बेलापूरच्या ‘अ‍ॅग्रो गार्डन’मध्ये फुलपाखरांसोबत न्याहारी

01 Nov 2025 18:18:33

Agro Garden

नवी मुंबई : ( Agro Garden ) रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळची न्याहरी तब्बल ५० प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती आणि विविध झाडे, वेली, फुले, पक्ष्यांच्या सान्निध्यात करण्याची संधी निसर्गप्रेमींना मिळणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ९.३० ते ११ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. नवी मुंबईतील बेलापूर येथील सेक्टर ९ मधील ‘अ‍ॅग्रो व्हेजिटेबल फार्म आणि बटरफ्लाय गार्डन’मध्ये ‘फुलपाखरांसोबत न्याहारी’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम सर्व वयोगटातील लोकांसाठी सशुल्क असणार आहे.
 
हेही वाचा :  ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा’ अभियानास राष्ट्रीय उद्यानातून प्रारंभ
 
काँक्रीटच्या जंगलात नागरिकांनी पुढाकार घेऊन निर्माण केलेल्या झाडा-झुडपांचे जंगल आणि परिसंस्थेमुळे गेल्या ३० वर्षांमध्ये शेकडो प्रकारच्या झाडांच्या सहवासात सामान्य फुलपाखरांसोबतच काही दुर्मीळ फुलपाखरांच्या प्रजातींनीसुद्धा ‘अ‍ॅग्रो गार्डन’ला आपला अधिवास म्हणून निवडले आहे. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मन, कॉमन मॉर्मन, पेंटेड लेडी, लाईम, प्लेन टायगर, वाँडरर ही आणि इतर असंख्य फुलपाखरे जवळून पाहण्याची व त्यांच्याविषयी जाणून घेण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. सुरेश भागवत आणि फुलपाखरांविषयी संशोधन करणारे अभ्यासक यावेळी माहिती देणार आहेत. यासोबतच फुलपाखरांविषयीच्या काही नावीन्यपूर्ण खेळात सहभागी होता येईल. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी जुई खोपकर यांना ९८२०२२६१७१ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आयोजकांनी सांगितले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0