मुंबई (विशेष प्रतिनिधी) - उरणमधील भेंडखळ येथील एक कन्टेनर यार्डमध्ये शनिवार दि. १ नोव्हेंबर रोजी दक्षिण अमेरिकेत आढळणारा काॅर्न स्नेक आढळून आला (american corn snake). याठिकाणी परदेशातून आलेल्या एका कंटेनरमध्ये हा साप आढळला (american corn snake). त्यामुळे परेदशातून हा साप कन्टेरच्या माध्यमातून भारतात आल्याची शक्यता आहे. दरम्यान यार्ड प्रशासनाने सर्पमित्रांना बोलावून या सापाचे रेस्क्यू केले. (american corn snake)
भेंडखळ येथील हिंद टर्मिनल यार्डमध्ये इंग्लडवरुन एक कन्टेनर आला होता. या कंटेनरमध्ये वाहनांचे टायर होते. कर्मचाऱ्यांनी हा कंटेनर उघडल्यानंतर टायरमध्ये त्यांना नारंगी रंगाचा साप आढळून आला. त्यांनी लागलीच ही माहिती फ्रेंड्स ऑफ नेचर (फाॅन) या स्थानिक वन्यजीव बचाव संस्थेला दिली. फाॅनचे सर्पमित्र जय गायकवाड यांनी घटनास्थळी पोहोचून सापाचा बचाव केला. मात्र, त्यांना हा साप भारतीय वाटला नाही. तपासणीअंती हा साप दक्षिण अमेरिकेत आढळणारा काॅर्न स्नेक असल्याचे समजले. त्यामुळे कन्टेनरच्या माध्यमातून तो भारतात पोहोचल्याचे लक्षात आले. मात्र, तो इंग्लडवरुन आलेल्या सामानाच्या कन्टेनरमध्ये कसा आढळला हा प्रश्न आहे.
दक्षिण आणि आग्नेय अमेरिकेत आढळणाऱ्या काॅर्न स्नेकला रेड रॅट स्नेक देखील म्हणतात. ही उत्तर अमेरिकन रॅट स्नेकची एक प्रजात आहे. हा साप बिनविषारी असून तो माणसासाठी निरुपद्रवी आहे. उलटपक्षी तो माणसांसाठी फायदेशीर ठरतो. कारण, तो पिकांचे नुकसान करणाऱ्या आणि रोगप्रसार करणाऱ्या रानटी उंदीरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. दरम्यान उरणमध्ये सापडलेला हा साप परदेशी असल्याने त्याला येथील नैसर्गिक अधिवासात सोडता येणार नाही. त्यामुळे या सापाचे पुढे काय करायचे, याविषयी वन विभाग निर्णय घेणार आहे.