मुंबई : (Faridabad) हरियाणामधील फरीदाबादमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका डॉक्टरच्या घरावर छापा टाकून तब्बल ३०० किलो आरडीएक्स आणि शस्त्रसाठा जप्त केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. या मोठ्या कारवाईमुळे देशात घातपाताचा कट रचला जात असल्याचा संशय बळावला आहे. या प्रकरणी जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग येथे राहणाऱ्या डॉ. आदिल अहमदला पोलिसांनी ८ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून अटक केली.
वृत्तानुसार, डॉ. आदिल अहमदने तीन महिन्यांपूर्वी फरीदाबादमधील धौज गावात एक खोली भाड्याने घेतली होती. आरोपी डॉक्टर तिथे राहत नव्हता. त्याने फक्त त्याचे सामान ठेवण्यासाठी खोली भाड्याने घेतली होती. पोलिसांनी खोलीतून १४ बॅगा जप्त केल्या, ज्यामध्ये ३०० किलो आरडीएक्स (स्फोटके), एक एके- 47 रायफल, बॉम्ब बनवण्यासाठी वापरले जाणारे ५ लिटर रसायन, ८४ काडतुसे आणि दोन स्वयंचलित पिस्तूल होते. फरीदाबाद पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथून ४८ प्रकारच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये बॉम्ब बनवण्याशी संबंधित वस्तूंचाही समावेश आहे. छापा टाकताना १० ते १२ वाहने घटनास्थळी पोहोचली. जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि गुजरात या चार राज्यांशी असलेल्या संबंधांची चौकशी केली जात आहे.
आदिल पूर्वी अनंतनाग येथील जनरल हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत होता. २०२४ मध्ये त्याने तिथून राजीनामा दिला. त्यानंतर त्याने सहारनपूरमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. सरकारी मेडिकल कॉलेजमध्येही आदिल शिकवत होता. ८ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी अटक केल्यानंतर आदिलची चौकशी सुरू आहे आणि त्याने फरीदाबादमध्ये स्फोटके साठवल्याचे कबूल केले आहे. आदिलने दिलेल्या माहितीवरून, पुलवामा (काश्मीर) येथून मुजाहिल शकील या दुसऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली.