मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी सुरक्षेत वाढ; नेमकं कारण काय?

10 Nov 2025 12:13:57

Raj Thackeray
 
 
मुंबई : (Raj Thackeray) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अचानकपणे त्यांच्या सुरक्षेत वाढ का करण्यात आली त्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
 
दरम्यान, रविवारी ९ नोव्हेंबरला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानाबाहेर ड्रोन घिरट्या घालत असल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणावरुन ठाकरे गटाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. संवेदनशील ठिकाणी ड्रोन उडवणे हे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असून यामागे टेहाळणीचा किंवा घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या घटनेनंतर एमएमआरडीएने (MMRDA) पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी परवानगी घेऊन हा ड्रोन उडवल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिले होते.
 
याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरेंच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आल्याचे बोलले जात आहे. सध्या या परिसरात पोलिसांची वाहनेदेखील तैनात करण्यात आले आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः शिवतीर्थ परिसराच्या सुरक्षेचा आढावा घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. वाढवण्यात आलेली सुरक्षा हा केवळ खबरदारीचा उपाय आहे की त्यामागे आणखी काही कारण आहे, याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0