डीजे, रिमिक्सचा पारंपरिक लावणीवर परिणाम : मेघा घाडगे

01 Nov 2025 11:36:44

Megha Ghadge
 
लावणीसम्राज्ञी आणि अभिनेत्री मेघा घाडगे ही तिच्या अप्रतिम नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे मेघाने पारंपरिक लावणी आणि चित्रपटांतून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. नुकताच दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’ने मेघाशी विशेष संवाद साधला. यावेळी मेघाने तिची सिनेकारकीर्द उलगडण्यासोबतच महाराष्ट्राची लोककला असलेल्या लावणीवर डीजे, रिमिक्समुळे झालेल्या परिणामांविषयीही परखड मत मांडले.
 
मेघाला लहानपणापासून नृत्याची प्रचंड आवड. त्यामुळे शाळेत असल्यापासून ती वेगवेगळ्या नृत्य कार्यक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये आवर्जून सहभाग घ्यायची. परंतु, मध्यमवगय कुटुंबातून येणाऱ्या मेघाला प्रारंभीच्या काळात लावणीसाठी विरोधही झाला. पण, तिच्या कलेने तिला स्वस्थ बसू दिलं नाही आणि तिची लावणीच्या विविध कार्यक्रमांसाठी निवड होऊ लागली. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या ग्रुपमध्येही मेघाने बरेच कार्यक्रम केले. ‌
 
‘नटरंगी नार‌’ हा त्यांचा कार्यक्रम विशेष गाजला. त्यावेळी सुरेखा पुणेकर यांचे महिन्यातून 30 ते 35 कार्यक्रम होत असत. याविषयी मेघा सांगते की, “सुरेखाताईंनी मला त्यांच्या ग्रुपसाठी निवडलं. मी पुण्यात गेले, पण तिकडे मुंबईसारखं काहीच नव्हतं. सगळं नवीन होतं. त्यावेळी एकाच दिवशी आम्ही तीन-तीन कार्यक्रम करायचो. सकाळी, दुपारी, संध्याकाळी. पण, आता असं होत नाही. कारण, आता प्रेक्षकच नाहीत. त्यावेळी सगळे शो आम्ही ‌‘हाऊसफुल्ल‌’ द्यायचो. लोक तिकिटांसाठी वेडे झालेले मी पाहिले आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर बाहेरच्या राज्यांत आणि खेडोपाडीही आम्ही लावणीचे कार्यक्रम केले आहेत,” असं मेघा सांगते.
 
लावणीकडे पाहण्याचा महिलांचा दृष्टिकोन
 
याविषयी बोलताना मेघा सांगते की, “लावणीकडे पाहण्याचा महिलांचा दृष्टिकोन खूप बदलला आहे. सुरेखा पुणेकर आणि आम्ही ‌‘नटरंगी नार‌’ हे कार्यक्रम करायचो, तेव्हा सुरुवातीचे शोज होते, ते खास महिलांसाठी आयोजित केले होते. ही सुरुवात तेव्हापासूनच झाली. महिलाही लावणीच्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतात. त्यांनाही पारंपरिक लावणी पाहायला आवडते.”
 
लावणीचं बदललेलं स्वरुप खेदजनक
 
लावणीच्या बदललेल्या स्वरुपाविषयी बोलताना मेघा सांगते की, “डीजे, रिमिक्सने पारंपरिक, लोककलेतल्या लावणीवर खूप परिणाम केला आहे. चित्रपटात ज्या लावण्या आपण बघतो, त्या खूपच ‌‘लिबट‌’ घेऊन सादर केलेल्या असतात. आता आपण खरी लावणी पाहायला जात नाही. पूव लावणीशिवाय चित्रपटच पूर्ण व्हायचा नाही. आजही लावणी चित्रपटात आहे, पण त्यातील लावणीचं स्वरुप खूप बदलले आहे. पुढची पिढी हेच पाहून घडणार आहे. आज लावणीचा रॅप, लावणी बेली डान्स असे प्रकार केले गेले आहेत.”
 
पारंपरिक लावणीची नऊवारी साडीसुद्धा लुप्त
 
याविषयी बोलताना मेघा सांगते की, “प्रेक्षकच यावर आळा घालू शकतात. सादरीकरण करणारे करतच राहणार आहेत. प्रेक्षकांनी काय पाहायचं, हे ठरवावं. लावणीच्या नावावर फक्त अंगप्रदर्शन सुरू आहे. नऊवारीचा अपमान सुरू आहे काही नव्या कलाकारांकडून. आम्ही याविरोधात आवाज उठवला, पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. उलट, अशा कार्यक्रमांना लोक जास्त पसंती देताना दिसतात. कदाचित आवाज उठवल्यामुळे आणखी प्रसिद्धी मिळाली, असं म्हणावं लागेल.”
 
मेघा पुढे सांगते की, “एकेकाळी लावणी कलाकारांच्या नृत्यांच्या एकमेकांशी स्पर्धा असायच्या. तोडा, तराणे, ढोलकीवादक यांच्यात जुगलबंदी रंगायची. परंतु, आता किती कमी कपडे घातले जातात, याच्या स्पर्धा होतात. पण, असं असलं, तरीही खरी लावणी कला पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये येतो. शासनाने भरवलेल्या लावणी महोत्सवाला मोठी गद पाहायला मिळते. जी आताची तरुण पिढी आहे, जी वेगळ्या वळणाला जात आहे, त्यांना आम्हाला लावणीकडे परत आणायचं आहे. ते नक्की येतील, याची मला खात्री आहे आणि पारंपरिक लावणी कधीच थांबणार नाही!”




 
 

Powered By Sangraha 9.0