खेळाने सांघिक भावनेची वृद्धी होते, असे आपण अनेकदा ऐकले आहे. मात्र, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विश्वविजयी पराक्रम हा संघभावनेचे उत्तम उदाहरण ठरवा. त्या संघातील खेळाडू आणि सर्वच साहाय्यकांनी त्यांच्या वाटेला आलेल्या भूमिका उत्तम पार पाडल्याने हा देदिप्यमान विजय साकार झाला. या विजयातील पडद्यामागच्या कलाकारांचा घेतलेला आढावा...
रंगभूमीवरील आघाडीचा कलाकार प्रशांत दामले बालगंधर्व रंगमंदिरात सांगत होता, ”रविवार, दि. 16 नोव्हेंबरला जो 13 हजार, 333वा माझा वैयक्तिक प्रयोग होणार आहे, तो प्रयोग हाऊसफुल होण्यासाठी जी मंडळी झटतात त्याच्या मागची गोष्ट काय आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. क्रिकेटची जशी टीम असते, तशी नाटकाचीपण टीम असते. ‘इट ईज अ टीम वर्क.’ तिकीट व्यवस्थापन, बस ड्रायव्हर, साऊंड व्यवस्थापक, ध्वनी संयोजक, मेकपमन, कपडेपटवाले वगैरे वगैरे. अशा अनेकांचा समावेश रंगभूमीमध्ये असतो.” प्रशांत दामलेसारख्यांचं रंगभूमीवरील टीमवर्क जसं महत्त्वपूर्ण असतं, तसचं टीमवर्क क्रीडाक्षेत्रातही अत्यावश्यक असतं. प्रत्येक क्षेत्रातली टीम फक्त वेगवेगळी असते एवढेच. एकल असो अथवा सांघिक, दोन्ही क्रीडाप्रकारांत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचा संघ भाग घेतो, तेव्हा त्यात संघ व्यवस्थापकाबरोबरच अन्य अनेक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या व्यक्तीही कार्यरत होतात.
ऑलिम्पिकला जाणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू असो, हरमनप्रीत सिंगचा हॉकीचा संघ असो अथवा हरमनप्रीत कौरचा क्रिकेटचा संघ असो, समाजापर्यंत त्यातील मोजक्याच व्यक्तींची माहिती पोहोचत असते. त्या संघातील पडद्यामागील अनेक कलाकारांची लोकांना नावेही कळत नसतात.
हॉकीचा विचार करता त्या संघासोबत, सर्वसाधारणतः 16 खेळाडूंसह प्रशिक्षक आणि साहाय्यक कर्मचारी वर्ग असतो. मुख्य प्रशिक्षक, विलेषणात्मक प्रशिक्षक, सहप्रशिक्षक, वैज्ञानिक सल्लागार, प्रमुख फिजिओथेरपिस्ट, साहाय्यक फिजिओथेरपिस्ट, व्हिडिओ विलेषक, मालिश करणारा, परदेशी मुख्य विलेषक (ऐच्छिक), गोलकीपर तज्ज्ञ, डॉक्टर इत्यादी. याप्रमाणेच क्रिकेटचा विचार करता, सर्वसाधारणपणे 16 खेळाडूंसह प्रशिक्षक आणि साहाय्यक कर्मचारीवर्गही असतो. त्यामध्ये मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, नेट्स ट्रेनर्स, फिजिओथेरपिस्ट, फिटनेस ट्रेनर इत्यादींचा समावेश होतो. भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रथमच जगज्जेतेपदाला गवसणी घातली आहे. सध्या सर्वत्रच या भारतीय कन्यांच्या यशाची चर्चा जोरदार सुरु आहे. सर्वजण हा विजय टीमवर्कने साध्य झाल्याचे सांगताना दिसतात. या विजयाचे श्रेय कोणा एकाचे नसून त्यात सहभाग घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे असल्याने, ते श्रेय सगळ्यांनाच दिले जाते आहे. सध्या या विश्वविजेत्या टीमचे/कुटुंबाचे सत्कारसोहळे मोठ्याप्रमाणात साजरे करण्यात येत आहेत. त्यात पंतप्रधानांच्या घरी, राष्ट्रपतिभवनात, प्रत्येक राज्यातील संघटना, राज्य सरकारे यांच्यांकडून खेळाडूंचे सत्कार केले जात आहेत.
आपल्याकडे जेव्हा कोणत्याही समारंभाचे निमंत्रण देतो, तेव्हा ‘सहकुटुंब सहपरिवार’ असा उल्लेख त्यात करतो. तोच प्रकार विजेत्या संघांच्या सत्कार सोहळ्याबाबतीतही लागू पडतो. आपण वर उल्लेख केल्याप्रमाणे संघातील 16 जणांबरोबर त्यांचे प्रशिक्षक आणि मंडळी असे सगळे मिळून, जवळजवळ 37 सदस्यांचे ते ‘एक मोठे कुटुंब, एक परिवार’ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या कुटुंबातील सगळेच विशेष निमंत्रित असतात.
