तरंगणारा ‌‘दुमा‌’

10 Nov 2025 12:14:41

काही दिवसांपूव जगातील सर्वांत मोठे वस्तुसंग्रहालय लोकांसाठी खुले झाले. इजिप्तच्या गिझा पिरॅमिडनजीक असलेल्या या वस्तुसंग्रहालयामध्ये, इजिप्तच्या संस्कृतीसंचिताचा समग्र वारसा आपल्याला बघायला मिळतो. तब्बल पाच ते सात हजार वर्षांपूवच्या ऐतिहासिक वस्तूंच्या पाऊलखुणा, पर्यटकांना इथे बघता येणार आहेत. 123 एकर जागेमध्ये उभारण्यात आलेल्या या वस्तुसंग्रहालयाला, तयार करण्यासाठी तीन दशकांहून अधिक कालावधी लागला. नैसर्गिक आव्हाने, इजिप्तमधील सत्तांतरे या साऱ्या गोष्टींवर मात करून, अखेर यावष ही वास्तू लोकांसाठी खुली झाली.

मानवी इतिहासामध्ये सांस्कृतिक अवलोकनासाठी वस्तुसंग्रहालयाचे महत्त्व अनन्यसाधारण असेच. मात्र, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती जिथे एकत्रितपणे नांदू शकतात, जिथे मुक्तपणे विचारांची देवाणघेवाण होऊ शकते, अशी जागा म्हणजे वस्तुसंग्रहालय. वस्तुसंग्रहालयाचा असाच एक आगळा-वेगळा प्रयोग आपल्याला बघायला मिळणार आहे, दुबईमध्ये! कारण दुबईमध्ये पाण्यावर तरंगणारं वस्तुसंग्रहालय उभारण्यात आले आहे.

काही दिवसांपूव दुबईचे शासक मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी, या आगळ्या-वेगळ्या वस्तुसंग्रहालयाची माहिती जगाला संगितली. ‌‘दुबई म्युझियम ऑफ आर्ट‌’ अर्थात ‌‘दुमा‌’च्या माध्यमातून, लोकांना दुबईमधला आणखी एक आगळा-वेगळा अविष्कार अनुभवायला मिळणार आहे. दुबईच्या वास्तुकलेचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, याची रचना समुद्रातील शिंपल्याप्रमाणे असणार आहे. खोल समुद्रातून मोती वेचण्याचे काम दुबईमध्ये पारंपरिकरित्या केले जाते. त्याच परंपरेचे प्रतीक या वास्तुशिल्पामध्ये उमटले आहे, असे निरीक्षण यावेळी काही जाणकारांनी नोंदवले आहे. दुबईच्या खाडीमध्ये पाण्यावर तरंगणारे पाचमजली वस्तुसंग्रहालय, अत्यंत खुबीने आखण्यात आले आहे. या प्रकल्पाची सर्वांत मोठी अडचण होती, ती पाण्यावर स्थिर इमारत उभी करणे. त्यामुळे यामध्ये समुद्री अभियांत्रिकी आणि अत्याधुनिक वास्तुकलेचा सर्वांगी सुंदर मिलाप घडून आला आहे. ही इमारत तयार करण्याची किमया केली त्या किमयागाराचे नाव टाडाओ आंदो! जगद्विख्यात वास्तुविशारद असलेले आंदो नैसर्गिक प्रकाशाच्या सर्जनशील वापरासाठी प्रसिद्ध आहेत. साचेबद्ध इमारत घडवण्याऐवजी, सूर्यप्रकाश, वारा आदी गोष्टी लक्षात घेऊन वास्तू निर्मितीकडे त्यांचा कल असतो. आपल्या कामातून आपण आपल्या भोवतालाकडे कलात्मकदृष्ट्या कसे पाहू शकतो, याची आपल्याला त्यांचे काम पाहून प्रचिती येते.

या तरंगणाऱ्या इमारतीमध्येही वेगवेगळ्या कलांच्या प्रदर्शनासाठी दालनं उपलब्ध करून दिलेली आहेतच. मात्र, त्याचबरोबर अभ्यास कक्ष, ग्रंथालये, व्हीआयपी लाऊंज अशा विविध गोष्टींनी ही वास्तू समृद्ध आहे. पारंपरिकदृष्ट्या विकसित झालेल्या वस्तुसंग्रहालयापेक्षा आधुनिक काळामध्ये या वस्तुसंग्रहालयाने कात टाकायला हवी, या विचाराने याची निर्मिती करण्यात आली आहे. कलेसाठी आणि संस्कृतीसाठी लोकांनी या ठिकाणी एकत्रित यावं, असा विचार यामागे आहे. “ही जागा म्हणजे आधुनिक कलेची राजधानी व्हावी,” असा विचार शेख मोहम्मद यांनी मांडला. दुबई हे ठिकाण वास्तुकलेच्या वेगवेगळ्या नमुन्यांनी सज्ज आहे. बुर्ज खलिफा, बुरुज अल अरब, दुबई फ्रेम अशा विविध कलाकृतींच्या माध्यमातून, जगासमोर एक नवा विचार देण्याचे काम होत आहे. दि. 3 डिसेंबर रोजी हे वस्तुसंग्रहालय सगळ्यांसाठी खुलं होईल.

आर्थिकदृष्ट्या ज्या वेळेला एखादे राष्ट्र संपन्न होते, त्यावेळेला सर्वच क्षेत्रांमध्ये नावीन्याचा शोध घेण्यासाठी तिथल्या लोकांना अवकाश मिळतो. किंबहुना, हा अवकाश गवसणे आवश्यकच असते. इजिप्तमधले जगातील सर्वांत मोठे वस्तुसंग्रहालय असो किंवा दुबईमधला हा नवा अविष्कार, संस्कृतीच्या पाऊलखुणा किती महत्त्वाच्या आहेत, याची आपल्याला प्रचिती तर येतेच. परंतु त्याचवेळी आपल्याकडची कला जोपासण्यापलीकडे ती वृद्धिंगत कशी होईल, जगाच्या पाठीवर त्या कलानिर्मितीची वेगळी छाप कशी उमटेल, याबद्दल विचार करणे गरजेचे असल्याचेही आपल्याला या उदाहरणांवरून लक्षात येते. काळाच्या ओघामध्ये ही वेगळी छाप त्या त्या राष्ट्राची ओळख होऊन बसते, जिची अनुभूती घेण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यांतून लोक येतात. येणाऱ्या काळामध्ये जगाला तारण्यासाठी हा समन्वयाचा विचारच आधी काम करणार आहे, हे आता राष्ट्रांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.


Powered By Sangraha 9.0