मुंबई : मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमित साटम शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी छट पूजा या सणाच्या प्रशासकीय तयारीचा आढावा घेणार आहेत. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात दुपारी १ वाजता ही महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून यावेळी मुंबईतील विविध छट पूजा उत्सव समितीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
येत्या २६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान देशभरात पवित्र छट पूजेचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मुंबई परिसरातही समुद्र किनारी लाखो भाविक एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या अनुषंगाने भाविकांच्या सुविधा, कायदा सुव्यवस्था,वाहतूक नियंत्रण आणि स्वच्छतेच्या तयारीबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष आ. अमित साटम हे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याशी चर्चा करणार आहेत.
छट पूजा समितीच्या प्रतिनिधींनी सूचना पोहोचवाव्या
"कार्तिक शुक्ल चतुर्थीला छठपूजा हा सण सुरू होऊन कार्तिक शुक्ल सप्तमीला सूर्याला अर्ध्य वाहून सणाची सांगता होते. या चार दिवसाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक विविध पूजेसाठी घराबाहेर पडतात. त्यावेळी भाविकांना अनेक सुविधांची गरज भासते, तसेच ठिकठिकाणी गर्दी होत असते, अशावेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे ही प्रशासनाची आणि भाविकांचीही जबाबदारी आहे. यासंदर्भात छट पूजा समितीच्या प्रतिनिधींनी या बैठकीला उपस्थित राहून, आपल्या सूचना प्रशासनापर्यंत पोहचवाव्यात," असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले.