ज्वालामुखी, वज्रेश्वरी आणि फ्रेंच राज्यक्रांती

01 Nov 2025 10:18:02


Vajreshwari
 
हिमाचल प्रदेशातले ज्वालामुखी देवीचे मंदिर ‌‘वज्रेश्वरी‌’ म्हणूनदेखील ओेळखले जाते. शिवाय, मुंबईजवळ वज्रेश्वरी देवीचे एक वेगळे मंदिर आहेच. ज्वालामुखी देवीच्या गाभाऱ्यात मूत नसून अखंड फुरफुरणारी एक अग्निज्वाला आहे. वज्रेश्वरी देवीच्या गाभाऱ्यात मूत आहेत. ज्वालामुखी देवी आणि वज्रेश्वरी देवीच्या परिसरात गंधकयुक्त पाण्याची अनेक कुंडे आहेत. म्हणजेच हजारो वर्षांपूवच्या जिवंत ज्वालामुखीच्या उद्रेकांचे हे अवशेष आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीचाही ज्वालामुखीशी संबंध आहे. तो कसा? जाणून घेऊया.
 
भगवान शंकर हा स्मशानवासी अवधूत. म्हणून राजा दक्षाने त्याला आपल्या यज्ञासाठी आमंत्रण केले नाही. आपल्या नवऱ्याचा हा अपमान सतीला म्हणजे पार्वतीला सहन झाला नाही. तिने प्राणत्याग केला. शिवाला जेव्हा हे कळले, तेव्हा त्याने आपल्या गणांसह येऊन दक्षयज्ञाचा साफ विद्ध्वंस केला. हे स्थान म्हणजे आजच्या हिमाचल प्रदेशातील, बियास नदीच्या खोऱ्यातील, कांगडा (कांग्रा) जिल्ह्यातील ज्वालामुखी हे होय. इथे गाभाऱ्यात सुमारे तीन फूट खोल असे एक कुंड आहे. त्यातली अग्निज्वाला सतत फुरफुरत असते. ती ज्वाला हेच माता पार्वतीचे रुप मानले जाते. म्हणून त्या स्थानाला ‌‘ज्वालामुखी माता मंदिर‌’ असेच म्हणतात. वैज्ञानिकांच्या मते, पृथ्वीवर 2 कोटी, 60 लक्ष वर्षांपूव ‌‘प्लेईस्टोसिन‌’ नावाचे हिमयुग होतेे. त्या काळात या परिसरात ज्वालामुखीचे उद्रेक, भूकंप इत्यादि फार मोठ्या भूवैज्ञानिक हालचाली होऊन गेल्या असाव्यात. त्यांचा अवशेष म्हणजे, ही अखंड तेवणारी ज्वाला होय. अनेकांच्या मतेे ती एकच अग्निज्वाला नसून त्या एका मोठ्या ज्वालेच्या नऊ जिव्हा किंवा जिभा आहेत. वैज्ञानिकांच्या मते, त्या ठिकाणी भूगर्भात नैसर्गिक वायूचा मोठा साठा आहे.
 
मुंबईजवळ पालघर जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात वज्रेश्वरी हे जगदंबेचे मोठे जागृत स्थान आहे. तानसा नदीच्या तीरावर वसिष्ठ ऋषींनी मोठा यज्ञ मांडला होता. देवराज इंद्राला त्यांचा मत्सर वाटून त्याने यज्ञाचा विद्ध्वंस करण्यासाठी आपले अमोघ वज्र सोडलेे. तेव्हा ऋषींनी जगदंबेचा धावा केला. जगदंबेने तिथे प्रकट होऊन वज्र गिळून टाकले आणि ऋषींसह यज्ञाचे रक्षण केले. म्हणून ती वज्रेश्वरी किंवा वज्राबाई. वज्रेश्वरीच्या आसपास कुठेही ज्वालामुखी होते, असा पुरावा अद्याप तरी सापडलेला नाही. परंतु, गंधकयुक्त गरम पाण्याचे झरे, ज्याला ‌‘उन्हाळे‌’ असे म्हटले जाते, ते भरपूर आहेत. अर्थात, ज्या सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला वज्रेश्वरी किंवा एकंदर कोकणपट्टी आहे, तो सह्याद्री पर्वत सुमारे 15 कोटी वर्षांपूव ज्वालामुखीतूनच निर्माण झाला आहे, असे वैज्ञानिकांचे मत आहे.
 
