Review: बळीराजाच्या प्रश्नांना साद घालणारा 'पुन्हा शिवाजी राजे भोसले'

01 Nov 2025 11:20:46
 
punha shivaji raje bhosale 
 
2009 साली प्रदर्शित झालेला ‌‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय‌’ हा चित्रपट रसिकप्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. या चित्रपटातील मनस्पश संवाद आणि गीतांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. महेश मांजरेकर यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची चित्रपटातली आगळीवेगळी भूमिका तेव्हा प्रचंड गाजली होती. याच चित्रपटाचा दुसरा भाग ‌‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा दि. 31 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
 
‌‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय‌’ या चित्रपटात मराठीच्या मुद्द्यावर भाष्य करण्यात आले होते, तर यंदाच्या चित्रपटात मुद्दा मांडला आहे तो बळीराजाचा, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा. मराठी अस्मितेची त्याला जोड आहेच, पण आजचा मुघल कोण आणि त्याला महाराज कसा शह देतात, हे ‌‘पुन्हा शिवाजीराजे भोसले‌’मधून पाहायला मिळणार आहे. तेव्हा हा चित्रपट नेमका कसा आहे, ते पाहूया.
 
यावेळी कथा बळीराजाची आहे; त्यामुळे अर्थातच खेडेगावातून कथा उलगडत जाते. एका बाजूला कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना, दुसरीकडे त्यांच्या जमिनी हडपून त्यांचे सौदे करणारा राजकारणी म्हणजे आ. भगवान पोपटे. त्याला जोड आहे गावच्या सावकाराची आणि त्याने पोसलेल्या गुंडांची आणि याच वर्षानुवर्षे चाललेल्या अन्यायकारक व्यवस्थेवर आवाज उठवण्यासाठी वकील दिनकर जगताप पुढे येतात. चित्रपटाच्या मागच्या भागात दिनकरराव भोसले हे सचिन खेडेकरांनी साकारलेलं पात्र विशेष गाजलं होतं. यावेळी अभिनेते मंगेश देसाई दिनकर जगतापच्या भूमिकेत आहेत. दिनकरला आमदार आणि त्याचे गावगुंड निरनिराळ्या पद्धतींनी त्रास देण्याचा प्रयत्न करतच असतात. दिनकरच्या एकुलत्या एका मुलाला अटकही होते, त्याच्यावर खोटे गंभीर आरोप लावले जातात आणि त्यातच त्याचा मृत्यू होते. या घटनेने दिनकरचं कुटुंब उद्ध्वस्त होतं. त्यानंतर याच दिनकर जगतापला आणि महाराष्ट्रातल्या व्याकूळ, गरीब शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा पृथ्वीतलावर येतात, असे चित्रपटात दाखवले आहे.
 
पहिल्या भागात महाराजांनी मराठी माणसाला आणि त्याच्या अस्मितेला जागं केलं होतं, तर या भागात ते शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी संघर्षाची हाक देतात. तेव्हा दिनकर जगताप आणि महाराज यांचा पुढचा लढा कसा आहे आणि ज्या कामासाठी महाराजांनी पुन्हा एकदा येण्याचा निर्णय घेतला, ते साध्य होतंय का, हे सगळं तुम्हाला चित्रपटात पाहावं लागेल.
महेश मांजरेकर दिग्दर्शक असल्यामुळे त्यांनी या चित्रपटाची भव्यदिव्यता कायम राखलेली दिसते. उत्तम पार्श्वसंगीत, छायाचित्रण ही या चित्रपटाची जमेची बाजू म्हणता येईल. मांजरेकर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा 2007-08च्या काळात घेऊन जातात, हे चित्रपट पाहताना पुन्हा पुन्हा जाणवतं.
 
