मुंबई (विशेष प्रतिनिधी) - अमरावती येथे आयोजलेल्या अखिल भारतीय पक्षिमित्र संमेलनाचे उद्घाटन १ नोव्हेंबर रोजी पार पडले (maharashtra pakshimitra). उद्घाटनाचा हा कार्यक्रम संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात पार पडला. उद्घाटन सोहळ्यास संमेलनाध्यक्ष म्हणून निवृत्त प्रशासकीय अधिकारी तथा “मित्रा” या राज्य नियोजन संस्थेचे अध्यक्ष प्रवीण परदेशी ऑनलाइन जोडले गेले. तर उद्घाटक म्हणून प्रधान वन्यजीव संरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी आणि मुख्य अतिथी म्हणून अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा उपस्थित होत्या (maharashtra pakshimitra).
१ आणि २ नोव्हेंबर रोजी अमरावतीमध्ये पार पडणाऱ्या या संमेलनासाठी संपूर्ण राज्यातून व राज्याबाहेरून किमान ३०० प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत. संमेलनाध्यक्षांनी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. परदेशी म्हणाले की, "आपण कितीही अनभिज्ञ असलो तरीही, पक्षी संवर्धनाचा मुद्दा हा मानवी अस्तित्वाशी निगडित आहे. पक्षी संवर्धनाकरिता विविध जमातींना एकत्रित करावे लागेल ज्यांची उपजीविका निसर्गावर अवलंबून आहे. उदा. मासेमारी, बकरी पालन, शेती इत्यादी. या जमातींना एकत्रित करून अधिवास वाचविण्याकरिता नक्कीच मदत होईल." श्रीनिवास रेड्डी यांनी भविष्यात देखील अशा प्रकारच्या चळवळीस त्यांच्या वतीने भरघोस मदत करण्याचे त्यांनी जाहीर केले. सौम्या शर्मा यांनी याप्रसंगी भविष्यात होऊ घातलेल्या पक्षी मित्र निवडणुकीचे संभाव्य उमेदवार यांची यादी जाहीर केली. यावेळी मंचावर माजी महापौर मिलिंद चिमोटे, माजी संमेलनाध्यक्ष अनिल माळी, महाराष्ट्र पक्षी मित्रचे अध्यक्ष जयंत वडतकर, संमेलन आयोजन समितीचे अध्यक्ष तथा कार्यवाह महाराष्ट्र पक्षीमित्र डाॅ. गजानन वाघ, स्वागताध्यक्ष डॉ. अंजली देशमुख, सहसचिव डॉ. मंजुषा वाठ, उपाध्यक्ष श्रीकांत वऱ्हेकर हे उपस्थित होते.
यावर्षीचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार यावेळी संभाजीनगर येथील डॉ. दिलीप दिवाकर यार्दी यांना प्रदान करण्यात आला. इतर पुरस्कारांपैकी पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार अकोला येथील बाळ उर्फ जयदीप काळने यांना तर पक्षी जनजागृती पुरस्कार वाशिम येथील मिलिंद सावदेकर यांना, पक्षी संशोधन पुरस्कार वरुड जि. अमरावती येथील प्रतिक चौधरी यांना तर यावर्षीपासून नव्याने सुरुवात झालेला पहिला नवोदित पक्षिमित्र पुरस्कार साकोली जि. भंडारा येथील विकास बावनकुळे या नवोदित पक्षिमित्रास प्रदान करण्यात आला आहे. पक्ष्यांवर सातत्याने लिखाण करणाऱ्यास दिला जाणारा पक्षी विषयक साहित्य पुरस्काराची घोषणा सुद्धा यावेळी करण्यात आली. यावर्षीचा पक्षी साहित्य पुरस्कार सांगली येथील जेष्ठ पक्षी व पक्ष्यांच्या आवाजाचे तज्ञ शरद आपटे यांना तसेच भाईंदर जि. ठाणे येथील डॉ. पराग नलावडे या दोन लेखकांना देण्यात आला. नवोदित शालेय विद्यार्थ्यांस दिला जाणारा स्व. विनोद गाडगीळ नवोदित पक्षिमित्र पुरस्कार पुण्याच्या सात वर्षीय अर्पित चौधरी यांस प्रदान करण्यात आला.