आता आपण फ्रेंच राज्यक्रांतीकडे वळू. सन 1789 या वष फ्रान्समधल्या सर्वसामान्य माणसाने जुलमी राजेशाहीविरुद्ध उठाव करून राजे-राण्या-सरदार यांची वर्षानुवर्षांची हुकुमशाही मोडून काढली. अनेक विचारवंतांनी या क्रांतीमध्ये सहभागी होत, ‌‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता‌’ हा एक नवाच मंत्र एकप्रकारे संपूर्ण जगातल्या सामान्य जनतेला दिला. ते विचारवंत क्रांतिकारक ही सामान्य जनतेची राजवट टिकवू शकले नाहीत, हा भाग अलाहिदा. पण, आपण मनात आणले तर राजसत्ता उलथून पाडू शकतो, हा आत्मविश्वास आधुनिक युरोपीय सामान्य माणसाला फ्रेंच राज्यक्रांतीने दिला, हे तिचे महत्त्व.
 
या राज्यक्रांतीच्या वेळी सोळावा लुई हा फ्रान्सचा राजा होता. मारी आंत्वानेत किंवा इंग्रजी उच्चारानुसार ‌‘मेरी अँटोनिट‌’ ही त्याची राणी होती. राजा-राणी आणि त्यांचे सरदार हे अखंड सुखोपभोग आणि विलासात मग्न असत. सर्वसामान्य जनतेपासून, लोकांच्या हीन-दीन अवस्थेपासून ते इतके तुटून गेले होते की, गरिबी म्हणजे काय, एखाद्याला रोजचे जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक असणारा जो पाव किंवा ब्रेड तोसुद्धा मिळू शकत नाही, म्हणजे काय, याचे त्यांना आकलनच होत नव्हते. त्यामुळे काही गरीब माणसांचा एक जत्था मेरी अँटोनिटकडे जाऊन तिला म्हणाला, “राणी सरकार, आम्हाला साधा पावसुद्धा मिळत नाही.” तेव्हा ती म्हणाली, “तुम्हाला पाव मिळत नसेल, तर केक खा.” अशा अनेक घटना घडून अखेर सामान्य फ्रेंच माणूस भडकून उठला आणि फ्रेंच राजघराण्यासह असंख्य सरदार-जहागिरदार-जमीनदार यांची आहुति पडली.
 
फ्रेंच राज्यक्रांतीच्या या ज्वालामुखीमध्ये राजकीय, सामाजिक जुलूम, अन्याय यांच्याचबरोबर एक खराखुरा नैसर्गिक ज्वालामुखीसुद्धा कारणीभूत ठरला होता. युरोप खंडाच्या उत्तर टोकाला, अटलांटिक महासागर आणि आर्क्टिक महासागर यांच्या सीमेवर, उत्तर ध्रुव प्रदेशाच्या अगदी जवळ आईसलॅण्ड नावाचा देश आहे. किंबहुना, सुमारे 1 लाख, 3 हजार चौ. किमी क्षेत्रफळाचे ते एक अवाढव्य बेटच आहे. बर्फाने झाकलेला भूप्रदेश आणि ओसाड खडकाळ पठारे यामुळे आईसलॅण्डची 75 टक्के भूमी निर्मनुष्य आहे. इथे कोणतीही नाव घेण्यासारखी पिके घेता येत नाहीत. यामुळे मासेमारी हाच इथला मुख्य व्यवसाय आहे.
 
