वाढती बिबटसंख्या : धोक्याची घंटा

    10-Nov-2025
Total Views |

पुणे जिल्ह्यात उफाळलेल्या मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्यात काही कठोर निर्णय घेतले. मात्र, ऊसप्रवण क्षेत्रातील बिबट्यांची वाढती संख्या हा खरोखरच चिंतेचा विषय असून येत्या काळात नाशिक-सातारा हे जिल्हेदेखील त्या प्रभावाखाली येणार आहेत. त्याविषयीचा ऊहापोह करणारा हा लेख...

जवळपास गेली दोन दशके बिबट्यांचे यशस्वी प्रजनन ऊसाच्या रानात होत आहे. बिबट्यांच्या जवळपास तीन ते चार पिढ्या या ऊसात जन्माला आल्या आहेत. मादी बिबट्याने तिच्या पोटी जन्मास येणाऱ्या पिल्लांना हे ऊसाचे रान म्हणजेच आपले घर म्हणून बिंबवले आहे. हा एक प्रकारचा जनुकीय बदलच आहे. अशा बिबट्यांना जेरबंद करून वनविभागाने त्यांना जंगलात पुन्हा सोडले, तरी त्या बिबट्यांना जंगल हे आपले घर माहीत नाही. ऊसाचेच रान म्हणजेच आपले सुरक्षित घर मानून ते पुन्हा या ऊसातच येतात. आज पुण्या-नाशिकसह साताऱ्यातील कृष्णा, सह्याद्री, अजिंक्यतारा, मरळी, शेडगेवाडी, पाली इथल्या साखर कारखान्यांमुळे ऊसाची झालेली प्रचंड लागवड ही बिबट्याच्या वाढत्या संख्येला कारक ठरली आहे. ऊसानेदेखील बिबट्याच्या सर्व गरजा भागवल्या आहेत.

महाराष्ट्रात जुन्नरखालोखाल सर्वांत जास्त बिबट्यांची संख्या सातारा जिल्ह्यात कराड व पाटण तालुक्यात आहे. जवळजवळ 39 नवीन गावे आहेत, जिथे बिबट्या व काही ठिकाणी मादी बिबट्या ही पिल्लासह आपले अस्तित्व वारंवार दाखवत आहे. बिबट्यांची संख्या जंगलाबाहेर कराड पाटण तालुक्यात जास्त आहे. ही खरोखर चिंतेची बाब आहे. शासन दरबारी वन्यजीव विभागाकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चार वेळा नित्यनियमाने वन्यजीव गणना राबवली जाते. त्याचबरोबर व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपमध्येही यांची संख्या कळते. पण याउलट स्थिती ही प्रादेशिक विभागाच्या ताब्यातील जंगलात व मनुष्य वस्तीत आहे. तिथे असा नियोजनबद्ध वार्षिक कार्यक्रम हाती घेतला जात नाही. त्यामुळे आज अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांची संख्या ही गणली जाते. पण हा अभाव प्रादेशिक वनविभागामध्ये आहे.

ऊसाची शेती ही बिबट्यांना लपण्यासाठी आणि निवाऱ्यासाठी खूप पोषक आहे. बिबट्यांच्या मादीचा प्रजनन कालावधी वर्षभर असून साधारण ती तीन पिल्लांना जन्म देते, क्वचितप्रसंगी चार ते पाच. ऊसाची शेती ही त्यांच्या लपण्यासाठी आणि निवाऱ्यासाठी खूप पोषक आहे. जंगलातले काही बिबट हे ऊसाच्या शेतात भक्ष्याच्या शोधात मुक्कामाला आले आणि नवीन अधिवासात त्यांच्या गरजा भागल्याने ते आता ऊसाच्या शेतात स्थिरावले आहेत, हे एक सत्य आहे. विपुल अन्न, पाणी, दिवस-रात्रीसाठी उत्तम निवारा, पिल्लांची सुरक्षितता यांची पूर्तता ऊसाचे शेत करत असल्याने बिबट्यांसाठी हा हक्काचा निवारा बनला आहे. माणसाला कसे टाळायचे, याचे कौशल्यदेखील मादी बिबट्या स्वतः आत्मसात करीत आहे आणि आता पिल्लांनाही शिकवत आहे. ऊसतोड सुरू झाली की सातत्याने स्थलांतर करावे लागते, हा काळ मादी व पिल्लांसाठी एक संघर्षाचा काळ असतो. त्यादरम्यान अनेक वेळा माणसांशी संघर्ष होतो. पिल्ले मोठी होत असताना साधारणतः जन्माला आलेल्या पिल्लांपैकी 50 टक्के पिल्ले तरी जगतात आणि मोठी होतात. त्यानंतर आपले स्वतंत्र क्षेत्र निश्चित करतात.

