चित्रसंगमाचा ‌‘एकत्र‌’ अनुभव!

01 Nov 2025 11:09:01

together-on-canvas
 
चित्रकाराची समृद्ध दृष्टी एकाच कुटुंबातील तिघांनी जोपासली तर काय होतं? कॅन्व्हासवर उमटलेल्या चित्रांना विविधतेचा, नवलाईचा स्पर्श तर मिळतोच; परंतु सृजनाचा नवा विचारसुद्धा जन्माला येतो. मुंबईच्या जहांगीर कलादालन येथे ‌’एकत्र‌’ (टूगेदर ऑन कॅन्व्हास) या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रख्यात चित्रकार रमेश भोसले, त्यांच्या पत्नी शुभदा भोसले तसेच मुलगा रमेश भोसले यांच्या चित्रांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. दि. 28 ऑक्टोबर ते दि. 3 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे प्रदर्शन निशुल्क सर्वांसाठी खुले असेल. या आगळ्यावेगळ्या चित्रप्रदर्शनाचा आढावा घेणारा लेख...
 
एकम सत विप्रा बहुधा वदन्ति
 
अर्थात सत्य एकच आहे, परंतु बुद्धिमान लोक याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. चित्रांच्या विश्वामध्ये वावरताना बऱ्याचदा आपल्याला या गोष्टीची प्रचिती येते. चित्रकार आपल्या सौंदर्यदृष्टीच्या माध्यमातून भौतिक विश्वाचेच अलौकिक दर्शन आपल्याला घडवत असतो. अशात मग, देवदेवता, पारलौकिक शक्ती यांचे दर्शन सामान्य कसे असेल? प्रख्यात चित्रकार रमेश भोसले यांच्या कुंचल्यातून साकारलेली चित्रं म्हणजे, एक अध्यात्मिक अनुभूती तर आहेच, मात्र त्याचबरोबर प्रचलित विचारविश्वाच्या पलीकडे भक्तीचा विचार मांडणारी एक नवी कलाकृती आहे. एखादे चित्र साकारताना, रंगसंगतीची प्रमाणबद्धता किती काटेकोरपणे पाळावी लागते, याची प्रचिती आपल्याला त्यांच्या चित्राकडे बघताना येते.
 
आपल्या कुंचल्यातून दैवत्व साकारताना, रमेशजींनी 14 विद्या आणि 64 कलांच्या अधिपतीला नमन केले आहे. गणरायाचे परिपूर्ण आणि तितकेच तेजस्वी रुप आपल्या चित्रातून बघायला मिळते. चित्र साकारताना, त्यामधील भौतिक वातावरणाची निर्मिती अत्यंत काटेकोरपणे केल्याचे आपल्याला दिसून येते. माणसाला अध्यात्म विचाराचा परिसस्पर्श ज्या यंत्रांमुळे, तंत्रामुळे आणि मंत्रामुळे लाभतो, त्यांचे सुद्धा विलोभनीय दर्शन आपल्याला या प्रदर्शनातील चित्रांमध्ये बघायला मिळते. योगमुद्रा, शक्ती, सूर्य अशी तत्त्वं एका चौकटीमध्ये माणसाच्या जीवनातील परिपूर्णतेचा विचार सांगून जातात. परिपूर्णतेचा विचार आणि आदिशक्ती या दोन गोष्टींना आपण वेगळं काढू शकत नाही. म्हणूनच हातात वीणा घेतलेली सरस्वती जशी अवतरलेली असते, त्याच प्रकारे कालीमातेचे रौद्र रुपसुद्धा आपल्याला दिसून येते. या चित्रवैभवावर भाष्य करताना रमेश भोसले सांगतात की, त्यांच्या कामावर मराठा चित्रशैलीचा प्रभाव राहिला आणि म्हणूनच रंगांच्या विविधतेने सजलेला चित्रांचा पट एका वेगळ्या शैलीमध्ये उजागर होतो.
 
40 वर्षांहून अधिक काळ चित्रविश्वात नवा विचार मांडणाऱ्या शुभदा भोसले यांच्या चित्रांच्या केंद्रस्थानी ‌‘स्त्री‌’ हा विषय कायमच राहिला आहे. स्त्री आणि स्त्रीत्वाच्या अंतरंगाची खोली त्यांच्या चित्रांमधून आपल्याला प्रकर्षाने जाणवते. ‌‘मधुरानी‌’ या विषयाच्या माध्यमातून राणी माशी, मधमाशी यांच्या रुपकातून स्त्रीच्या जीवनतत्त्वाकडे बघण्याचा नवा विचार त्यांनी मांडला आहे. राणी माशी, तिच्या भोवती कडं करुन बसलेल्या मधमाशा म्हणजे निसर्गातील एक महत्त्वाचे घटक आहे. या मधमाशा जशा अविरतपणे श्रम करत असतात, त्यांच्या गतीमध्ये ज्या प्रकारे एकाच वेळी सौम्य आणि वेग आपल्याला आढळतो, अगदी त्याच प्रकारे स्त्रीचं जीवन सुद्धा या दोन धाग्यांवर अविरतपणे सुरु असतं. त्यांच्या चित्रांमधून केवळ स्त्रीविश्वाचे अंतरंगच उलगडतात असे नाही, तर त्या पलीकडे स्त्रीजीवनाचा एक वेगळाच परिस आपल्या दृष्टीत येतो.
 
देवेन भोसले या तरुण चित्रकाराची रचना सामर्थ्य आणि भावना या दोहोंचा सुरेख संगम साधणारी म्हणावी लागेल. म्हणूनच कॅन्व्हासवर जेव्हा अश्वचित्र उमटलेलं असतं, तेव्हा त्या चित्राच्या अंतरंगात शक्तीचा आणि तेजाचा अंश साकारलेला असतो. या सामर्थ्य शक्तीचा विचार करताना, ज्या प्रकारे भगवान बुद्धांच्या पांढऱ्या घोड्याचा जसा विचार केला आहे, तसाच छत्रपती शिवरायांच्या घोड्याचा डौलसुद्धा चित्रकाराने साकारलेला आहे. म्हणजे शांती आणि सामर्थ्य या दोहोंचा मिलाफ मनाला स्पर्शून जातो. सामर्थ्याचा हाच विचार पक्का होत जातो, ज्यावेळेला वीर तपस्वी साधूचं चित्र आपल्याला मिळते. ब्रह्म, विष्णू, महेश या तत्त्वांची केवळ त्यांच्या डोळ्यांनी करुन दिलेली ओळख, तर या चित्रप्रदर्शनाला वेगळ्या उंचीवर नेणारी आहे.
 
चित्रविश्वामध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करणारे हे कुटुंब म्हणजे सृजनविचाराचे वाहक आहेत. केवळ एका विषयाच्या, शैलीच्या चौकटीमध्ये स्वत:ला अडकवून न घेता, सातत्याने नवनवीन प्रयोग करणाऱ्या या कुटुंबाचे ‌‘एकत्र‌’ हे चित्रवैभव प्रत्येक चित्ररसिकाने, अभ्यासकाने अनुभवलेच पाहिजे असे!
 
 
Powered By Sangraha 9.0