नागपूर : (Bhaiyyaji Joshi) “प्रत्येक व्यक्तीला आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. दुर्बल घटकांना सक्षम घटकांनी उभारी द्यावी. सामाजिक संस्थांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या कौशल्याच्या आधारे पारधी समाजातील दैवी गुण ओळखून त्यांना सक्षम करावे,” असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी केले. ते पारधी विकास परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने आयोजित पारधी समाजासाठी कार्यरत संस्थांच्या एक दिवसीय कार्यशाळेत रविभवन, नागपूर येथे बोलत होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन भैय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांच्या हस्ते झाले. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम उपस्थित होते. अध्यक्षस्थानी पारधी विकास परिषदेचे अध्यक्ष परशराम भोसले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी भारतमाता आणि समशेरसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.
हेही वाचा : फरीदाबादमध्ये डॉक्टरच्या घरातून ३०० किलो आरडीएक्स, AK-47 रायफल जप्त; देशात मोठ्या घातपाताचा कट?
उद्घाटनपर भाषणात भैय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) म्हणाले की, “शिक्षित आणि अशिक्षित दोघेही यश मिळवू शकतात, परंतु त्यासाठी योग्य बुद्धी, कौशल्य आणि प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत. माणसाच्या यशाचे मापन त्याच्या जन्मावर नव्हे तर कर्मावर होते. सामाजिक संस्थांनी वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यकर्त्यांच्या कौशल्याचा उपयोग करून समाज उन्नतीसाठी कार्यरत रहावे,” असे त्यांनी सांगितले.
धर्मपाल मेश्राम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “शासनाचे अनेक लाभ अजूनही शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचलेले नाहीत. पारधी समाजाची स्थिती बदलण्यासाठी शासन आणि सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ प्रेरित संस्था या समाजासाठी ज्या पद्धतीने कार्य करत आहेत, ते समाधानकारक आहे. मला दिलेल्या संधीचा उपयोग करून मीही या समाजासाठी कार्य करीन,” असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रदीप वडनेरकर यांनी केले. कार्यशाळेत विदर्भातील विविध सामाजिक संस्थांचे ४७ प्रतिनिधी सहभागी झाले होते. सहभागी संस्थांनी आपापल्या कार्याचा अहवाल सादर केला.
हे वाचलात का ? : लष्कर-ए-पाकिस्तान!
कार्यशाळेचा समारोप रा.स्व.संघाचे प्रांत कार्यवाह अतुल मोघे यांच्या हस्ते झाला. “सामाजिक संस्थांनी ठोस योजना तयार करून संघटनात्मक बांधणी करावी,” असे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले. त्यांचे स्वागत रूपेश पवार यांनी केले. (Bhaiyyaji Joshi)
या प्रसंगी रा.स्व.संघ विदर्भ प्रांत प्रचारक गणेश शेटे, पारधी विकास परिषदेचे उपाध्यक्ष अमरसिंग भोसले, मार्गदर्शक प्रदीप वडनेरकर, संयोजक आशिष कावळे, सुनिल रत्नपारखी, कोषाध्यक्ष प्रविण पवार, महामंत्री प्रशांत पवार, सह महामंत्री रूपेश पवार यांच्यासह प्रांत कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
कार्यशाळेत पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक संस्था आणि संघटनांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. (Bhaiyyaji Joshi)