भारतीय महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाच्या सदस्यांनी, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रपतिभवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. “क्रिकेटसारख्या सांघिक खेळात, सर्व संघ सदस्यांना नेहमीच पूर्णपणे समर्पित राहणे आवश्यक असते,” असे राष्ट्रपती त्यावेळी म्हणाल्या. राष्ट्रपतींनी मुख्य प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि साहाय्यक कर्मचारी यांच्या योगदानाचीही त्यावेळी मुक्तकंठाने प्रशंसा केली. या विश्वविजेत्या संघाची अशीच दखल पंतप्रधान मोदी यांनीही घेतली .
आपल्या पंतप्रधान-राष्ट्रपतींकडून मिळणारे निमंत्रण आणि ब्रिटिशांकडून मिळणारे निमंत्रण यात आपल्याला फरक दिसून येतो. या विश्वविजेत्या संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी पंतप्रधानांकडे कृतज्ञता व्यक्त करत त्यांची भेट घेण्याची संधी मिळणे, हा मोठाच बहुमान असल्याचेही म्हटले. त्यावेळी त्यांनी जूनमध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या एका घटनेची कहाणी सांगितली. जून 2025ला भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना, किंग चार्ल्सला भेटण्याचा कार्यक्रम ठरला होता. पण शिष्टाचारानुसार फक्त 20 जणांनाच राजाला भेटायची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे भारतीय संघाबरोबर असलेला साहाय्यक प्रशिक्षक वर्ग किंग चार्ल्स यांना भेटू शकला नाही, असे अमोल मुजुमदार यांनी पंतप्रधान यांना सांगितले. “साहाय्यक आधिकारी वर्गाला किंग चार्ल्सला भेटता न आल्याबद्दल मला वाईट वाटलं. तेव्हाच ठरवलं की, आज फोटो काढता आला नाही; पण दि. 4 किंवा 5 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींसोबत फोटो काढू. तो एक दिवस होता आणि आज आम्ही सगळे तुमच्यासमोर आहोत,” असेही मुजुमदार पंतप्रधान मोदी यांना सांगत होते. “खेळाडू आणि साहाय्यक आधिकारी वर्गासह आम्ही सर्व 37 जण पंतप्रधानांच्या निवासस्थानी उपस्थित होतो. आम्ही सर्वांनच तो सुखद क्षण अनुभवला,” अशी प्रतिक्रिया अमोल मुजुमदार यांनी त्यावेळी दिली.
विश्वचषक विजेत्या महिला क्रिकेट संघातील चमूत महाराष्ट्रीयांचा मोठा वाटा असल्याने, सगळे मराठमोळे जन सध्या आनंदी आहेत. महाराष्ट्राच्या क्रिकेटविश्वातील कोणकोण त्या संघात आहेत यात? आपणही त्यांची येथे ‘क्रीडाविश्व’त आवर्जून दखल घेऊया.
1) विजेत्या संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि फलंदाजी प्रशिक्षक : अमोल मुजुमदार. अमोल यांच्या जन्म मुंबईत दि. 11 नोव्हेंबर 1974 रोजी झाला. सध्या त्यांचे निवासस्थान विलेपार्ले येथे आहे. अमेल हे उजव्या हाताने फलांदाजी करत, तर त्यांची गोलंदाजीची शैली उजव्या हाताने ऑफब्रेक फिरकी गोलांदाज अशी होती. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ज्या शाळेसाठी क्रिकेट खेळायचे, त्याच ‘शारदाश्रम’ शाळेसाठी अमोलही खेळत. त्या काळापासून ते आजतागायत अमोल यांच्या क्रिकेटजीवनात किती घडामोडी घडल्या आहेत, त्या जर आपण आता या लेखात मांडत बसलो तर, फक्त त्यासाठी एक स्वतंत्र प्रकरण लिहावे लागेल. तरीपण जाता जाता आपण त्याचा स्वल्पसा उल्लेख करूच.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे खेळूनही भारतीय संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूंमध्ये, राजिंदर गोयल आणि पद्माकर शिवलकर यांचं नाव घेतलं जातं. त्यात अजून एक नावाची जोड म्हणजे अमोल मुजुमदार होय! आता देशाच्या महिला संघाला विश्वचषक स्पर्धेत अजिंक्य बनवण्यात मोलाचं योगदान देत, अमोलनं त्याला हुलकावणी दिलेल्या ‘ब्लू जस’ला जगभरात मान मिळवून दिला. अमोल कधीही भारतासाठी खेळला नाही. त्याला कधीही सामन्यापूव राष्ट्रगीतासाठी उभा राहण्याची संधी मिळाली नाही आणि त्याने विश्वचषक देशासाठी उचंवण्याचे स्वप्न पूर्ण केले.
- अमोल मुजुमदार
2) कवी केशवसुतांच्या रत्नागिरी तालुक्यातल्या मालगुंड गावातील मराठवाडी येथे वडिलोपार्जित घर असलेल्या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार माधव साळवी यांचा जन्म जरी मुंबईत झाला असला, तरी त्यांची नाळ कोकणातील मातीशी घट्ट जोडलेली आहे. उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज म्हणून त्यांनी आपल्या कारकिदची सुरुवात केली. मुंबईचे रणजीपटू असलेले आविष्कार साळवी, त्यांच्या चेंडू स्विंग करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. त्यांनी काही आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे.
