योगसाधनेसाठी मोठा हॉल असेल, जिथे काही विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविता येईल, असे असेल तर मुलांना योगसाधना नक्कीच करता येऊ शकते. त्यामुळे मुलांचे शरीर लवचिक बनायला मदत होते.

शालेय शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून, ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही तितकेच महत्त्वाचे असते. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य चांगले असेल, तर शिक्षण अधिक प्रभावी आणि आनंददायी होऊ शकते. सध्याच्या स्पर्धात्मक आणि तणावग्रस्त वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रतेचा अभाव, मानसिक थकवा आणि आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. इथे योग हा उत्तम उपाय ठरू शकतो.

योगशास्त्र हे भारताची प्राचीन परंपरा. त्याद्वारे मन, शरीर आणि आत्मा यांचा समतोल साधता येतो. योगशास्त्रात अष्टांगयोग सांगितला आहे. 1) यम 2) नियम 3) आसन 4) प्राणायाम 5) प्रत्याहार 6) धारणा 7) ध्यान 8) समाधि यामध्ये पहिले चार योग आपण विद्यार्थ्यांना नक्कीच सांगू शकतो.

यम

सामाजिक प्रतिबंध आणि योगाचे नैतिक नियम. योगसूत्र पाच वेगवेगळ्या यमांचे वर्णन करते. 1) अहिंसा 2) अस्तेय (चोरी न करणे) 3) सत्य 4) अपरिग्रह (साठवणूक करणे) 5) ब्रह्मचर्य

नियम

योगसूत्रात पाच वेगवेगळ्या नियमांचे वर्णन केलेले आहे. 1) शौच (स्वच्छता) 2) संतोष-समाधान 3) तप (स्व-शिस्त) 4) स्वाध्याय-स्व-चिंतन 5) ईश्वरप्रणिधान-उच्च शक्तीला शरण जाणे. म्हणजे समाजात वागताना कसे वागावे? स्वतःच्या जीवनात कसे वागावे, हे मुलांना शिकवणे फार गरजेचे आहे. योग म्हणजे केवळ आसने-प्राणायाम नाही, तर या गोष्टी मुलांना शिकवणे गरजेचे आहे. आता शाळेच्या मुलांना आपण कोणती योगासने शिकवू शकतो, ते बघूया.

साधारणपणे वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापर्यंत मुलांची हाडे कोमल असतात, ठिसूळ असतात. म्हणजे अगदी बघा, समजा, लहान मुलांना फ्रॅक्चर झाले, तर ते चटकन भरून येते. त्याला ‌‘ग्रीन स्टिक फ्रॅक्चर‌’ म्हणतात. म्हणजे झाडाची कोवळी डहाळी/फांदी जर तुटली, तर ती एकत्र बांधली असता, लवकर जळून जाते. कारण, ती कोमल असते. तशीच लहान मुले कोमल, नाजूक असतात. त्यामुळे ती स्वतःच्या मनाने धावली, पळाली उड्या मारल्या, तरी ते त्याच्या वाढीसाठी पुरेसे असते. पण, सहाव्या वर्षानंतर मुले जेव्हा पहिलीत-दुसरीत असतात, तेव्हा त्यांना थोडी शिस्त लागणे अपेक्षित असते. पण, मुलांना आपण खूप वेळ एकत्र शांत बसवून ठेवू शकत नाही.

या वयात त्यांना गोष्टी सांगितलेल्या खूप आवडतात. त्यांना असे सांगितले की, चला आज आपण बागेत फिरायला जाऊया. जाताना वाटेत मोठमोठे उंच वृक्ष, झाडे दिसतात. मग ते ताडाचे झाड कसे उंच सरळसोट आहे, त्याप्रमाणे आपण आता करून बघूया, असे सांगून त्यांना उभे राहून हात वर उचलण्यास सांगावे. त्याचवेळी पाय पण उचलण्यास सांगावे. हे झाले ‌‘ताडासन.‌’

असेच एखाद्या झाडास फांद्या फुटलेल्या असतात. मग त्यांना ‌‘वृक्षासन‌’ शिकवावे. म्हणजे सरळ उभे राहावे. एक पाय दुसऱ्या पायाच्या मांडीवर घ्या. दोन्ही हात डोक्याच्या वर घ्या. हातांचा नमस्कार करा. हे झाले ‌‘वृक्षासन.‌’ असे सांगितले की, मुलांनापण खूप मजा वाटते व ते अगदी येता-जाता आवडीने ही योगासने करू लागतात.

तसेच आपण पर्वतासनाबद्दल सांगू शकतो की मांडी घालून बसा. मग हळूहळू एक पाय दुसऱ्या पायावर घ्या. पद्मासनात या. म्हणजे तुमची मांडी पसरट होईल. हा झाला तुमच्या आसनाचा बेस. मग दोन्ही हात डोक्याच्या वर घ्या. दोन्ही हात जोडा. अगदी नमस्कारासारखे. मग बघा, तुमच्या शरीराची आकृती होईल अगदी पर्वतासारखी. म्हणून याला म्हणायचे ‌‘पर्वतासन.‌’ अशा रितीने त्यांना समजावून सांगितले की, मुले ती आसने विसरत नाहीत. आवडीने करतात त्या असनाचे फायदे सहजरित्या मिळतात.

