मुंबई : ( Mahavikas Aghadi ) "विना परवाना मोर्चा काढला तर शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई होईल."असे स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक नोव्हेंबर च्या विरोधकांच्या मोर्चावर दिले आहे. तर "हिंदू नावाची उबाठा गटाला ॲलर्जी असल्याने फॅशन स्ट्रीट म्हणण्याची वेळ उबाठा गटावर आली आहे. आणि लोकसभेला जागा वाढल्या तेव्हा गप्प असणारे विरोधक आता आयोगावर प्रश्नचिन्ह उभा करून नौटंकी करीत आहेत."अशी टीका भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवार दि.३१ रोजी केली.
राज्यातील विरोधी पक्षाच्या एक नोव्हेंबर च्या मोर्चावरून काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांविरोधी भूमिकेमुळे, बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, 'उपस्थितीबाबतचा अंतिम निर्णय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नेथला घेतील.
या मोर्चात राज ठाकरे सहभागी होणार असल्याने काँग्रेसला बिहारमध्ये फटका बसण्याची भीती आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मोर्चापासून दूर आहेत.तर पक्षाकडून केवळ बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच गुरुवार दि .३० रोजी वाय. बी चव्हाण सेंटर , मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मोर्चातील सहभागाबाबत नेमके नाव सांगण्याबाबत चुप्पी साधली होती. यामुळे महाविकास आघाडीतील ऐक्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा : जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
तर दुसरीकडे "राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलंय आणि थोड्याच दिवसांमध्ये मनसे ही पूर्णपणे उबाठा विलीन होते आहे."असं खळबळजनक वक्तव्य शिंदे सेनेचे नेते राजू वाघमारे यांनी शुक्रवार दि. ३१ रोजी केलं आहे.
"सामना वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार उद्धव ठाकरे बैठकीत प्रमुख म्हणून बसले आहेत तर राज ठाकरे एका कार्यकर्त्याप्रमाणे बसल्याचे दिसत आहे. तसेच ज्यांनी एकमेकांना दिवसरात्र शिव्या दिल्या ते आता एकत्र बसत आहेत.ज्या काँग्रेस ने यांना कधी दारात घेतले नाही त्यांनी दारात घ्यावे आणि मुख्यमंत्री करावे यासाठी उद्धव ठाकरे यांची सुपर लाचारी सुरू आहे."असे म्हणाले. महाविकास आघाडीच्या बैठकीतील एका फोटो दाखवत आणि संदर्भ देत त्यांनी हा दावा केला.
या आसन व्यवस्थेवरून हे सिद्ध होते की मनसेने उद्धव ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारले असून पक्ष विलीनीकरणाच्या मार्गावर आहे. अनेक मनसैनिक पक्षावर नाराज असल्याचा दावाही वाघमारे यांनी केला.