प्रथमदर्शनी दत्तात्रय ठेंगडी हे नाव गद्य वाटू शकते, परंतु आज जगभरात हिंदू जीवन तत्त्वज्ञानासंदर्भात जिथे जिथे चिंतन अभ्यास होत असेल, तिथे दत्तात्रय ठेंगडी यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. आज दि. 10 नोव्हेंबर श्रद्धेय दत्तोपंतांचा जन्मदिवस. यानिमित्ताने दत्तोपंतांचे स्मरण करणे म्हणजेच, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जे राष्ट्रकार्य त्यांनी व्रत म्हणून स्वीकारले होते, त्या राष्ट्रकार्यातून निर्माण झालेल्या सकारात्मक भाव जागरणात स्वतःला सामावून घेण्याचा प्रयत्न आहे.
आज रा.स्व. संघ शताब्दी वर्ष संपन्न करीत आहे. संघाच्या नैसर्गिक विकासक्रमात ज्या विविध संघटना निर्माण झाल्या, त्यात दत्तोपंतांचा वाटा महत्त्वपूर्ण असाच. ‘अखिल भारतीय विद्याथ परिषद’ (1949), ‘भारतीय मजदूर संघ’ (1955), ‘भारतीय किसान संघ’ (1979), ‘स्वदेशी जागरण मंच’ (1991), ‘सामाजिक समरसता मंच’ (1983) या संस्थांची नावे आणि या संस्थांचा निर्माण काळ या दोन्ही गोष्टींकडे जर बारकाईने पाहिले, तर असे लक्षात येते की येणाऱ्या काळाचा वेध कसा घेतला पाहिजे, त्या अनुषंगाने संस्थांची निर्मिती कशी केली पाहिजे, त्या संस्थेची परिभाषा कशी असली पाहिजे, ज्या समूहासाठी या संस्था काम करणार आहेत, त्या समूहांना या संस्था आपल्या वाटाव्यात यासाठी वातावरण कसे असले पाहिजे व निहित उद्देश ठेवून या संस्था निर्माण केल्या आहेत, त्या संस्था स्वबळावरती आणि स्वचिंतनावर नंतरच्या काळात कशा चालू राहतील, तसेच याव्यतिरिक्त त्या संस्थांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे वैचारिक भरण-पोषण भारतीय चिंतनदर्शनाच्या परिप्रेक्षात कसे राहील, याची काळजी दत्तोपंतांनी नेहमीच घेतली. आज या संस्थांची झालेली नेत्रदिपक वाटचाल आपण अनुभवत असताना, ज्येष्ठ पत्रकार व संघाचे प्रथम प्रवक्ते असलेल्या मा. गो. वैद्य यांच्या शब्दांत सांगायचे तर, दत्तोपंतांचा सर्वस्पश प्रतिभेचा स्पर्श होताच, ते एक नवे प्रखर तेजस्वी आणि नवे रूपलावण्य घेऊन पुढे येतात. लोखंडाला सुवर्णात रूपांतरित करणारी दत्तोपंतांची प्रतिभा जितकी अभिजात आहे, तितकीच दत्तोपंतांच्या प्रचंड अध्ययन आणि प्रगाढ चिंतन यांनी ती विभूषितही केलेली आहे. ज्या ज्या नशीबवान मंडळींना दत्तोपंतांचा सहवास लाभला, त्या सर्वांच्या मनातील प्रातिनिधिक भावच बाबुराव वैद्य यांनी व्यक्त केला आहे, असे मला वाटते.
संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय गुरुजी यांची ज्ञानसाधना विलक्षण होती, माननीय दत्तोपंतांना पूजनीय गुरुजींचा निकट सहवास मिळाला. स्वाभाविकच एका तेजाच्या सान्निध्यात राहिल्याने तोच ज्ञानसाधनेचा गुण दत्तोपंतांमध्ये आला, तर नवल नव्हे. बहुतांश वेळी जी मंडळी ज्ञानसाधक असतात, चिंतक असतात अशी मंडळी चिंतनासाठी ‘स्पेस’ मिळावी, म्हणून सार्वजनिक जीवनातून अलिप्त राहातात. त्यात काही वावगे आहे असे नाही. पण, दत्तोपंत तर संघप्रचारक होते. स्वाभाविकच, त्यांचा सार्वजनिक वावर सर्वत्र असायचा. त्यांच्याभोवती नेहमीच कार्यकर्ते, स्वयंसेवकांचा गराडा असे. संघटनेच्या कामासाठी सतत करावा लागणारा प्रवास, अशा धबडग्यात ज्ञानसाधनेचे व्रत सांभाळणे किती जिकिरीचे असू शकेल! परंतु दत्तोपंतांनी ते सहज पेलले. त्यांच्यातील चिंतकाला त्यांनी लोकसन्मुख केले. संघकार्य हे कौटुंबिक भावनेवरती आधारित आहे. त्यात नुसता वैचारिक कोरडेपणा राहणार नाही, याची त्यांनी सतत काळजी घेतली.
कार्यकर्ता हा कोणत्याही संघटनेचा कणा असतो. परंतु, हा कार्यकर्ता सर्वसामान्य समाजातूनच आलेला असतो. समाजातील गुणदोषांसह तो संघटनेत दाखल होतो. संघटनेच्या उद्देशासाठी आवश्यक गुणांची निर्मिती त्याच्या ठायी करणे आवश्यक असते. कार्यकर्त्यांकडे कशा नजरेने पाहावे, यासाठी दत्तोपंत नेहमी काचेच्या कंदिलाचे एक उदाहरण देत. कंदिलाच्या काचेमुळे सुरक्षितपणे आतली ज्योत तेवत राहते व आपल्याला प्रकाश मिळतो. परंतु, त्याच कंदिलाच्या काचेवरती धूळ जमा झाली, तर आतमध्ये ज्योत जरी जळत असली, तरी प्रकाश चांगल्या प्रकारे बाहेर पडू शकणार नाही. कार्यकर्ता हादेखील कंदिलाच्या काचेप्रमाणे निष्कलंक आणि पारदश असला पाहिजे. यातील निष्कलंक हा शब्द त्या कार्यकर्त्याच्या व्यक्तिगत चारित्र्याशी संबंधित आहे, तर पारदश हा शब्द त्या कार्यकर्त्याच्या पारस्परिक व्यवहाराशी संबंधित आहे. दत्तोपंतांचे हे विचार प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. कार्यकर्त्याला प्रशिक्षणाची नितांत गरज असते आणि दत्तोपंत म्हणजे 24X7 असे एक प्रशिक्षण केंद्रच होते. आज संघपरिवारात असलेले शेकडो कार्यकर्ते दत्तोपंतांच्या सहवासात, याच सेंद्रीय पद्धतीने विकसित झालेले आहेत.
कोणतीही संघटना केवळ ‘राष्ट्रीय’ म्हटल्याने राष्ट्रीय होत नाही. बहुतांश संघटना ‘राष्ट्रीय’ हा शब्द तर केवळ भौगोलिक या मर्यादित अर्थानेच वापरताना दिसतात. रा.स्व.संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांना ‘राष्ट्रीय’ शब्दाचे नेमके उपयोजन कळले होते. त्यांच्या सहवासात आलेल्या तरुण कार्यकर्त्यांच्या मनात, ‘राष्ट्रीय’ शब्दाचे नेमके ओज त्यांनी कौशल्यपूर्वक, आत्मविश्वासाने ओतले.
दत्तोपंतांनी संघाच्या परिघाबाहेरील अनेक संघटनांमध्ये सहभाग घेतला होता. काँग्रेसप्रणित ‘इंटक’ या कामगार संघटनेतही ते होते. डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या ‘शेतकरी कामगार फेडरेशन’मध्येही त्यांनी काम केले. महाविद्यालयीन जीवनात तर त्यांनी, त्या काळातील साम्यवादी समाजवादी संघटनांमध्येही प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेतला. या सर्व संघटनांमध्ये प्रत्यक्ष काम केल्यानंतर त्यांना असे वाटले की, कोणत्याही क्षेत्रात काम करायचे असेल, तर राष्ट्रीय व सांस्कृतिक तत्त्वावरती संघटना उभी केली पाहिजे. अशाच चिंतनामधूनच पुढे ‘भारतीय मजदूर संघा’ची स्थापना झाली. हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. कामगार संघटना म्हणजे फक्त हक्क मागणारी संघटना नाही, तर राष्ट्रीय कर्तव्याचा संस्कार त्या संघटनेत मिळायला हवा. त्यावेळच्या प्रस्थापित कामगार संघटनांच्या वैचारिक जगताला हलवून टाकणारा हा विचार होता. कोणत्याही संघटनेचा केंद्रबिंदू हा राष्ट्रीय असला पाहिजे, तसा तो असेल तरच त्या संघटनेचा परीघ कितीही वाढला, तरी ती संघटना तिच्या ध्येयापासून ढळणार नाही, अशा प्रकारचे दत्तोपंतांचे हे मौलिक चिंतन आजही मार्गदर्शक आहे.
अगदी अलीकडेच छत्रपती संभाजी नगर शहरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नोंदणीकृत का नाही, या मागणीसाठी संघकार्यालयावरती मोर्चा आणला होता. राजकीय उद्देशाने जरी हा मोर्चा आणला गेला असला, तरी त्यानिमित्ताने रा. स्व. संघ म्हणजे नेमके काय आहे? याची चर्चा विविध माध्यमांमध्ये घडून आली. संघासंबंधीची अशी चर्चा संघाला नवीन नाहीच. फार पूव अशाच एका चर्चासंवादात दत्तोपंतांनी डॉ. हेडगेवार यांचा संदर्भ देत, संघ ही संस्था नाही, संप्रदाय नाही, पंथ नाही, पाट नाही, पाटचा अर्थ आहे part of the society. संघ म्हणजे तर संपूर्ण समाज आहे ‘conceptually sangh and society are coterminus.’ म्हणजेच संकल्पनेच्या दृष्टीने संघ आणि समाज समव्याप्त आहे. या भावनेचा साक्षात्कार ज्यांना झाला, ते प्रत्यक्ष स्वयंसेवक आहेत, ज्यांना हा साक्षात्कार नाही झाला, ते संभाव्य स्वयंसेवक आहेत. संघ नेमका काय आहे हे समजून घेताना, दत्तोपंतांचे हे भाष्य आजही महत्त्वाचे ठरते.
संघटनेत काम करताना समाजजीवनात फिरणारा कार्यकर्ता कसा असला पाहिजे, हे समजावतानाही दत्तोपंतांमधील चिंतकापेक्षाही मातृहृदयी सहकारी कार्यकर्ता अधिक सजग होत असे. त्यांच्या समजावण्यातून हीच भावना ओथंबून वाही. संपर्काची व्यापकता वाढवताना मूळ कार्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, यासाठी ते अतिशय मार्मिक गोष्ट सांगत. आईच्या मांडीवरती बसलेला छोटा मुलगा अंगणात पडलेला लाल चेंडू दिसताच, तो आईला ‘मी हा चेंडू आणायला जातो’ असे सांगत चेंडू जवळ जातो आणि त्या चेंडूशी खेळायलाही लागतो. खेळण्याच्या भरात ज्या आईच्या मांडीवरती आपण बसलो होतो, त्या आईला तो विसरून जातो. कार्यकर्त्याचेदेखील असे होऊ शकते व तो मूळ उद्देशापासून भरकटू शकतो. दत्तोपंत अशाच सहज संवादातून असंख्य कार्यकर्त्यांचे वैचारिक बळकटीकरण करत.
आज आपला भारत देश विश्वपातळीवरती अनेक मार्गांनी अग्रेसर होताना दिसत आहे. ‘मेक इन इंडिया’ किंवा ‘वोकल फोर लोकल’चे नारे तर, आता सरकार पातळीवरूनसुद्धा दिले जाऊ लागले आहेत. 1991 मध्ये जेव्हा अर्थव्यवस्थेची दारे खुली करण्यात आली, जगभर उदारीकरणाचे वारे वाहू लागले, तेव्हा 100 कोटी जनसंख्या असलेला, त्या काळात 50 कोटी जनता दारिद्यरेषेखाली असलेल्या भारतापुढे कोणते संकट उभे राहू शकते, याचा विचार करणाऱ्या विचारवंतांमध्ये दत्तोपंतांचे नाव अग्रेसर होते. भारतात येऊ इच्छिणाऱ्या विदेशी कंपन्यांची मानसिकता भारतामध्ये लूट करणाऱ्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या मानसिकतेच्या पेक्षा वेगळी नाही, हे दत्तोपंतांमधील चाणाक्ष अर्थतज्ज्ञाने अगोदरच ओळखले. या आव्हानाला सकारात्मक उत्तर द्यायचं असेल, तर स्वदेशीच्या माध्यमातून द्यावे लागेल व म्हणूनच दत्तोपंतांच्या पुढाकाराने ‘स्वदेशी जागरण मंचा’ची स्थापना 1991 मध्ये केली गेली. ‘स्वदेशी जागरण मंचा’च्या माध्यमातून, संपूर्ण देशभरात स्वदेशी भाव अत्यंत संघटितपणे निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. उदारीकरणाची वकिली करणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांनी, उद्योगपतींनी दत्तोपंतांच्या स्वदेशी धोरणावरती नकारात्मक विचार म्हणून शिक्का मारला. परंतु, याच काळात स्वदेशी तंत्रज्ञान विकसित व्हावे, म्हणून त्यावेळी ज्या ज्या राष्ट्रवादी नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्यांमध्ये दत्तोपंत सर्वांत पुढे होते. आज स्वदेशी तंत्रज्ञानावरती आधारित देश स्वयंपूर्ण होताना दिसत आहे, त्याची बीजे 1991च्या ‘स्वदेशी जागरण मंचा’ने केलेल्या जनजागृतीमध्ये आहे, हे ऐतिहासिक सत्य आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवासही दत्तोपंतांना काही काळ लाभला. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाने मी भारून गेलो आहे,’ असेही खुद्द दत्तोपंतांनी एके ठिकाणी म्हटले आहे. एका बाजूला हिंदू तत्त्वज्ञान ‘वसुधैव कुटुम्बकम्’ असा वैश्विक मानवतेचा संदेश देत आहे, त्याचवेळी जात वास्तवाचा आधार घेऊन काही लोक हिंदू समाजातील वंचित घटकांचे शोषण करीत आहेत. या वास्तवतेला धाडसाने सामोरे जाण्यासाठीचे वैचारिक धाडस, दत्तोपंतांनी हिंदू संघटनेचे संघटन करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना दिले. सामाजिक समरसता ही समतेच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे, असे स्पष्ट प्रतिपादनच त्यांनी केले. ‘समरसता’ शब्द प्रस्थापित करण्यासाठी, वेगवेगळ्या उपक्रमांच्या मागे दत्तोपंत पूर्ण ताकदीनिशी कार्यकर्त्यांच्या सोबत उभे राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दीनिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला सामाजिक दृष्टीने ढवळून काढणारी जी फुले-आंबेडकर विचारयात्रा निघाली, त्याच्या प्रत्येक नियोजनामध्ये दत्तोपंतांनी आपली प्रतिभा पणाला लावली होती. ही फुले-आंबेडकर विचारयात्रा महात्मा फुले यांच्या वाड्यापासून निघाली आणि नागपूरमधील दीक्षाभूमीवरती समाप्त झाली. 47 दिवसांची ही विचारयात्रा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून गेली. जवळजवळ सात हजार किमीचा प्रवास या यात्रेने केला. 120 पेक्षा जास्त जाहीर सभा या यात्रेमध्ये घेण्यात आल्या आणि पाच हजारांपेक्षा अधिक सामाजिक क्षेत्रांतील कार्यकर्त्यांशी, या यात्रेमुळे संवाद साधता आला. यामधील बहुतांश मंडळी ‘सामाजिक समरसता मंचा’शी जोडली गेली. या विचारयात्रेने महाराष्ट्रात ‘समरसता’ विषयाला एक वैचारिक मान्यता मिळाली. वंचित समाजासाठी काम करणाऱ्या संघ कार्यकर्त्यांना एक ओळख मिळाली. ही विचारयात्रा म्हणजे हिंदूविरोधी शक्तींना, विशेषतः साम्यवादी प्रभावाखालील असलेल्या तथाकथित पुरोगाम्यांना एक मोठा झटकाच होता. या यात्रेचे क्रियांवयन महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी अत्यंत अचूकपणे केले. त्यामागे दत्तोपंतांचे ‘मायक्रो लेव्हल’वरचे मार्गदर्शन होते.
एका अर्थाने दत्तोपंतांना त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने स्मरण करणे, म्हणजेच आपल्यातील संवेदनशीलतेला व कार्यकर्तेपणाला जिवंत आणि योग्य मार्गावर ठेवणे, असे मी तरी समजतो.
- सुनील ढेंगळे
(लेखक महाराष्ट्रात ‘समरसता साहित्य परिषदे’च्या कोषाध्यक्षपदावर कार्यरत आहेत.)