‌‘ब्लू फ्लॅग‌’ सागरी पर्यटन

    10-Nov-2025
Total Views |

नुकत्याच महाराष्ट्रातील पाच किनाऱ्यांना ‌‘ब्लू फ्लॅग‌’ मानांकन मिळाले आहे. हे मानांकन मिळविण्यासाठी नेमके निकष काय, ते मिळाल्यानंतर काय करावे लागते आणि ते टिकवण्यासाठी काय करणे अपेक्षित असते, याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...

सर्व क्षेत्रांत प्रगती व्हायलाच हवी आणि विशेषतः त्या क्षेत्रात, जिथे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते. उद्योग, व्यवसाय आणि व्यापार यांसोबतच पर्यटन हेही एक अत्यंत महत्त्वाचे आणि गतिमान क्षेत्र आहे. भारताला सुमारे 11 हजार किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. या किनाऱ्यांवरील सागरी पर्यटनाला प्रचंड मागणी आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात, दोन दिवसांची सुटी मिळाली, तरी समुद्रकिनारी पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी असून दिवसागणिक ती वाढतच जाणार आहे.

महाराष्ट्र राज्यालाही सुमारे 750 किमी लांबीची सागरकिनारपट्टी लाभली आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांची पश्चिम सीमा अरबी समुद्राला लागलेली आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये सागरी पर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय बनला आहे. अलीकडेच या किनारपट्टीवरील पाच समुद्रकिनाऱ्यांना ‌‘ब्लू फ्लॅग‌’ मानांकन प्राप्त झाले आहे. डहाणूजवळील पर्णका, रायगडमधील नागांव, श्रीवर्धन आणि रत्नागिरीतील लाडघर व गुहागर. ही निश्चितच आनंदाची बातमी आहे. परंतु, या मानांकनामागील अर्थ आणि निकष जाणून घेणे, तेवढेच गरजेचे आहे. ‌‘ब्लू फ्लॅग‌’ मानांकन हे ‌’फाऊंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन‌’ (FEE) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून दिले जाणारे पर्यावरणपूरक जागतिक प्रमाणपत्र आहे. हे मानांकन त्या समुद्रकिनाऱ्यांना, नौकाविहार बंदरांना आणि शाश्वत नौकाविहार संस्थांना दिले जाते, ज्यांनी पर्यावरण व्यवस्थापन, पाण्याची गुणवत्ता, पर्यावरणीय शिक्षण, सुरक्षितता आणि सेवांशी संबंधित 33 कठोर निकष पूर्ण केलेले असतात. आंतरराष्ट्रीय परीक्षक हे या निकषांचे पालन झाल्यानंतरच मानांकन प्रदान करते. हे प्रमाणपत्र दरवष नूतनीकरण करावे लागते. त्यामुळे निकषांचे सातत्याने पालन करणे अत्यावश्यक असते. हे मानांकन टिकवण्यासाठी नियमित पाण्याच्या चाचण्या, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन, पर्यावरणीय जनजागृती, सुरक्षितता सुविधा, प्रथमोपचार केंद्रे आणि प्रमाणित जीवरक्षक सेवांची उपलब्धता आवश्यक आहे.

याचा अर्थ, या प्रक्रियेत सुसूत्र नियोजन, जबाबदार अंमलबजावणी आणि स्थानिक लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. पर्यटकांनी जबाबदार नागरिक म्हणून वर्तन करणे, भरती-ओहोटीच्या काळात काळजी घेणे आणि किनाऱ्यावरील सजीव सृष्टीचे संवर्धन करणे, हे त्यांच्या भूमिकेचे घटक आहेत. या उद्देशासाठी समुद्रकिनाऱ्यांवर माहिती देणारी केंद्रे, कचरापेट्या (दर 50 मीटरवर), नियमित स्वच्छता, प्रथमोपचार केंद्रे, पुरेशा प्रमाणात लाईफ जॅकेट्स, त्याचबरोबर नियम आणि अटींचे काटेकोर पालन होणे महत्त्वाचे राहील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, समुद्राशी आत्मीयता असलेले स्थानिक लोक यांच्या सक्रिय सहभागाची गरज आहे, तर हे ‌‘ब्लू फ्लॅग‌’ नामांकन टिकवणे शक्य नाही का? नक्की शक्य आहे! दृढ इच्छाशक्ती, जबाबदारपणा आणि हे आपलेच आहे, या सगळ्याची निर्मिती आपल्यासाठीच आहे, या भावनेतून केलेले प्रयत्न निश्चितच शाश्वत यश देतील.

‌‘आसमंत‌’ ही संस्था गेली काही वर्षे सागर आणि परिसंसंस्थेचे संवर्धन करण्यासाठी सागर महोत्सवाच्या माध्यमातून महत्त्वाचे कार्य करत आहे. सागर महोत्सवाच्या माध्यमातून सागर आणि परिसंस्थेबाबत तांत्रिक माहिती देऊन त्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच ही व्यवस्था मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, याची जाणीव करून देत आहे. या क्षेत्रातील विद्वान, संशोधक यांची व्याख्याने, पुळणी आणि खडकाळ समुद्र अभ्यास फेऱ्या, खारफुटी जंगलांच्या अभ्यास फेऱ्या, असा समृद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून या शक्तीचा जागर करत आहे. ‌’एक महासागर एक भविष्य‌’ या दृष्टिकोनातून याचा विचार केला असता, सागर हा जगाचा सामायिक श्वास आहे. प्रत्येक किनारा, प्रत्येक लाट आणि प्रत्येक प्रवाळ खडक सर्व एकाच सजीव साखळीचे भाग आहेत. आपल्या सर्वांच्या कृतींचा परिणाम या एका सागरावर आणि त्यातून आपल्या भविष्यावर होतो, हे समजून घेणे आवश्यक आहे. दरवष जानेवारी महिन्यात रत्नागिरीमध्ये पार पडणाऱ्या ‌’सागर महोत्सवा‌’ला उपस्थित राहिल्यानंतर तोच समुद्र आपल्याला वेगळा दिसतो.

- नंदकुमार पटवर्धन
(लेखक ‌‘आसमंत बेनवोलेन्स फाऊंडेशन‌’चे संचालक आहेत.)
9970056523