'हाॅक माॅथ'च्या दोन प्रजातींची महाराष्ट्रामधून प्रथमच नोंद; साताऱ्यात सखोल संशोधन

01 Nov 2025 16:45:19
hawk moth



मुंबई (अक्षय मांडवकर) -
साताऱ्यातील संशोधकांनी महाराष्ट्रामधूनच प्रथमच पंतगामधील 'हाॅक माॅथ'च्या दोन प्रजातींची नोंद केली आहे (hawk moth). 'हाॅक माॅथ'मधील 'जेड हाॅक माॅथ' आणि 'स्केअर्स व्हेलवेट हाॅक माॅथ' या महाराष्ट्रामधून प्रथमच नोंदवलेल्या दोन प्रजाती साताऱ्यात आढळून आल्या आहेत (hawk moth). यानिमित्ताने संशोधकांनी साताऱ्यातून पतंगाच्या 'बॉम्बीकोइडिया' या मोठ्या कुटुंबातील ५७ प्रजातींची नोंद केली आहे. (hawk moth)
 
 
फुलपाखरांचे भाऊबंद असणारे पतंगांवर पुरेसा अभ्यास झालेला नाही. यातील बहुतांश प्रजाती या निशाचर असल्याने त्यांची व्याप्ती अजूनही आपल्या लक्षात आलेल्या नाहीत. पतंगांचा समावेश संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील खवलेपंखी गणात होतो. या पंतगांमधील 'बॉम्बीकोइडिया' या मोठ्या कुटुंबामध्ये अॅटलास माॅथ सारखे आकाराने मोठे आणि हाॅक माॅथ सारखे वेगाने उडणाऱ्या प्रजातींचा समावेश होतो. सातारा जिल्ह्यातील 'बॉम्बीकोइडिया' पतंगाच्या विविधतेवर 'महादरे रिसर्च ऑर्गनायझेशन'चे संशोधक गायत्री पवार, सुनील भोईटे आणि साताऱ्यातील 'कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटी'च्या 'यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट सायन्स कॉलेज'च्या नेहा बेंद्रे यांनी अभ्यास केला. याविषयीचे संशोधन 'इंडियन जर्नल ऑफ एंटोमोलॉजी'मध्ये प्रकाशित झाले आहेत.
 
 

hawk moth 
 
पतंगाच्या 'बॉम्बीकोइडिया' या मोठ्या कुटुंबाच्या छत्रामध्ये जगात एकूण १० कुटुंबांचा समावेश होतो. तर पश्चिम घाटात त्यांची स्फिंगिडे, युप्टेरोटिडे, सॅटर्निडे आणि बॉम्बसिडी या चार कुटुंबातील पंतगाच्या प्रजाती आढळतात. आता संशोधकांनी साताऱ्यामधून 'बॉम्बीकोइडिया' या मोठ्या कुटुंबाच्या ५७ प्रजातींची नोंद केली आहे. यामधून 'जेड हाॅक माॅथ' आणि 'स्केअर्स व्हेलवेट हाॅक माॅथ' या दोन प्रजाती महाराष्ट्रात प्रथमच आढळून आल्या आहेत. 'हाॅक माॅथ'चे प्रोबोसिस म्हणजेच मधुरस गोळा करण्यासाठी वापरली जाणारी सोंड इतर पतंगांच्या तुलनेत मोठी असते. त्यामुळे अमरी म्हणजेच सह्याद्रीमधील दुर्मीळ ऑर्किडचे परागीभवन करण्यासाठी हे पतंग महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे संशोधक सुनील भोईटे यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातून पहिल्यांदाच नोंदविण्यात आलेल्या पतंगांच्या दोन प्रजातींच्या तपासणीसाठी 'यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट सायन्स कॉलेज'ने त्यांच्याकडील पतंगाचे नमुने उपलब्ध करुन दिल्याचे गायत्री पवार यांनी सांगितले.


नोंदवलेल्या पतंगांविषयी...
संशोधकांना 'जेड हाॅक माॅथ' हा साताऱ्यातील आंबवडे गावात मिळाला. या पतंगाचा पंखाचा विस्तार ८६ ते १२० मिमी आहे. सातवीण, कदंब, सिन्कोना, इक्सोरा ही झाडे या पतंगाच्या अळ्यांची खाद्य वनस्पती आहेत. यापूर्वी या पतंगाची नोंद भारतामधील केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, निकोबार बेट आणि उत्तर प्रदेश राज्यामधून करण्यात आली आहे. 'स्केअर्स व्हेलवेट हाॅक माॅथ' हा पतंग चाळकेवाडी पठारावर आढळून आला. त्याच्या पंखाचा विस्तार हा १२८ ते १४८ मिमी आहे. यापूर्वी या पतंगाची नोंद पंजाब, आसाम, केरळ आणि उत्तर प्रदेशमधून झाली आहे. लाबार किनो किंवा इंडियन किनो झाड हे या पतंगाच्या अळ्यांची खाद्य वनस्पती आहे.
Powered By Sangraha 9.0