नुकत्याच मुंबईत संपन्न झालेल्या ‘इंडिया मेरीटाईम वीक’मध्ये भारत सरकारच्या बंदर, नौकानयन व जलमार्ग मंत्रालयाच्या दीपगृह संचालनालयाच्या दालनाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. हे पाहता, दीपस्तंभाच्या निर्मितीचा जागतिक इतिहास पाहणे महत्त्वाचे ठरते.
अंधारात दिशाहीन झालेल्या खलाशी आणि मासेमारी नौकांना किनाऱ्याचा मार्ग दाखवण्यासाठी पेटवलेली लहानशी ज्योतच पुढे जाऊन दीपगृहाच्या रूपात विकसित झाली. आज स्वयंचलित प्रणाली, उपग्रह आणि डिजिटल सिग्नल्सच्या युगातही दीपगृहांचा तेजोमय प्रकाश मानवाच्या शोधक वृत्तीचे प्रतीक म्हणून झळकतो आहे.
अशा या दीपगृहांचा उगम प्राचीन इजिप्तमध्ये झाला. इ.स.पू. 280च्या सुमारास बांधण्यात आलेले अलेक्झांड्रियाचे फारोस दीपगृह हे केवळ जगातील पहिलेच नव्हे, तर त्या काळातील सर्वांत उंच दीपगृह होते. सुमारे 450 फूट उंच या वास्तूच्या शिखरावर पेटवलेल्या प्रचंड अग्नीने समुद्रात येणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग दाखवला. त्याकाळी दीपगृहांची रूपे आजच्या सारखी नव्हती. दिवसाच्या वेळी दगडांचे ढीग ‘डे मार्क्स’ म्हणून वापरले जात, तर रात्री ज्वालामुखींच्या प्रकाशावर किंवा डोंगरकड्यावर पेटवलेल्या होळ्यांवर नाविकांचा भरोसा असे.
पुढे धातूच्या टोपल्यांमध्ये ठेवलेले ‘ब्राझियर्स’ हे कृत्रिम मार्गदर्शक प्रकाश म्हणून वापरले जाऊ लागले. आयर्लंडमधील पाचव्या शतकातील डुब्हान यांनी हूक हेड येथे असा दिवा पेटता ठेवला होता, ज्यामुळे जहाजे खडकांवर धडकण्यापासून वाचली. 17व्या शतकात आयर्लंडच्या कॉर्क जिल्ह्यातील ओल्ड हेड ऑफ किन्सेल येथे बांधलेल्या झोपडीसदृश दीपगृहाच्या छतावर कोळशाचा उघडा अग्नी पेटवला जात असे, या पद्धतीचे भग्नावशेष आजही तिथे पाहायला मिळतात.
कालौघात दीपगृहातील प्रकाशयंत्रणा सतत सुधारत गेली. लाकूड, कोळसा आणि टारपासून मेणबत्त्यांच्या रांगांपर्यंत प्रवास झाल्यानंतर ‘पॅराबॉलिक रिफ्लेक्टर’चा शोध लागला. या परावर्तक आरशामुळे प्रकाश लांबवर पोहोचू लागला. नंतर ‘आर्गांड लॅम्प’ने दीपगृहातील प्रकाश सातपट तेजस्वी केला. या दिव्याला बसवण्यासाठी वापरली गेलेली ‘फ्रेनल लेन्स’ ही प्रकाशशास्त्रातील खऱ्या अर्थाने क्रांतिकारी देणगी ठरली. बेलफास्टमधील ‘ग्रेट लाईट’ हे आजही त्याचे उत्तम उदाहरण मानले जाते.
19व्या शतकात आयर्लंडमध्ये दीपगृहांचा सुवर्णकाळ सुरू झाला. जॉर्ज हॅल्पिन यांनी ‘कमिशनर्स ऑफ आयरिश लाईट्स संस्थे’ची स्थापना करून अनेक भव्य दीपगृहे उभारली. त्याकाळी केरोसिन आणि पॅराफिनचा वापर केला जात असे, तर 1934 साली काऊंटी डाऊनमधील डोनाघडी दीपगृह हे आयर्लंडमधील पहिले विद्युत दीपगृह ठरले. 1980च्या दशकात दीपगृहे स्वयंचलित बनली आणि जहाजांची ओळख पटवणारी ‘ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम (AIS)’ दीपगृहांच्या केंद्रात समाविष्ट झाली.
भारतानेही या जागतिक प्रवासात आपला तेजस्वी वाटा उचलला आहे. प्राचीन काळापासून भारताच्या किनाऱ्यांवरील व्यापारमार्ग दीपगृहांनी उजळले. दाभोळ, चौल, गोवा आणि कोकणातील बाणकोट, विजयदुर्ग, रत्नदुर्ग आणि देवगड ही ठिकाणे प्राचीन सागरी मार्गदर्शनाची केंद्रे होती. ब्रिटिशांच्या काळात भारतात आधुनिक दीपगृहांची उभारणी झाली. मुंबईतील ‘प्राँग्स रीफ लाईटहाऊस’ (1864) हे भारतातील सर्वांत जुने आणि प्रभावी दीपगृह आहे, ज्याने शतकभराहून अधिक काळ मुंबई बंदरातील जहाजांना सुरक्षित मार्ग दाखवला आहे.
महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीपगृहे आजही सागरी सुरक्षेचा आधार आहेत. रत्नदुर्ग दीपगृहाने कोकणातील मत्स्यव्यवसायिक आणि व्यापारी नौकांना सुरक्षित वाट दाखवली, तर देवगड दीपगृह आधुनिक विद्युत यंत्रणांनी सज्ज आहे. भारतात 1930च्या दशकात अनेक दीपगृहे विद्युतप्रणालीवर आणण्यात आली आणि आज ती स्वयंचलित झाली आहेत. आजचे दीपगृह केवळ प्रकाशस्तंभ नाहीत, तर सागरी संवादाचे आणि सुरक्षित नौकानयनाचे अत्याधुनिक केंद्र बनले आहेत.
प्राचीन काळातील अग्नीच्या झळाळीपासून ते आजच्या डिजिटल संकेतांपर्यंतचा दीपगृहांचा प्रवास म्हणजे, मानवाच्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याच्या अविरत प्रयत्नांचीच प्रेरणादायी कहाणी आणि या प्रकाशयुगाचे खरे सार आहे.