आता पुढची गंमत पाहा. आईसलॅण्डच्या भूपृष्ठावर अनेक ठिकाणी किमान एक किमी एवढ्या जाडीचे बर्फाचे थर आहेत. पण, तरीही या देशातले किमान 34 ज्वालामुखी हे जागृत आहेत. किंबहुना, संपूर्ण आईसलॅण्ड बेट हे ज्वालामुखीतूनच निर्माण झालेले आहे. सन 1783 साली आईसलॅण्डवरच्या ‌‘लाकी‌’ या नावाच्या ज्वालामुखीचा इतका जबरदस्त उद्रेक झाला की, त्याच्या धुळीने आणि सल्फर-डाय-ऑक्साईडयुक्त राखेने संपूर्ण उत्तर गोलार्धाची हवा बदलून गेली. तापमानात लक्षणीय घट झाली. परिणामी, संपूर्ण युरोप खंड दुष्काळाच्या तडाख्यात सापडला. फ्रान्सची भूमी चांगली सुपीक आहे, इंग्लंडसारखी नापीक, बरड नव्हे. पण, फ्रान्समध्येही शेतीचे अतोनात नुकसान झाले. ज्या गव्हाच्या पिठाचा पाव बनणार, तो गहूच जर पिकला नाही, तर पाव बनवणार कशाचा? जो थोडा-फार गहू आयात केला गेला असेल, त्याचा बनलेला पाव अर्थातच राजे-राण्यांना पहिल्यांदा दिला गेला. मग गरिबांनी काय खावे?
 
असो. या ज्वालामुखी आणि राज्यक्रांतीबद्दलच्या माहितीचा वर्तमान संदर्भ डॉ. मिचेली पार्क या आईसलॅण्डच्या महिला हवामानशास्त्रज्ञाच्या ताज्या संशोधनाशी आहे. डॉ. मिचेली यांना असे आढळले की, आईसलॅण्डमध्ये एकंदर 34 ज्वालामुखी जागृत असले, तरी 1970 नंतर म्हणजे गेल्या 55 वर्षांत कुणाचाही उद्रेक झालेला नाही. पण, गेल्या दहा वर्षांत वैश्चिक तापमानवाढीमुळे आईसलॅण्डच्या भूपृष्ठावरचे बर्फ झपाट्याने वितळत आहे. म्हणजेच, भूपृष्ठावरचा बर्फाचा दाब सतत घटत आहे. त्यामुळे ज्वालामुखींमधला मॅग्मा नामक पातळ खडक किंवा शिलारस हा वेगाने ज्वालामुखीच्या तोंडाकडे येत आहे. भूगर्भात मॅग्माची निर्मितीही वेगाने होत आहे. म्हणजेच, आईसलॅण्डच्या जमिनीवरचा बर्फाचा दाब कमी होणे याचा दुसरा अर्थ ज्वालामुखीच्या उद्रेकाला आमंत्रण देणे, असा असू शकतो.
 
या निष्कर्षाचा प्रतिवाद केला जाऊ शकतो. सन 1783 साली जेव्हा लाकी ज्वालामुखीने संपूर्ण युरोप खंडावर दुष्काळाचे संकट आणले, तेव्हा औद्योगिक क्रांती झालेली नव्हती. त्यामुळे वैश्चिक तापमानवाढ-ग्लोबल वॉर्मिंग झालेले नव्हते. ग्लेशियर वितळून भूमीवरचा बर्फाचा दाब कमी झालेला नव्हता. तरीही मॅग्मा ऊर्फ शिलारसाची भूगर्भातली निर्मिती वाढून त्याचा भीषण उद्रेक झालाच ना? मग त्याची कारणे काय होती?
 