- अविष्कार साळवी
3) संघाची फिजिओथेरपिस्ट नेहा कर्णिक यांनी आकांक्षा सत्यवंशीच्या जोडीने, आपले फिजिओथेरपिस्टची भुमिका चोख बजावली आहे. बंगळुरुची असूनही मराठीत बोलणणाऱ्या नेहा कर्णिक यांचा, या क्षेत्रातील अनुभव 14 वर्षांचा आहे. त्यांनी ‘बीसीसीआय’, श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या मुख्य फिजिओ म्हणून, ऑलिम्पिक कुस्तीगीर, आंतरराष्ट्रीय सायकलपटू आणि जलतरणपटू यांसारख्या खेळाडूंसह अनेक उल्लेखनीय संस्थांसोबत काम केले आहे.
- नेहा कर्णिक
4) बंगळुरु येथे काम करणारे संघाचे फिटनेस ट्रेनर आनंद दाते यांना, खेळाडूंची ताकद आणि कंडिशनिंग या क्षेत्रात 13 वर्षांहून अधिक अनुभव आहे. तसेच ‘बीसीसीआय’बरोबर काम करण्याचा 12 वर्षांहून अधिक अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे.
- आनंद दाते
5) क्रिकेटमधील परफॉर्मन्स ॲनालिस्ट ही भूमिका, आजच्या आधुनिक खेळात अत्यंत महत्त्वाची. या पदावरील व्यक्ती खेळाडूंच्या कामगिरीचे सखोल विलेषण करून, संघाला तांत्रिक आणि धोरणात्मक मदत करते. सामन्यांतील प्रत्येक चेंडू, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे व्हिडिओ व आकडेवारीच्या माध्यमातून विलेषण केले जाते. त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे, खेळाडूंच्या जमेच्या बाजू-उणिवा शोधल्या जातात आणि सुधारणा सूचवली जाते. प्रतिस्पध संघाच्या खेळाचे पॅटर्न, गोलंदाजांचे वेग, फलंदाजांचे शॉट्स, आणि परिस्थितीनुसार त्यांची प्रतिक्रिया यांचे विलेषण करून, रणनीती आखली जाते. त्यामुळे परफॉर्मन्स ॲनालिस्ट हा केवळ सांख्यिकीय तज्ज्ञ नसून, तो संघाचा रणनीतीकार आणि डेटा-आधारित मार्गदर्शकही असतो. हा रणनीतीकार आधुनिक क्रिकेटला अधिक स्पर्धात्मक बनवतो.
- अनिरूद्ध देशपांडे
अमरावतीच्या ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळा’च्या मैदानाचे क्रिकेटपटू असलेल्या अनिरुद्ध देशपांडे यांनी, संघाला ‘टेक्निकल व टॅक्टिकल’ साथ देण्यासोबतच काटेकोर नियोजनाची जबाबदारीही उत्तम पार पाडली. नियोजन, डावपेच, मेहनत व आत्मविश्वास तसेच प्रचंड सांधिक भावनेच्या जोरावर महिला क्रिकेटपटूंनी, हा इतिहास रचला. 14, 16 व 19 वर्षांखालील विदर्भाच्या संघाकडून उत्तम कामगिरी केलेल्या अनिरुद्ध यांनी, अनेक पातळ्यांवर काम केल्यामुळे प्रचंड अनुभव तसेच अभ्यास त्यांच्या पाठीशी होताच. त्यामुळेच महिला क्रिकेट संघाच्या परफॉर्मन्स ॲनालिस्टची जबाबदारी अनिरुद्ध देशपांडे यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली. कोणत्या मैदानाची खेळपट्टी कशी आहे, कोणत्या संघाशी आपला सामना होऊ शकतो, त्यावेळचे संभाव्य वातावरण, प्रतिस्पध खेळाडूंच्या कमकुवत बाजू अशा सर्वच बाजूंनी देशपांडे यांनी वेळोवेळी केलेला अभ्यास संघाला उपयोगी पडला.
संघातील सगळ्याच मुलींनी अप्रतिम कामगिरी करून दाखवली आहे. त्यांनी जशी चोख कामगिरी बजावली, तशीच चोख कामगिरी क्रीडा व्यवस्थापन या विषयाशी संबंधित तज्ज्ञांनीही या स्पर्धेत करून दाखवली. या संघातील सर्वच खेळाडू आणि मदतनीसांनी आपल्या जबाबदाऱ्या उत्तम पार पाडल्याने, हा चषक आज भारताकडे आला आहे. समस्त भारतीय क्रीडाविश्व या ‘टीमवर्क’मधील सगळ्यांचे आभार व्यक्त करत आहे आणि उत्तरोत्तर अशी कामगिरी क्रिकेटसहित सर्वच क्रीडाप्रकारांत दाखवत राहण्यासाठी त्यांना शुभेच्छाही देत आहे.
- श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत)
9422031704