कृष्णा, सह्याद्री, अजिंक्यतारा, मरळी रयत, पाली या कराड-पाटणच्या परिसरात ऊसाची प्रचंड मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. हे या बिबट्यांचे मोठे निवाराकेंद्र आहे. कृष्णा-कोयना नदीमुळे मुबलक प्रमाणात पाणी आहे. तसेच विपुल प्रमाणात खाद्य उपलब्ध आहे. जेव्हा कोणत्याही वन्यप्राण्यासाठी परिस्थिती अनुकूल असते, तेव्हा त्यांची संख्या झपाट्याने वाढते. नुकतेच केंद्र शासनाने सर्व ग्रामपंचायतींना जैवविविधता नोंदवही (पीबीआर) अनिवार्य केली आहे. या नोंदवहीसाठी जर शास्त्रीय अभ्यास करून गावागावांतील बिबट्यांच्या नोंदी अचूक करता आल्या, तर त्यावरूनदेखील बिबट्यांची नेमकी संख्या समजू शकेल.

वनविभागानेदेखील वाढत्या बिबट्यांच्या संख्येसाठी निश्चित धोरण ठरविले पाहिजे. आज राज्यात पुणे-साताऱ्याबरोबर नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात ऊसशेतीमध्ये, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये आंबा-काजूच्या बागेत बिबट्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्ह्यातील जवळपास दोन हजार बिबट्यांपैकी 1 हजार, 500 बिबटे हे वनतारा किंवा तत्सम सेंटरमध्ये पाठविण्याचे ठरवले आहे. असे झाले, तरी 500 बिबटे शिल्लक राहतील. त्यांचे प्रजनन वेगाने होईल आणि दोन-तीन वर्षांतच त्यांची संख्या तेवढीच होईल. कारण, ऊस आता सगळीकडेच पसरला आहे.

बिबट्यांची नसबंदी करावी का?

भविष्यात बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी वनविभागाला गांभीर्याने विचार करावा लागेल. यावर शास्त्रीय अभ्यास संशोधन होणे गरजेचे आहे. हा अभ्यास होताना जिल्ह्याची बिबटधारण क्षमता (कॅरिंग कॅपेसिटी) किती आहे? यावरदेखील सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. जुन्नर विभागात सगळे अभ्यास झाले आहेत. त्यामुळे आता तज्ज्ञांच्या नावाखाली अभ्यासात वेळ वाया घालवू नये. आता कृती करावी लागेल. जुन्नरसारख्या गावागावांत टीम उभ्या कराव्या लागतील. ‌‘एआय‌’चा उपयोग करून घराजवळ बिबट आल्यास सूचना मिळेल, अशा यंत्रणा निर्माण कराव्या लागतील. वनविभागाला स्वतःच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची फौज उभी करावी लागेल.

हुशार बिबट्या

बिबट्या हा प्राणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला जुळवून घेतो. बिबट्यांचे वास्तव्य जंगलाबरोबरच जंगल परिसरातील गावांच्या आसपास तसेच बागायती ऊसशेती क्षेत्रातदेखील मोठ्या प्रमाणावर दिसून येते. मानवी वस्तीच्या आजूबाजूला तो निर्भयपणे फिरतो. बिबट्या हा चोरटा शिकारी आहे. जंगलात हा हरीण बेकर, माकड, वानर, छोटी रानडुक्करे, साळिंदर, ससा अशी शिकार करतो, तर जंगलाबाहेर शेळी, मेंढी, छोटे रेडकू, कोंबड्या, मोर, इतर शिकार करतो. मनुष्य वस्तीजवळ भटकी कुत्री, मांजरे, डुक्करे ही त्याची तर सर्वांत आवडती शिकार. अगदी प्रतिकूल परिस्थितीत बेडूक, उंदीर, घुशी, खेकडे खाऊन आपली भूक भागवतो.

- रोहन भाटे
(लेखक साताऱ्याचे मानद वन्यजीवरक्षक असून वन्यजीव अभ्यासक आहेत.)
9422004800 /9822034457