वैज्ञानिकांमध्ये अशी संशोधने, त्यावरील वाद आणि प्रतिवाद होतच राहतील. प्रगत देश एकीकडे ग्लोबल वॉर्मिंगवर आंतरराष्ट्रीय परिषदा घेताना, दुसरीकडे तापमानवाढीला मुख्यतः जबाबदार असलेली आपली चंगळवादी जीवनशैली चालूच ठेवतील. रेफ्रिजरेटरमधला क्लोरोफ्लुरोकार्बन हा वायू खूप प्रदूषण करतो. मग तुम्ही-आम्ही घरातला फ्रीज काढून टाकणार आहोत का? छे! शक्य झाले, तर प्रत्येक खोलीत एक फ्रीज ठेवू!
 
नौरू बेटांवरचे हद्दपार
 
ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लागल्यावर ब्रिटनने तिथे आपल्या हद्दपार गुन्हेगारांना पाठवण्याची पद्घत सुरू केली. आजचे ऑस्ट्रेलियन गोरे नागरिक हे मुख्यतः त्या मूळच्या गुन्हेगारांचे वंशज आहेत. आपल्याला हे माहीत आहे का, की ब्रिटिश सत्ता भारतातून चंबू-गबाळे आवरून निघून गेल्यावर, ज्या अँग्लो-इंडियन वंशाच्या लेोकांना भारतातून इंग्लंडमध्ये स्थलांतरित व्हायचे होते, त्यांना त्वरित ब्रिटनचे नागरिकत्व मिळत होते. पुढे काही वर्षांनी त्यांना ब्रिटनपेक्षा ऑस्ट्रेलियात जाऊन स्थायिक होण्यास उत्तेजन देण्यात येत होते.
 
ऑस्ट्रेलियाच्या वायव्येला पॅसिफिक महासागरात नौरू नावाचे बेट आहे. सुमारे 21 चौ. किमी आकाराचे हे संपूर्ण बेट फॉस्फेटच्या खडकांचे बनलेले असून, त्यांची लोकसंख्या आहे फक्त 12 हजार. नौरू बेटावरचे मूळ रहिवासी, त्यांचा धर्म, त्यांची संस्कृती ही आता जवळपास नामशेष झाली आहे. तरी त्यांची नौरून नावाची बोलीभाषा थोडीशी प्रचलित आहे, पण मुख्य भाषा इंग्रजी हीच आहे. दरवष, दि. 26 ऑक्टोबरला त्यांच्या मूळ संस्कृतीमधला ‌‘अंगाम दिन‌’ ते आजही साजरा करतात. तसा यावष तो गेल्या आठवड्यात झाला. नौरूनी लोकांची वैशिष्ट्ये म्हणजे ते फार लठ्ठ असतात आणि भयंकर सिगरेटी आणि चुट्टे फुंकतात. चुट्टा म्हणजे एक प्रकारच्या पानांपासूनच बनवलेली बिडीच.
 
नुकतेच ऑस्ट्रेलियाने आपल्या देशातल्या एकंदर 358 हद्दपार गुन्हेगारांना नौरू बेटांवर सोडून दिले. नौरू बेट हा व्हॅटिकन आणि मोनॅको यांच्यानंतरचा जगातला तिसरा छोटा देश आहे. छोटा असला तरी तो एक स्वतंत्र देश आहे. मग ऑस्ट्रेलियाचे तडीपार गुन्हेगार त्याने का स्वीकारले? याबाबत असे सांगितले जात आहे की, नौरू सरकारला याबदल्यात ऑस्ट्रेलियन सरकारकडून बरीच मोठी रक्कम मिळालेली आहे.
 
त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, हे तडीपार गुन्हेगार, विविध आशियाई देश आणि मध्यपूर्वेतल्या देशातून बोटींमधून येऊन ऑस्ट्रेलियात आश्रय मागणारे असे आहेत. म्हणजे ते कोण आहेत, तुम्हाला कळलेच असेल. लवकरच नौरू बेटावर ‌‘हम पाच, हमारे पचीस‌’ सुरू होणार बहुतेक.
 
 
Powered By Sangraha 9.0