खरं तर जर आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर, या व्यवस्थेला त्यांनी कसं सांभाळलं असतं, असे प्रश्न अनेकांना नक्कीच कधी ना कधी पडले असतीलच. पण, नेमकी ही कल्पनाच मांजरेकरांनी चित्रपटातून सत्यात उतरवली आहे. चित्रपटाचा पहिला भाग यशस्वी झाला, तर दुसरा भागही त्याच तोडीचा आहे, असं म्हणायला हरकत नाही. मांजरेकरांचं ‌‘कास्टिंग‌’ उत्तम जमून आलं आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडकेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचे शिवधनुष्य उत्तम पेलले आहे. एक छत्रपती म्हणून आणि दुसरी शिवाजी भोसले अशा दोन्ही भूमिकांमध्ये सिद्धार्थने अक्षरशः जादूच केली आहे. आजवर अनेकांनी छत्रपती शिवरायांची भूमिका मोठ्या पडद्यावर आणि मालिकांमध्येही साकारली आहेत. पण, त्यापैकी काही मोजकेच कलाकार लक्षात राहतात, त्यात आता सिद्धार्थ बोडके या कलाकाराचे नावही जोडावे लागेल. याशिवाय त्रिशा ठोसर, सांची भोयर, भार्गव जगताप हे तीन बालकलाकार देखील चित्रपटात झळकले आहेत. या तिघांच्या भूमिकाही महत्त्वाच्या असून, त्यांनी त्या उत्तमरित्या निभावल्या आहेत. तसेच दिनकरच्या भूमिकेत मंगेश देसाई, साहाय्यक भूमिकेत सयाजी शिंदे, शशांक शेंडे, विक्रम गायकवाड या सगळ्यांनी आपापल्या भूमिकांना पुरेपूर न्याय दिला आहे.
 
कोणत्याही चित्रपटात नायकाइतकाच खलनेताही महत्त्वाचा आणि हा खलनेता साकारलाय तो अभिनेता सिद्धार्थ जाधवने. सिद्धार्थच्या आजवरच्या भूमिका पाहता, ही त्याची खूपच आगळीवेगळी आणि चिरकाळ लक्षात राहणारी भूमिका म्हणता येईल. उस्मान सय्यद ऊर्फ उस्मान खिल्लारी असं त्याचं पात्र. त्याचं वेगळं रुप आणि क्रुरता चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यात प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण करते. मांजरेकरांनी मराठी चित्रपटात आणलेला हा निराळा खलनेता नक्कीच प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा आहे. तसेच प्रामाणिक मुख्यमंत्र्याची भूमिकासुद्धा सुनील बर्वे यांनी सुंदररित्या साकारली आहे. पावणे तीन तासांचा हा चित्रपट कुठेही रेंगाळत नाही. आजच्या काळात होणारा भ्रष्टाचार आणि त्याविरोधात उपस्थित केलेले रोखठोक प्रश्न, हे प्रेक्षकांना नक्कीच विचार करायला भाग पाडतात.
 
चित्रपटात गाणीदेखील चांगली जमून आली आहेत. पहिल्या भागातील ‌‘ओ राजे‌’, ‌‘पौवाडा‌’ ही गाणी आजही अगदी अलीकडची वाटतात. या भागातसुद्धा देवीचं असचं एक गाणं तसेच महाराजांवरचा एक टायटल ट्रॅक विशेष लक्ष वेधून घेतो. पण, पहिल्या भागाशी तुलना केली तर दुसऱ्या भागातील गीते तितकीशी प्रभावी वाटत नाही.
 
आजच्या शेतकऱ्यांचे प्रश्न जरी खरे असले, तरी आजचं खेडेगाव, गावकऱ्यांचा पेहराव, त्यांची घरं हे सगळं ग्रामीण चित्र अधिक वास्तवदश उभारता आलं असतं, असं वाटतं. चित्रपटात बरेच ॲक्शन सीन्स आहेत. चित्रपटाचे संवादसुद्धा अतिशय प्रभावी आहेत. त्यामुळे ‌‘पुन्हा शिवाजीराजे भोसले‌’ हा चित्रपट नक्की पाहता येईल.
 
कथा, पटकथा आणि दिग्दर्शक : महेश वामन मांजरेकर
  
सादरकर्ते : झी स्टुडिओज
 
निर्माते : द ग्रेट मराठा एंटरटेन्मेंट, सत्य-साई फिल्म्स आणि क्रिझोल फिल्म्स
 
निर्माता : राहुल पुराणिक, राहुल सुगंध
 
संवाद : सिद्धार्थ साळवी
 
कलाकार : सिद्धार्थ बोडके, सयाजी शिंदे, त्रीशा ठोसर, भार्गव जगताप, सिद्धार्थ जाधव, विक्रम गायकवाड, मंगेश देसाई, शशांक शेंडे, पृथ्वीक प्रताप
 
गायक : मानसी घोष, शंकर महादेवन, गौरव चाटी

 
- अपर्णा कड
 
Powered By Sangraha 9.0