वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया नीता मुकेश अंबानी यांचा सेवाभाव, संस्कार आणि संस्थाबांधणीचा प्रेरणादायी प्रवास!

    01-Nov-2025
Total Views |

Neeta Mukesh Ambani
 
नीता अंबानी यांनी शिक्षण, आरोग्य, कला आणि क्रीडा या सर्व क्षेत्रांत समाजाच्या विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. धीरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय विद्यालय, रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, आणि नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर या उपक्रमांद्वारे त्यांनी भारतीय समाजाच्या प्रगतीस नवी दिशा दिली आहे. त्यांच्या प्रत्येक उपक्रमामागे एकच उद्देश आहे तो म्हणजे करुणा, संधी आणि सक्षमीकरणाचा प्रसार. सेवाभाव आणि नेतृत्वाचं सुंदर मिश्रण असलेला त्यांचा प्रवास आज नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


“खरे नेतृत्व करुणेतूनच जन्म घेतं - जिथे मर्यादा दिसतात, तिथे शक्यता शोधण्याची ताकद म्हणजेच नेतृत्व.” - नीता मुकेश अंबानी








भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाच्या प्रवासात नीता अंबानी यांचं योगदान एक वेगळं स्थान निर्माण करतं. त्यांनी आरोग्य, शिक्षण, कला आणि क्रीडा या प्रत्येक क्षेत्रात समाजाला नव्या दिशेने नेणारं कार्य केलं आहे. त्यांचं ध्येय नेहमी एकच आहे ते म्हणजे संधी सर्वांपर्यंत पोहोचावी आणि प्रत्येक व्यक्तीला प्रगती करण्याचा समान अधिकार मिळावा.धीरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय विद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी मुलांमध्ये केवळ ज्ञान नाही, तर विचारांची गहनता आणि सर्जनशीलतेचा विस्तार घडवला. आरोग्य क्षेत्रात ‘सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल’ने आज गुणवत्तापूर्ण आणि सहज उपलब्ध वैद्यकीय सेवेचं प्रतीक म्हणून ओळख मिळवण्यात यश मिळवलं आहे. ग्रामीण विकास, महिलांचं सक्षमीकरण, शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांतील रिलायन्स फाउंडेशनच्या उपक्रमांनी लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवला आहे.


कलेबद्दल असलेली त्यांची आत्मीयता ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या स्थापनेतून प्रकट झाली. अल्पावधीतच हे केंद्र भारतीय परंपरा, संस्कृती आणि नवसर्जनशीलतेचं जागतिक व्यासपीठ ठरलं आहे. क्रीडा क्षेत्रातसुद्धा त्यांनी तळागाळातील प्रतिभेला प्रोत्साहन देत खेळाडूंना नव्या संधी उपलब्ध करून दिल्या. मुंबई इंडियन्सच्या संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य या नात्याने त्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली. नीता अंबानी यांचा प्रवास म्हणजे समाजासाठी कार्य करणाऱ्या दृढ संकल्पी नेतृत्वाचीच जणू कहाणीच. शिक्षणापासून संस्कृतीपर्यंत आणि आरोग्यापासून क्रीडापर्यंत प्रत्येक क्षेत्रात त्यांनी उभं केलेलं कार्य म्हणजे सेवाभाव आणि सक्षमीकरणाचं जिवंत उदाहरण आहे.