1. थोड्या वरच्या वर्गातील मुलांना

‌‘ताडासन‌’, ‌‘वृक्षासन‌’, ‌‘हस्तपादासन‌’, ‌‘पश्चिमोत्तानासन‌’ अशी आसने आपण सांगू शकतो. पूवच्या काळी मुलांना शिक्षा म्हणून पायांचे अंगठे पकडावयास सांगत असत. तेव्हा आपोआपच ‌‘हस्तपादासन‌’ होत असे. यामध्ये डोके खाली वाकले जाते व मेंदूकडे रक्तपुरवठा वाढवला जातो. त्यानंतर साधारणपणे नवव्या-दहाव्या वष सूर्यनमस्कार शिकवावेत. मुलांना शाळेत ते घालणे शक्य नसेल, तर त्यांनी ते घरी जरुर घालावेत. सकाळी अगदी पाच मिनिटांत 11-12 सूर्यनमस्कार घालून होतात व त्यासारख्या सर्वांगसुंदर व्यायाम नाही. यामध्ये आठ आसनांचा समावेश होतो.

आठवी, नववीच्या मुलांना थोडे ध्यान, योगनिद्रा या गोष्टी शिकवल्या, तर त्यांची एकाग्रती वाढवण्यासाठी फायदा होतो.

योगशिक्षणासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP, 2020)चे योगदान-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP, 2020) भारताच्या शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण परिवर्तन आहे. यात पारंपरिक आणि आधुनिक शिक्षण यांचा समतोल राखत योगशिक्षणालाही विशेष महत्त्व दिलेले आहे. यात

1) शालेय शिक्षणात योगाचा समावेश - प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये योगशिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. योग हे फक्त व्यायाम न राहता मानसिक आणि बौद्धिक विकासाचे साधन आहे.

2) योग हे शिक्षणाच्या प्रगतीसाठी एक मैलाचा दगड ठरले आहे. उच्च शिक्षणापर्यंत योगाचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

आता आपण मुलासाठी कोणते खेळ आहेत. शाळेमध्ये आठवड्याला दोन तास हे मुलांना पीटीचे म्हणून असतात. ज्या मुलांच्या शाळेला मैदान आहे, ती मुले खरंच भाग्यवान म्हणायला हवीत. हल्ली शहरातसुद्धा मैदाने कमी होऊ लागली आहेत. त्यामुळे मुलांना मैदानी खेळ हा विचारसुद्धा कमी झाला आहे. सकाळची शाळा असेल तर लवकर उठून अर्धा-एक तास स्कूल बससाठी थांबणे, नंतर शाळा, दुपारी घरी येण्यास उशीर, मग परत कसले कसले क्लास किंवा ट्यूशन की संपला दिवस. पण, संध्याकाळी मोकळेपणाने खेळ खेळले, तर मुलांचे शरीर लवचिक बनते. त्यांच्या अंगात जी अतिरिक्त ऊर्जा असते, तिचा कुठेतरी निचरा होतो. रात्री मुले शांतपणे झोपतात.

आमच्या लहानपणी उन्हे कमी झाली की आम्ही अंगणामध्ये लंगडी, पकडापकडी, डब्बा ऐसपेस, विष की अमृत, खांब-खांब खांबोळी असे खेळ खेळत असू. त्यामुळे खरे बघितले, तर प्रत्येक खेळामध्ये जिंकण्यासाठी काही क्लृप्त्या योजाव्या लागतात. प्लॅन ठरवावे लागतात. म्हणजे तिथे तुमच्या शारीरिक व मानसिकतेचा छान कस लागत असे. गावातली मुले वडाच्या झाडावर सूर-पारंब्या खेळत असत, तर नदी-झऱ्यांमध्ये मनसोक्त डुंबत असत. तेव्हा टीव्ही, मोबाईल इंटरनेट यांना फार दुय्यम स्थान असे.

आतापण इनडोअर आणि आऊटडोअर असे खेळ शाळांमध्ये घेतले जातात. आंतरशालेय स्पर्धांसाठी मुले पाठवली जातात. पण, इथे परत काही निवडक मुलांनाच संधी मिळते. मग त्यांना विशेष कोचिंग क्लासमध्ये शिकण्यास मिळते. इनडोअरमध्ये कॅरम, टेबलटेनिस इ. खेळ येतात, तर आऊटडोअरमध्ये कब्बडी, खो-खो, व्हॉलीबॉल असे अनेक खेळ येतात. क्रिकेट तर विश्वखेळ आहे. तो खेळ मात्र बहुतेक मुले आपल्याआपल्या सोसायटीमध्येसुद्धा आवडीने खेळतात. खेळ हे मुलांच्यातील सांघिकता वाढवण्यास मदत करतात. टीम वर्क कसे करावे, एखाद्याने केलेली चूकसुद्धा सगळ्यांना कशी त्रासदायक ठरू शकते, हेसुद्धा शिकावयास मिळते.

शाळेमध्ये मात्र पीटीच्या तासाला मुलांना वेगवेगळ्या कवायती करावयाला शिकवतात. त्यामुळे हातापायाचे सूक्ष्म व्यायामच आपोआप होतात. मुलांच्या ‌‘स्पोर्ट्‌‍स डे‌’ला या वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करतात. काही काही शाळांमधून अगदी राष्ट्रीय पातळीपर्यंतसुद्धा त्यांची मुले पुढे जातात. त्यासाठी त्या मुलांनी घेतलेले कष्ट शाळेने, त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्यावर घेतलेली मेहनत फळाला येते व त्यासाठी शाळांसाठी तो अभिमानाचा क्षण ठरतो. त्यामुळे शैक्षणिक धोरणांमध्ये खेळ व शिक्षण, त्याचा मुलांचा मानसिकतेवर शारीरिकतेवर होणारा परिणाम हे महत्त्वाचे मुद्दे ठरतात.

- डॉ. अरूणा टिळक
(लेखिका B.A.M.S.M.A. (योगशास्त्र) आहेत.)
(आरोग्य भारती, कोकण प्रांताद्वारे प्रकाशित)