मुंबई : (Maulana Fazlur Rehman) पाकिस्तानच्या जमीयत उलेमा-ए-इस्लाम या पक्षाचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान (Maulana Fazlur Rehman) यांनी पाकिस्तानी सैन्यावर नाराजी व्यक्त केल्याचे निदर्शनास आले आहे. पश्तून मौलानांनी अफगाणिस्तानाबाबत फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी सैन्याच्या सध्याच्या भूमिकेवर बोलताना इशारा दिला की, पाकिस्तान स्वतः निर्माण केलेले आणखी एक युद्ध सहन करू शकत नाही.
फजलुर रहमान (Maulana Fazlur Rehman) म्हणाले की, “१९७१ चे बांगलादेश आणि १९९९ चे कारगिल युद्ध विसरू नका. ही दोन्ही उदाहरणे पाकिस्तानी सैन्याच्या बेजबाबदार लष्करी मोहिमांची आहेत, ज्याचे नेतृत्व तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आणि लष्करी प्रमुख परवेज मुशर्रफ आणि इतरांनी केले होते आणि ज्यामुळे देशाच्या जागतिक प्रतिष्ठेला मोठे नुकसान झाले होते.”
पाक सैन्याने वास्तविक मुद्द्यांकडे आणि समस्यांकडे लक्ष देण्याबाबत ते म्हणाले, पाकिस्तानी सैन्याने सीमेवर विनाकारण लढाया करण्याऐवजी खैबर पख्तूनख्वा येथील दहशतवाद, आर्थिक संकट आणि प्रशासनिक स्थैर्य यांसारख्या खऱ्या समस्यांकडे लक्ष द्यायला हवं. त्यांनी सैन्याकडून देशातील जनतेमध्ये भीती निर्माण करण्याच्या प्रवृत्तीची टीका करत म्हटले की ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. त्यांनी सांगितलं की इस्लाम कोणत्याही मुस्लिम शेजाऱ्यावर अन्याय्य आक्रमणाला मान्यता देत नाही. त्यांनी अप्रत्यक्षपणे अफगाणिस्तानावरील पाकिस्तानी सैन्याच्या भूमिकेला गैर-इस्लामी आणि राजकीयदृष्ट्या आत्मघातकी असे संबोधले.
मौलाना फजलुर रहमान (Maulana Fazlur Rehman) यांनी भारताला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, ते “शांतीचा संदेश” घेऊन भारतात येऊ इच्छितात. ही माहिती मौलानांचे निकटवर्तीय खासदार कामरान मुरतजा यांनी एका टीव्ही मुलाखतीत दिली. मुरतजा यांनी दावा केला की त्यांनी वैयक्तिकरित्या मौलाना रहमान यांचा शांती संदेश एका भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक